Monday, May 29, 2017

पिझ्हा बाय द बे मधे वॉक करुन येताना काही खायला प्यायला थांबते तेव्हा एक चष्मा लावलेली, कायम काळ्या लूज टीशर्टमधे आणि चेह-यावर बटा अशी एक जण लॅपटॉप घेऊन काहीतरी लिहिताना, काम करताना किंवा पुस्तक वाचताना दिसते. तिच्या कॅज्युअल कपड्यांवरुन आणि बरेचदा तिथेच दिसल्याने तीही आसपासच रहाणारी असावी हा अंदाज खरा ठरला. शिबा लेन्टीन तिचं नाव. पिझ्झा बाय द बे च्या इमारतीमधेच ती रहाते.
या इमारतीचं नाव सूना महल आहे हे नव्याने कळलं.

मग मुद्दाम बाहेरुन नीट पाहिलं तेव्हा ही सुद्धा देखणी आर्ट डेको इमारत आहे हे लक्षात आलं. एकतर इथे कायम खाली पिझा खायला येणा-या तरुण मुलामुलींची गडबड, म्युझिक, काचेची तावदानं, बाजूच्या फ़्लोरिस्टकडची गर्दी त्यामुळे सूना महलकडे आजवर लक्षच गेलं नव्हतं.

शिबा म्हणाली त्यांची फ़ॅमिली इथे ही इमारत अगदी कोरी, नुकती बांधली गेली तेव्हाच रहायला आली. म्हणजे कधी विचारलं तर हसून म्हणाली. १९३९ साली.
ओह माय गॉड.. म्हणजे ऐंशी वर्षांपूर्वी.

माझ्या चेह-यावरचं आश्चर्य पाहून शिबा म्हणाली, तरी ही फ़ार जुनी नाही. त्या मानाने उशीरा बांधली. बांधली तेव्हा इथे ऑलरेडी ब-याच जुन्या इमारती होत्या.

म्हणजे त्यात आमची ओशियानाही असणार कारण सूना महल च्या मानाने ती नक्कीच जास्त जुनी दिसते.  अर्थात मला नक्की माहित नाही. कदाचित सूना महलमधे कमर्शियल एस्टॅब्लिशमेन्ट्स आहेत म्हणून तिचा मेन्टेनन्स चांगला असेल. ओशियानाचा काहीच मेन्टेनन्स नसावा. म्हणूनही असेल.

ओशियानामधले वरचे मजले सगळे रेन्टल किंवा एअर बिएनबीचेच आहेत. फ़क्त पहिल्या दोन मजल्यांवर मिळून ३ परमनन्ट बि-हाडे आहेत.
एकात एक एकटाच म्हातारा रहातो, दुस-यात एक म्हातारं पारशी जोडपं आणि तिस-यात कोण माहित नाही.

ओशियाना कोणाची जागच नसते कधी, येता जातानाही कधीच कोणी दिसत नाहीत. कार पार्किंगमधे दोन जुनाट गाड्या असतात. त्यातल्या एकीतून तो एकटा म्हातारा सकाळी कुठेतरी जातो. कधी दुपारी, कधी रात्री येतो. अजून काम करत असावा.
बाकी ते पारशी जोडपं कधीतरी बाहेरच्या फ़ूटपाथवर वॉक घेतं. एकेकटे जातात. आधी म्हातारा मग म्हातारी. म्हातारा येऊन बाल्कनीत उभा रहातो. मग म्हातारी हळू हळू बाहेर पडते. तिच्या हातात पिशवी असते आणि काठी. समोर दिसली की हात करते. कही चौकशा नाहीत. म्हातारा तंद्रित असतो.

बाकी दिवसभर मीच ये जा करते. केया आली की तिची कम्पनी मिळेल.

मजा वाटली शिबाच्या इमारतीचं नाव सूना महल आणि तिथे कायम इतका गजबजाट.
आमच्या ओशियानामधे सुन्न शांतता.

Sunday, May 28, 2017

बाबांचं क्लिनिक ताडदेवला होतं. लहानपणी असंख्य वेळा शनिवार, रविवारी ते कुलाब्याला घेऊन जायचे आम्हाला. डबल डेकर बसमधून. मरिन ड्राइव्हवरुन जायची ती बस. १२३ नंबरची. वरच्या टपावरुन समुद्राचा भन्नाट वारा खात याच रस्त्यावरुन जाताना पाण्यात बुडणारा सूर्य आणि समुद्राच्या आत खोलवर शिरलेल्या मुंबईची गुलाबी केशरी प्रकाशाने उजळलेली स्कायलाईन दिसायची.

