Sunday, May 28, 2017

बाबांचं क्लिनिक ताडदेवला होतं. लहानपणी असंख्य वेळा शनिवार, रविवारी ते कुलाब्याला घेऊन जायचे आम्हाला. डबल डेकर बसमधून. मरिन ड्राइव्हवरुन जायची ती बस. १२३ नंबरची. वरच्या टपावरुन समुद्राचा भन्नाट वारा खात याच रस्त्यावरुन जाताना पाण्यात बुडणारा सूर्य आणि समुद्राच्या आत खोलवर शिरलेल्या मुंबईची गुलाबी केशरी प्रकाशाने उजळलेली स्कायलाईन दिसायची.

रेडिओ क्लबला बाबांचे मित्र ब्रिज खेळायला जमायचे. तिथेच डिनर, कधी इरॉसला सिनेमा, ब्रिटानियामधे बेरी पुलाव आणि के. रुस्तुमकडचं वेफ़रमधे जाडजुड होममेड, ताज्या फ़ळांच्या आइस्क्रिमची स्लॅब ठेवलेलं आइस्क्रिम आणि मग परतताना चर्चगेट स्टेशनवर ट्रेन पकडून घरी.

मरिन ड्राइव्हवरुन त्यावेळी बस जात असे तेव्हा डाव्या बाजूच्या या इमारतींकडे क्वचितच लक्ष जायचं. सगळं लक्ष समुद्राकडे असायचं. या इमारतींनी लक्ष वेधून घेतलं खूप नंतर. झेवियर्सला मास कम्यूनिकेशनचा कोर्स करत असताना अनेकदा फ़ोर्टमधून चालत फ़ाउंटनला आणि मग तिथून नरिमन पॉइन्टला आणि मग तिथून उलटं मरिन ड्राइव्हवरुन चालत मरिन लाइन्स स्टेशनपर्यंत चालत जाताना या देखण्या इमारती दिसायच्या रांगेने उभ्या. त्यांचे वळणदार देखणे कठडे, बाल्कन्या. सुनसान शांतता असायची तेव्हाही या इमारतींमधे.
सगळी गजबज काय ती रस्त्यापलीकडच्या समुद्राच्या किना-याच्या फ़ूटपाथवर.
आताही तसंच आहे. या इमारती आता इतक्या जुन्या झाल्या आहेत, त्यांच्यात शांतता मुरलेली आहे खोलवर. रस्त्यावर आणि रस्त्यापलिकडे समुद्रालगतच्या फ़ूटपाथवर गर्दीचा आवाज हजार पटीने वाढला आहे. त्यात ही शांतता अधिकच दबलेली आणि जास्त सुन्न.
समुद्र मात्र तसाच. जास्त मळकट कदाचित. पण आता मान्सुन काठावर ओथंबला आहे. त्यामुळे पाणी इतकं गडद दिसत असावं.

No comments: