Monday, May 29, 2017

पिझ्हा बाय द बे मधे वॉक करुन येताना काही खायला प्यायला थांबते तेव्हा एक चष्मा लावलेली, कायम काळ्या लूज टीशर्टमधे आणि चेह-यावर बटा अशी एक जण लॅपटॉप घेऊन काहीतरी लिहिताना, काम करताना किंवा पुस्तक वाचताना दिसते. तिच्या कॅज्युअल कपड्यांवरुन आणि बरेचदा तिथेच दिसल्याने तीही आसपासच रहाणारी असावी हा अंदाज खरा ठरला. शिबा लेन्टीन तिचं नाव. पिझ्झा बाय द बे च्या इमारतीमधेच ती रहाते.
या इमारतीचं नाव सूना महल आहे हे नव्याने कळलं.

मग मुद्दाम बाहेरुन नीट पाहिलं तेव्हा ही सुद्धा देखणी आर्ट डेको इमारत आहे हे लक्षात आलं. एकतर इथे कायम खाली पिझा खायला येणा-या तरुण मुलामुलींची गडबड, म्युझिक, काचेची तावदानं, बाजूच्या फ़्लोरिस्टकडची गर्दी त्यामुळे सूना महलकडे आजवर लक्षच गेलं नव्हतं.

शिबा म्हणाली त्यांची फ़ॅमिली इथे ही इमारत अगदी कोरी, नुकती बांधली गेली तेव्हाच रहायला आली. म्हणजे कधी विचारलं तर हसून म्हणाली. १९३९ साली.
ओह माय गॉड.. म्हणजे ऐंशी वर्षांपूर्वी.

माझ्या चेह-यावरचं आश्चर्य पाहून शिबा म्हणाली, तरी ही फ़ार जुनी नाही. त्या मानाने उशीरा बांधली. बांधली तेव्हा इथे ऑलरेडी ब-याच जुन्या इमारती होत्या.

म्हणजे त्यात आमची ओशियानाही असणार कारण सूना महल च्या मानाने ती नक्कीच जास्त जुनी दिसते.  अर्थात मला नक्की माहित नाही. कदाचित सूना महलमधे कमर्शियल एस्टॅब्लिशमेन्ट्स आहेत म्हणून तिचा मेन्टेनन्स चांगला असेल. ओशियानाचा काहीच मेन्टेनन्स नसावा. म्हणूनही असेल.

ओशियानामधले वरचे मजले सगळे रेन्टल किंवा एअर बिएनबीचेच आहेत. फ़क्त पहिल्या दोन मजल्यांवर मिळून ३ परमनन्ट बि-हाडे आहेत.
एकात एक एकटाच म्हातारा रहातो, दुस-यात एक म्हातारं पारशी जोडपं आणि तिस-यात कोण माहित नाही.

ओशियाना कोणाची जागच नसते कधी, येता जातानाही कधीच कोणी दिसत नाहीत. कार पार्किंगमधे दोन जुनाट गाड्या असतात. त्यातल्या एकीतून तो एकटा म्हातारा सकाळी कुठेतरी जातो. कधी दुपारी, कधी रात्री येतो. अजून काम करत असावा.
बाकी ते पारशी जोडपं कधीतरी बाहेरच्या फ़ूटपाथवर वॉक घेतं. एकेकटे जातात. आधी म्हातारा मग म्हातारी. म्हातारा येऊन बाल्कनीत उभा रहातो. मग म्हातारी हळू हळू बाहेर पडते. तिच्या हातात पिशवी असते आणि काठी. समोर दिसली की हात करते. कही चौकशा नाहीत. म्हातारा तंद्रित असतो.

बाकी दिवसभर मीच ये जा करते. केया आली की तिची कम्पनी मिळेल.

मजा वाटली शिबाच्या इमारतीचं नाव सूना महल आणि तिथे कायम इतका गजबजाट.
आमच्या ओशियानामधे सुन्न शांतता.

7 comments:

Meghana Bhuskute said...

आता रोज इथे येऊन जाईन. मला एकदम नॉस्टाल्जिकच वाटतं आहे. काय मजा आहे.. सुरुवातीच्या दिवसांत तुझं वाचायची सवय होती. आता मधली वर्षं पुसून पुन्हा तेव्हाची सुखंदुःखं त्याच तीव्रतेच्या वाफेनिशी क्षणभर गुदमरवून जाताहेत. आपण कुठे आहोत, असा प्रश्न क्षणभर आणि मग मधल्या काळाचा एक फ्लॅश. ही मुलगी ती नव्हे. मीही ती नव्हे. तरी इतकी दाट ओळख कसली? वेलकम बॅक.

Tulip said...

हा ब्लॉग उघडला तेव्हा मलाही नॉस्टेल्जियाचा जबरदस्त ऎटेक आला. भोवतालची माणसं, शहरं, नाती, आपण सगळं बदलतं, आजूबाजूच्या जगात उलथापालथ होते पण ही जागा तीच तशीच. स्थिर. जुन्या ओळखीचा हात पुढे करणारी असं वाटणं विलक्षण होतं. या जगात पुन्हा पाऊल ठेवल्यावर टाइम मशिनमधे बसल्यासारखं जुन्या काळात गेलेले आपण मात्र नवे.. किंवा कदाचित तेच जुने. संदर्भ बदलले, पत्ते, ओळख, अनुभवांना शोषून घ्यायची क्षमता, पद्धत, व्यक्त होणं हे सगळं बदललही असेल. असेलच. पण तरी असं काही असेल का जे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन मुळ स्वरुपात शिल्लक रहात असेल?
या नोंदी ठेवाव्याशा वाटताहेत तेच आजमावून बघायला कदाचित. बाकी त्यांना टेक्निकली फ़ार अर्थ नाहिए.

बाकी कशी आहेस?

Meghana Bhuskute said...

मस्त मजेत.
टेक्निकॅलिटी गेली खड्ड्यात. एवीतेवी आपापले पेपर तपासायला लाल पेन हाही पांढऱ्यावर काळं करण्याचा एक व्हॅलिड उपयोग असतोच.
हल्लीच ऐकलेलं एक सुवचन -
दुनिया गोल है
जिंदगी झोल है
जास्त लाडात येऊ नको भाऊ
आपला विषय खोल ए

तर - विषयाला हात घालण्यास शुभेच्छा. :)

Samved said...

आता हरवणार नाहीस असं वाटून घेतो. चांगलं लिहिणारी जमात रोडावत जातेय तेव्हा हात चालू ठेवा

Monsieur K said...

Welcome back :)

स्वाती आंबोळे said...

So glad to see you!!! :)

Abhijeet said...

Welcome back Tulip. Please continue writing. आश्चर्याचा सुखद धक्का!

ट्युलिप खूप खूप अभिनंदन आणि आभार परत लिहिती झाल्याबद्दल...

जेंव्हा मराठी ब्लॉग-विश्व सुरु झाले तेंव्हाच्या काही मोजक्या दर्जेदार ब्लॉगपैकी असलेला तुझा ब्लॉग नेहमीच एक छान अनुभव राहिला आहे. रोजच्या जीवनातील घटनांकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन मला नेहमीच भावाला आहे.

आता लिहीत राहा, म्हणजे आमच्या सारख्या नवख्या लिंबू- टिबू ना प्रेरणा देत राहील.

थँक यु!
-अभि