Tuesday, May 12, 2009

वीकेन्ड.२

continued....

रेस्टॉरन्ट अगदी रिकामे होते आत्ता पण ब्रेकफास्ट करायचा अजिबात मूड नव्हता. तेव्हा चेक आउट करायला ती सरळ रिसेप्शनवर गेली. कोणी काही मेसेज सोडून गेलं आहे का विचारण्याचा वेडेपणा तिने मनात नसतानाही केलाच.
बिल खिशात घालताना मात्र तिला जरा टेन्स वाटलं. इतका अजिबात संपर्क नाही म्हणजे काही अपघात वगैरे तर नसेल झाला? नसेलच. नाहीतर रिसेप्शनमधल्या स्थानिक वर्तमानपत्रात तरी ती बातमी पहिल्या पानावर असती. तो काहीही कारणाने कायमचा सोडून जाऊ शकतो किंवा कदाचित त्याने हे मुद्दामही केलं असेल ही त्याच्या स्वभावाशी पूर्ण विसंगत शक्यता तिला नवीच होती तरी अतर्क्य वाटेना म्हणून मग ती नर्व्हसही झाली.

परतच जावं आता असा विचार रस्त्यावर येईपर्यंत तिने पक्का केला.

स्टेशनचा रस्ता कुठच्या दिशेने आहे ते न विचारताच तिने एक दिशा पक्की केली.
कालच्या रस्त्यांची दिशा कटाक्षाने टाळून.
इतक्यांदा त्यावरुन गेली होती काल ती की आता तो रस्ता मान वळवत भलत्याच दिशेला निघून जाईल परत एकदा त्यावर पाय ठेवला तर.

नवा रस्ता चढावाचा होता आणि आपल्या पोटात काही नाही याची जाणीव तिला थोडंच अंतर चालून गेल्यावर झाली.

कॅफेत बसल्यावर तिने आधी स्टेशन नक्की कोणत्या दिशेला आहे आणि परतीची ट्रेन किती वाजता आहे याची चौकशी केली. सकाळची गाडी निघून गेलीय आणि आता आहे ती संध्याकाळची हे ऐकून ती हताश झाली खरी पण मग एकदम तिच्या मनात आलं की दिवसभरात भेट नाहीच झाली आज, तर संध्याकाळच्या त्यांच्या ठरलेल्या ट्रेनला तो नक्कीच येणार.
त्या विचाराने तिला चांगल उत्साही वाटलं. उगीच टेन्शन घेतलय आपण सकाळपासून. हा तर साधा संपर्क तुटण्याचा प्रकार. आणि त्या दोघांच्या बाबतीत हे नवं कुठे होतं? कम्युनिकेशन, टच मधे रहाणे वगैरे शब्दांचे अर्थ ते दोघेही आळीपाळीने विसरतच आले होते त्यांच्या नात्यात.
मग आत्ता काय वेगळं झालय?

हात मागे लांबवत तिने एक मोठ्ठा आळस दिला आणि समोरच्या खुर्चीवर आपले पाय टेकवत ती खुशाल मागे रेलून बसली. किती दिवसांनी इतका निवांत वीकेन्ड मिळालाय आणि काय या गोंधळात आपण तो एंजॉय करायचच विसरुन जातोय.

नेहमीसारखा चहा न मागवता तिने त्याच्या आवडीची ( खरं तर तिच्याही) काळी कॉफी मागवली. आणि बोलमधे जास्तीची साखर. तिला चहा अगदी अगोड चालायचा पण कॉफी खूप काळी आणि खूप गोड. खूप म्हणजे खूपच. जास्तीत जास्त कडू आणि जास्तीत जास्त गोड असं तिचं कॉफीचं रसायन त्याला डिस्गस्टींग वाटायचं आणि तिला तो बघत असताना दोन, तिन कधी कधी तर चार सुद्धा एक्स्ट्रा सॅशे मागवताना एम्बरॅसिंग. मग ती चहाच मागवायची. पण खरं तर काळी आणि कडू कॉफी पिताना तिला खूप विचारी, परिपक्व वाटायचं. जितकी जास्त कडू तितकं जास्त विचारी. फक्त तिला तो कडूपणा गोड करुन प्यायला आवडायचा आणि हे त्याला समजावून सांगणं किती गुंतागुंतीच होतं! म्हणजे काहीजणं ऑपेराला जातात आणि मग तिथे झोपून जातात किंवा क्लासिक्सच्या पायरेटेड, पेपर बॅक आवृत्त्या वाचतानाही खुश वाटून घेतात तसं काहीसं आपलं कॉफीबाबत होतय हा तिला संशय होता.
एक्स्पिरियन्स मॅटर्स, इव्हन इफ यू डोन्ट एन्जॉय इट.
आपल्याला तसं वाटायला नकोय हे ती मनात म्हणत असताना तो त्याच्या त्या एकाग्र नजरेने तिच्या जास्तीतजास्त कडू आणि जास्तीतजास्त गोड कॉफी पिण्याकडे बघायला लागला की त्याला ते कळत का नाहीये हा तिला राग. त्याला काही कळू नये असं नाहीच फक्त तिने न सांगता त्याने ते कळवून घ्यावं या तिच्या मनातल्या अनेक अस्वस्थ आग्रहातलाच हा एक.
मग हे सगळं टाळायला शेवटी चहाच.