रेडिओ क्लबला बाबांचे मित्र ब्रिज खेळायला जमायचे. तिथेच डिनर, कधी इरॉसला सिनेमा, ब्रिटानियामधे बेरी पुलाव आणि के. रुस्तुमकडचं वेफ़रमधे जाडजुड होममेड, ताज्या फ़ळांच्या आइस्क्रिमची स्लॅब ठेवलेलं आइस्क्रिम आणि मग परतताना चर्चगेट स्टेशनवर ट्रेन पकडून घरी.

मरिन ड्राइव्हवरुन त्यावेळी बस जात असे तेव्हा डाव्या बाजूच्या या इमारतींकडे क्वचितच लक्ष जायचं. सगळं लक्ष समुद्राकडे असायचं. या इमारतींनी लक्ष वेधून घेतलं खूप नंतर. झेवियर्सला मास कम्यूनिकेशनचा कोर्स करत असताना अनेकदा फ़ोर्टमधून चालत फ़ाउंटनला आणि मग तिथून नरिमन पॉइन्टला आणि मग तिथून उलटं मरिन ड्राइव्हवरुन चालत मरिन लाइन्स स्टेशनपर्यंत चालत जाताना या देखण्या इमारती दिसायच्या रांगेने उभ्या. त्यांचे वळणदार देखणे कठडे, बाल्कन्या. सुनसान शांतता असायची तेव्हाही या इमारतींमधे.
सगळी गजबज काय ती रस्त्यापलीकडच्या समुद्राच्या किना-याच्या फ़ूटपाथवर.
आताही तसंच आहे. या इमारती आता इतक्या जुन्या झाल्या आहेत, त्यांच्यात शांतता मुरलेली आहे खोलवर. रस्त्यावर आणि रस्त्यापलिकडे समुद्रालगतच्या फ़ूटपाथवर गर्दीचा आवाज हजार पटीने वाढला आहे. त्यात ही शांतता अधिकच दबलेली आणि जास्त सुन्न.
समुद्र मात्र तसाच. जास्त मळकट कदाचित. पण आता मान्सुन काठावर ओथंबला आहे. त्यामुळे पाणी इतकं गडद दिसत असावं.

Saturday, May 27, 2017

फ़ार काहीच करायला नाही म्हणून समोरच्या समुद्राच्या किना-याने सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कधीही चालणे ही काही फ़ार चांगली आयडिया नाही. एकतर हा काही कोणत्या निसर्गरम्य पर्यटनस्थळावरचा, निवांत समुद्र किनारा नाही. हा मरिन ड्राइव्ह आहे. कितीही छान असला तरी इथे शहरातला सर्वात वेगवान ट्रॅफ़िक दिवसरात्र चालू असतो, इथल्या प्रोमेनेडवर दिवसातल्या कोणत्याही प्रहरात प्रेमिकांच्या जोड्या, भटके, बेकार, हौशी सगळ्यांची भरपूर गर्दी असते आणि मुख्य म्हणजे हा भर उन्हाळा, मुंबईतला फ़ेमस चिकचिकाट हायेस्ट पिकवर असतानाचा सिझन आहे त्यामुळे असं वेड्यासारखं चालत रहाणं ही तितकीशी भली आयडिया नाही.
हे सगळं डोक्यात असलं तरी लवकरच विसरायला झालं खरं.
सकाळी खूप लवकर आणि रात्री खूप उशिरा चालणंच मला जास्त आवडतय. हे शहर झोपतच नाही त्यामुळे जागं वगैरे व्हायचा प्रश्न नसतो. पण ऐन पहाटेची अपरिहार्य पेंग शहरालाही येतेच. ती उतरायच्या आधी बाहेर पडू शकलो आपण तर मरिन ड्राइव्हवर कल्पनातीत सौंदर्यानुभव येऊ शकतो हे लगेच कळलं.
ओशियानाच्या गल्लीतून बाहेर पडल्यावर पुढे एअर इंडियाच्या कॉर्नरपर्यंत चालणं हे एका फ़टक्यात होतं. मी अजून तिथून आतल्या बाजूच्या रस्त्यांवर, शहराच्या आतमधे शिरले नाहीय. अजून पुढे एनसिपिएपर्यंतही गेले नाहीए. ओशियाना ते एअर इंडियाची बिल्डिंग. बास.
मला सकाळी साडेनऊला स्काइपकॉल असतो. प्रोजेक्ट मिटिंग. ती दीड तास सलग चालते. त्याच्या आत ब्रेकफ़ास्ट, आंघोळ वगैरे आटपून तयार रहायला लागतेच. त्यामुळे सकाळी फ़ार वेळ चालत नाही. एरवी दिवसभर उन्हाचा तडाखा, सूर्याचा उलट दिशेने चालायला लागते. त्यामुळे मग मरिन लाइन्स चौपाटीच्या दिशेने चालते. रात्री जायला हवं सलग एनसिपिएच्या समुद्रापर्यंत.
तापलेल्या काळ्याभोर डांबरी रस्त्याच्या मधोमध आपण अकस्मात उगवलो आहोत असं फ़िलिंग येतं.
दोन्ही बाजूंनी माणसांची वाहती गर्दी, गाड्यांचा गजबजाट आणि त्यात एखाद्या ट्रॅफ़िक आयलंडसारखी मी निवांत, रिकामटेकडी.
शहराची स्कायलाईन बदलली, दुकानांच्या पाट्या बदलल्या, रस्त्यांची वळणं बदलली. मरिन ड्राइव्ह आणि समुद्र अजिबात्च बदललेला नाही.
एक वर्ष. क्षुल्लक वाटणारा आणि तरीही दडपण आणणारा काळ. नात्यागोत्याचं, रक्ताचं, मैत्रीचं काहीच शिल्लक नसलेल्या शहरात कठीणही वाटू शकणारा. निदान काम सुरु होईपर्यंत तरी.