आत्ता दाट, काळ्या कॉफीच्या मगात साखरेचा तिसरा चमचा घालून ढवळताना तिला वाटलं एकदा त्याला सांगून टाकायलाच हवा तिच्या डोक्यातला हाही गुंता. सोपं होऊन जाईल कदाचित. जसं अगदी सुरुवातीला नाही कां विचित्रपणे अंगाखाली हात घेऊन वेडवाकडं झोपण्याच्या तिच्या सवयीबद्दल तो काय म्हणेल या धास्तीने ती त्याच्याबरोबर झोपायलाच नको नको करायची? आपण अगदी डीफॉर्म्ड दिसतो तसं झोपलं असताना ह्याची तिला इतकी खात्री होती की चुकून झोप लागून गेली प्रेम करुन झाल्यानंतर तर? ही काळजीच तिच्या डोक्यात. म्हणजे झोपेत काय जागेपणीही आपण स्टायलिश दिसायला पाहिजे असा तिचा आग्रह नव्हता कधी, तरी इतर मुली सेक्सी वगैरे दिसतात झोपल्या असताना आपण निदान नॉर्मल तरी दिसायला हवं इतकंच. लग्न झालं नाहीये तर एकत्र वगैरे काही नको रहायला असा तिने हट्टच केला. त्याने मानला मुकाट पण तरी एका पावसाळी दुपारी त्याच्या शेजारी नंतर झोप लागून गेलीच. त्यानंतरचा बराच काळ जाग आल्यावर दचकून अंगाखालचा हात काढून निट सरळ बिरळ होऊन झोपायची ती. पुढे समजलं कधीतरी की तिचं तसं झोपणं त्याला तिच्या इतर सगळ्याच गोष्टीप्रमाणे वेगळच वाटलं विचित्र नाही.
ते कळेपर्यंत त्याच्या काही वाटण्या न वाटण्याचं मनातलं टेन्शन ती विसरुनही गेली होती.

सहज समजून घेणं त्याला कठीण वाटत नाही हा त्यावरचा निष्कर्श मनात यायला मात्र ही आत्ताची अनोळखी शहरातली तो हरवून गेल्यानंतरच्या सकाळची वेळ यावी लागली!उशिरच म्हणायचा हा की केवळ वेळ यावी लागते हेच म्हणून टाकायच परत?
तिला ठरवता आलं नाही.

बाहेर खूपच ढगाळ होतं आणि आकाश राखाडी मळकट दिसत होतं.

कॉफीच्या कडू गोड घोटा दरम्यान मग तिच्या मनात येत गेलं की काय करत असेल तो आत्ता?त्याच्या आवडत्या ढगाळ हवेत एंजॉय करत फिरण्याऐवजी भटकत असेल तिला शोधत काळजी वाटून इकडे तिकडे? तिला थोडं गिल्टी वाटलं पण या हवेत त्याचा मूड फार काळ उदास रहायचा नाही तिला माहित होतं.
ती समोरच्या खुर्चीवरचे पाय खाली घेत सरळ बसली.
अशा हवेत तिला अंगाचं मुटकुळ करुन फक्त झोपावसं वाटे. किंवा पुस्तक वाचत बसावसं, कधी त्याची गाणी ऐकावसं. अर्थात वीकेन्डला अशी हवा पडली की तो तिला हमखास बाहेरच ओढून नेई आणि लांब लांब फिरत जाण्याच्या नादात ती गाण्याबिण्याचं विसरुन जाई.

किंवा हवा ढगाळ झाली की मग तिला तो सिनेमांच्या स्टोर्‍या ऐकवी. अगदी सविस्तर संवादांमधल्या पॉजेससहीत सांगायचा तो ते तिला आवडायचं. पण मग त्याची बोलण्याची गाडी तार्कोस्कीवर गेली की ती कंटाळून मुद्दाम लव्ह स्टोर्‍या ऐकायचा आग्रह धरायची. तो गोंधळूनच जायचा. त्याला काही त्या आठवायच्या नाहीत बहुतेक आणि मग प्रेम आणि नाती यात गल्लत करत हमखास तो बर्गमनवर यायचा. आयुष्य बर्गमन फिल्म्स सारखीच असतात बहुतेक असं वाटून ती नंतर बराच वेळ उदास गप्प रहायची.
गुंतागुंत नसणारी (आणि म्हणूनच) आनंदी, सुखी असणार्‍या नात्यांची आयुष्य याच्या आवडत्या सिनेमांतूनही कशी दिसत नाहीत हा विचार ती पुढचा सगळा वेळ करत रहायची.
मग फिरणं थांबवत मधेच झाडाखालची पाच फुलपाखरांची सलग उडणारी माळ पहाण्याचा (त्याच्या मते) बालिश हट्ट तिने त्यानंतर केला की तो मानायचा(ती गप्प झाल्यावर?)काहीच न बोलता.
रिकाम्या पोकळ्यांची भिती त्यालाही भेडसावत असणार बहुतेक.

काल कोणत्या विषयावर बोलत होते ते नक्की ..चालत असताना तिने आठवायचा प्रयत्न करुन पाहीला पण काहीच आठवेना. हरवण्याआधीचा यावेळचा रिकामा पॉज जास्तच मोठा होता का? तुटून अलग होण्याची प्रक्रिया ती त्या दुकानात शिरायचा खूप आधीपासून सुरु झाली असणार.
खूप आठवायचा प्रयत्न करुनही त्या रिकाम्या पोकळीच्या आसपासच ती भिरभिरत राहिली.
आणि मग तिला त्यांच्यात काय बोलणं चाललं होतं हे आठवून पहाणं महत्वाच वाटेना. परत भेटल्यावर तुटला होता तिथून संवाद सुरु व्हायला शेवटच्या शब्दाच्या जोडणीची काहीच आवश्यकता नव्हती त्यांना. लांबलचक रस्त्यांवरुन फिरत रहाताना ते दोघे ज्या विषयांवर बोलत रहायचे ते विषय कधीच महत्वाचे नव्हते बहुतेक.
त्याच्याशी बोलत रहाताना तिचा आतमधल्या स्वतःशी जो संवाद सुरु व्हायचा तो महत्वाचा. भलेही ती त्याला तेव्हा रिकामे पॉजेस म्हणत असेल.
नात्यांमधले नकळत्या अज्ञानाचे प्रदेश किती विस्तीर्ण असतात.
ते चालून पार करत इथपर्यंत पोचायला इतका वेळ जावा लागला.

मग त्यांच्यातल्या सार्‍याच संवादांमधल्या असंख्य तुटक ठिपक्यांची रेष सांधत सलग रेषेत उडत रहाणारी ती जुनी फुलपाखरं या ढगाळ हवेत नव्याने शोधून काढायला ती कॅफेबाहेर पडली.

बराच वेळ उलटून गेला.

पावसाळा नसूनही हिरवागार होता रस्ता.
त्यावरुन निरुद्देश एकटं भटकताना तिला अजिबात कंटाळल्यासारखं झालं नाही. कंटाळा आलाच तेव्हा तिने तो खुशाल अंगावर पांघरला आणि मोकळ्या आभाळाखालच्या गवतावर झोपून गेली.
जाग आली तेव्हा दुपार संपत आली होती.
रस्त्याचा शेवटचा चढाव चढून जाताना तिला आता स्टेशनचा रस्ता समोर दिसायला लागला.
वीकेन्ड संपला त्याच्याशिवायच.