Tuesday, May 09, 2017

चालताना शहर..

इथे आल्यापासून गेला आठवडाभर मी जितकी चालले आहे तितकी इथे रहात असताना कधीही चालल्याचे आठवत नाही. इतक्या उष्ण तापलेल्या हवेत तर नाहीच. खरं तर आता मुंबईतली एकुणच ट्रान्सपोर्ट सिस्टीम आधीपेक्षा खूप सुधारलेली दिसते आहे. ओला, उबर आहेतच, शिवाय मेट्रो, फ़्लायओव्हर्स, रुंद रस्ते हे सगळं त्याकरता कारणीभूत. पण मला इथे आल्यापासून चालण्याचं वेड लागलं आहे.
त्यामागे कारणं दोन.
पहिलं मी साउथ मुंबईत, तेही समुद्राकाठी रहाते आहे सध्या.
दुसरं माझ्याकडे भरपूर वेळ आहे.
काम सुरु व्हायला वेळ आहे. ऑफ़िसची जागाही नक्की झालेली नाही. प्रोजेक्टवर माझ्यासोबत काम करणारे पाच जण आहेत. त्यापैकी मी आणि अजून एक मुलगीच आलो आहोत. केया तिचं नाव, मला फ़ार आवडलं. ती मध्यप्रदेशातून आली आहे, भोपाळच्या जवळ हबीबगंज म्हणून आहे तिथून.
ऑफ़िसनी घेतलेली एअर बीएनबीची अपार्टमेंट्स साउथ मुंबईत आहेत हे कळलं होतं आधीच मेलवर डीटेल्स, फोटो वगैरे होते त्यातून, पण ती ऎक्चुअली मरिन ड्राइव्हवर, समुद्रासमोर आहेत हे पाहिल्यावर धक्काच बसला.  शहरातल्या या भागाला, तिथल्या घरांना टॅक्सी, बसमधून पास होताना असंख्य वेळा पाहिलं होतं, त्या घरांचा सुंदर, जुनाट ज्याला ओल्ड वर्ल्ड चार्म म्हणतात असा लूक, सिक्स्टीजच्या सिनेमांमधल्या गाण्यांमधे त्यांचं दर्शन झालं की ’मुंबई’ दिसल्याचं समाधान वाटायचं, ती ही घरं. इथे कधी काळी आपण राहू, काही काळापुरते का होईना, हे मनातही येणं शक्य नव्हतं. आयमिन संबंधच नाही काही.
समुद्राच्या इतक्या समोर, सुंदर बनवलेल्या प्रोमेनेडवरुन चालण्याचा मोह आवरणं मला तरी शक्यच नाही.
पहिल्या दिवशी आले त्यावेळी रात्र झाली होती. तरीही सामान, बॅगा रुममधे टाकल्या टाकल्या मी खालिच उतरले. दहा वाजून गेले होते, पण खूप नाईटवॉकर्स होते रस्त्यावर. दहा मिनिटं चालल्यावर वर आले पुन्हा. समुद्र होता पण वारं नव्हतं अजिबात. प्रचंड ह्यूमिडिटी हवेत. पण मजा आली.
आपलंच शहर, पण बाहेर बघण्याची खिडकी बदलली, खिडकीतून दिसणारा नजारा बदलला की त्या शहराबद्दलचं सगळं पर्स्पेक्टीवच बदलून जातं.
याच शहराच्या उपनगरात आयुष्य गेलं माझं, नोकरी, शिक्षणाच्या, भटकण्याच्या निमित्ताने जवळ जवळ रोज साउथ मुंबईला येणं होत होतं, पण तरी माझ्या या जेमतेम आठवडाभराच्या चालण्यातून मला जी मुंबई दिसली, दिसते आहे, ती वेगळीच. आधी कधीच न अनुभवलेली.
केया याआधी तीन चारदाच मुंबईत आलेली आहे. तिला विचारायला पाहिजे, तिला कशी दिसते आहे मुंबई?
शहर प्रत्येकाकरता वेगळं, प्रत्येकवेळी वेगळं.


Tuesday, May 02, 2017

ऐन उन्हाळ्यात..

आणि एक दिवस तुम्ही तुमच्या शहरात परत येता,
ऐन उन्हाळ्यात..
शहरातल्या धूळभरल्या रस्त्यांवर उष्ण तापलेले निखारे. घामाच्या धारांमधे भिजलेली माणसे
हजारोंनी वहाने, मॉल, मेट्रो मधे..
इंच इंच जागा भरलेली, दाटीवाटी आणि गर्दी अनंत पटीने वाढलेली
पण शहराने त्यातही तुमचा निवारा तसाच राखून ठेवलेला आहे.
शहराशी तुम्ही बेवफ़ाई केलेली असली तरी ते तुमच्याशी एकनिष्ठ
याबद्दल उद्या शहराचे आभार मानायची नोंद टू डू लिस्टमधे केलेली आहे
मध्यरात्री मळकट अंधारे शहराचे छत पहात तुम्ही बाल्कनीत उभे असता
शहर बेवारस होतं तुम्ही इथे नसताना असा एक भ्रम उगीचच मनात उच्चारता
दिवसभर तापून निघालेलं शहर अजूनही वाफ़ारलेलेच आहे
पूर्वीही असायचं तसंच. ही एक उगीच न हरवलेली गोष्ट मिळाल्याचा आनंद.
समुद्र शोधायचा आहे उद्या
अजून एक नोंद.
परत आल्याची खुशी, मजा, आनंद
नेमकं काय काय आहे मनात
तुमच्या आणि शहराच्याही हे तुम्हाला आत्ता नेमकं कळत नाहीय
आता इथेच रहायचं आहे, उद्यापासून एकमेकांसोबत ही जाणीव
शहराच्या आणि तुमच्या हृदयात धडधड वाढवते आहे.
पण तुम्ही आश्वस्त आहात.
कायम वर्तमानात जगणारे हे शहर तुमचा भुतकाळ खोदायच्या भानगडीत पडणार नाही
भविष्याचे बोगदेही उपसणार नाही
ऐन उन्हाळ्यात
पुन्हा या शहरात परतून आलेल्या तुम्हाला इथे गारवा मिळणार आहे
याची खात्री शहरात येण्याआधी पासूनच तुम्हाला आहे.
त्यामुळे.. भेटत राहूया.
इथेच. या शहरात.


Tuesday, July 22, 2008

(स्टुडिओ)

सिस्टाईन चॅपेलाच्या छतावर द लास्ट जजमेन्ट मायकेल ऍन्जेलो सलग तिन वर्ष रंगवत होता.पण त्यानंतर उरलेलं फ़्रेस्को करताना मात्र तो कंटाळून गेला.
त्याच्यातली उर्मीच कुठे तरी गळून पडल्यासारखी झाली.
तरी तो काम करतच होता.
आकृत्या मनाप्रमाणे उमटत नव्हत्या.त्या चुकलेल्या फ़िगर्सवर सतत प्लास्टर एकावर एक भरुन तो त्या दुरुस्त करत राहिला. आणि अर्थातच हे करत असताना तो सुखी नव्हता.
काय करावं ह्या फ़्रेस्कोच्या कामाचं हा विचार मनात घेऊन तो आपल्या प्रेयसीबरोबर अशाच एका कंटाळवाण्या संध्याकाळी वाईनबार मधे गेला.तिथे झिंगलेल्या काही दारुड्यांचं वेटर्सबरोबर जोरदार भांडण सुरु होतं.दुर्लक्ष करत मायकेल बराच वेळ वाईन पित राहिला.असह्य झाल्यावर उठला.
तितक्यात जिन्यावरुन गुत्त्याचा मालक खाली आला.
काय तक्रार आहे तुमची? त्या मालकाने दारुड्यांना विचारलं.
वाईन खराब आहे.नेहमीची मजा नाही येतय.दारुडे बरळत म्हणाले.
वेटर मधे पडले आणि मालकाला सांगायला लागले की लक्ष नका देऊ तुम्ही.दारु फ़ुकटात रिचवण्यासाठी केलेली नाटकं आहेत.
मालकाने एकदा दरवाजाच्या दाराशी पोचलेल्या मायकेल ऍन्जेलो कडे पाहिले आणि तो त्या वेटर्सना म्हणाला,"दारु खराब असेल किंवा नसेल.चर्चा नको.बॅरेल रस्त्यावर ओतुन द्या.नविन वाईन उघडा आणि पाजा त्यांना."(मायकेलसारखं एक कलावंत गिर्हाईक वाईनबार मधून उठून जाण्यापेक्षा बॅरेलभरुन वाईन फ़ुकट गेलेली चालेल मला.मालक म्हणाला असेल कां नंतर वेटर्सना?

इकडे मायकल मात्र त्या घटनेतून एक वेगळच इन्स्पिरेशन घेऊन चर्चमधे परतला.वाईन खराब आहे?चर्चा नको.सरळ ओतुन द्या.
मायकेलने छतावरचं सगळं प्लॅस्टर खरवडून,तोडून काढून छत स्वच्छ केलं. नव्याने फ़िगर्स रचायला लागला फ़्रेस्कोसाठी. त्याचा गोंधळ संपला.

पूर्ण अंगभूत व्हावं लागलं तरच नवनिर्मिती सोपी होते.
पदार्थ बिघडत चालला तर तो फ़ेकून द्या.त्यात पुन्हा पुन्हा काही मसाले घालून सुधारणा करत बसू नका.
एखादा कॅन्व्हास जर चुकला तर तो जाळावा,कापावा आणि नविन घेऊन नविन खेळ मांडावा.. (सुभाष अवचट)


सिस्टाईन चॅपेलमधे काम करणार्या ऍन्जेलोची अननोन इन्स्पिरेशनची गोष्ट हवेत तरंगत रहाते.


-------------------------

नवनिर्मिती आधीच्या निर्मितीपेक्षा जास्त चांगली अथवा जास्त वाईटही होऊ शकते.पण निदान निर्मितीच्या प्रक्रियेमधला कंटाळा गेल्याचं समाधान तर मिळतं. शिवाय निर्मितीचा आनंद क्रिएटिव्ह असेलही पण उध्वस्त करायचा आनंदही समाधान (कदाचित जास्तच) देणारा असतो हेही कळतं.

खंडहर उध्वस्त केल्याशिवाय नवी नगरे वसवू नका.
रस्ते बांधायचे असतील तर डोंगर कडे उध्वस्त करायलाच लागतात वाटेतले.
आणि हो.. हे कसं विसरणार मी? For making an omelette eggs has to be broken..

------------------------------

नव्या घरी रहायला जाताना जुन्या अलमारीची साफ़सफ़ाई,आवराआवरी करायलाच हवी.शक्यतो त्यातलं काहीच बरोबर न्यायचं नसतं.अगदी ती जुनी अलमारीही नाही.भंगार मधे विकून टाकायची किंवा जुन्याच जागी कोपर्यात ठेऊन जायची.
कायमचं देशात परतायचा निर्णय घ्यायचा असेल तर नाही्च जमलं तर परत येऊ च्या कुबड्या आधी फ़ेकाव्या लागतात.

परतीचे दोर कापल्याशिवाय ती अशक्य वाटणारी उडी घेता येणं शक्यच होत नाही.

निर्णय छोटासाच असतो पण वेळेवर घेतला नाही तर मगजमारी किती होते!
अर्थात ह्या प्रक्रियेमधे केव्हढं शहाणपणही पदरात पडतं जातं हा ऍडेड बोनसच की.