चढावावर उभं राहील्यावर खाली एक तिरपं वळण घेऊन पुढे जाणारा तो कालचा रस्ता पहाताना त्यावर तो मागे काहीतरी सांडून पुढे जात चाललाय आणि आपण त्याच्या मागून जात ते गोळा करुन ठेवतोय हरवून जायच्या भितीने असा काहीतरीच भास तिला झाला.
त्या चढावावरुन त्याला एक आर्त हाक मारावीशी वाटली आणि तिला आश्चर्य वाटलं.
एकमेकांवाचून कित्येक वीकेन्ड दोघांनी वेगवेगळे घालवले होते. कधी कंटाळुन, बरेचदा मजेत. जीव तुटेपर्यंत केलेल्या भांडणांनंतरच्या वीकेन्ड्सना तर एकमेकांचं अस्तित्वही अमान्य करत स्वतंत्रपणे.
पण मग हे वेगळं का होतं?
की स्वतंत्रपणे म्हणता म्हणता कायम एकमेकांबद्दलच्या अपेक्षांची, पुर्‍या न झालेल्या मागण्यांची, नकारांची, आनंदी होण्याच्या, दिलेल्या होकारांच्या अशा सगळ्या ओझ्याची नाळ कायम जोडूनच होती दोघांना त्या सार्‍या वेगवेगळ्या आणि एकत्र घालवलेल्या वीकेन्ड्सला?
आज हरवून गेलय ते त्यापैकीच एक किंवा सारंच.
मग राहिलय ते काय आहे?की दोघांमधला तुटलेला संपर्क अजून एक पोकळी निर्माण करतोय. आणि संपर्कांपलीकडचाही तो उरलाय त्या पोकळीत.

चढाव कधीच आवडले नव्हते तिला. एकदम गळून गेल्यासारखं वाटायला लागलं. सांगायलाच पाहीजे त्याला भेटल्यावर की नेहमी चढाव टाळून लांबच्या असेना का पण सपाट रस्त्यावरुन चालायचा आग्रह धरणारी ती आ़ज तो नाहीये तरी इतका चढाव चढून आलीय.

याच शहराच्या एका भागात तो आहे आणि जवळच कदाचित विरुद्ध बाजूलाही, पण त्याच शहरात ती आहे. दोघेही आपापल्या पावलांनी रस्ते धुंडाळताहेत. आणि आज संध्याकाळी स्टेशनवर नक्कीच भेटणार आहेत ते. भेटल्यावर कितीतरी असेल आज तिच्याकडे त्याला सांगायला.

दुपार उलटून जाताना आकाश अगदी काळ दिसायला लागलं.

पाऊस सुरु होणार ही वाट उतरुन आपण स्टेशनवर पोचेपर्यंत. ती जराशी धावतच रस्ता उतरायला लागली. उतरताना तिला स्टेशनवर शेडखाली चिंब भिजलेला तो तिची वाट पहात असल्यासारखा समोर दिसायला लागला.
कोसळणार्‍या सलग धारांच्या मागून तिच्याकडे पहाणारा.
एकमेकांसमोर बसून आपापल्या विचारांच्या तंद्रीत रमून जाण्याच्या त्या त्या वेळी अवघड आणि नकोशा वाटलेल्या वेळा अनेक आल्या आत्तापर्यंत. आज त्यांचा अर्थ असणार आहे तिच्याजवळ त्याला सांगायला.

कसा घालवलास वीकेन्ड? विचारायचं का त्याला?
कदाचित नाही विचारणार कुणी आणि सांगणारही नाही.

फक्त तो यायला हवा.

बंद मुठीतल्या लोलकासारखा हा वीकेन्ड. हरवायची भिती वाटलीच कधी तरी तळहाताच्या स्पर्शातून ओळखून काढता येऊ शकणारा.
पुन्हा पुन्हा यावा आणि हरवून टाकावं त्याने दोघांनाही वाटेवरुन.

तिला त्यांची स्टेशनवरची भेट डोळ्यापुढे आणताना उगीच रोमॅन्टिक वाटलं.
त्यानेच सांगितलेल्या कॅसाब्लान्का मधल्यासारखं कदाचित.
फक्त रिव्हर्स.
दे वुड नेव्हर हॅव पॅरिस.


-------------------------------END-------------------------------

Sunday, May 10, 2009

वीकेन्ड

स्वतःच्याच तंद्रीत भरभर पावलं टाकत पुढे गेलेल्या त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात ती हसली. चालण्याचा वेग वाढला की ह्याचा एक खांदा नेहमीच किंचितसा वर उचलला जातो.
तिच्या नजरेच्या सरळ टप्प्यात त्याची उंच पाठ दिसत होती.

आपण चालायचा वेग वाढवला नाहीतर लवकरच हरवून नाहीसा होणार हा.

वेगात चालत अजूनच दूर जात चाललेल्या त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात असताना तिच्या मनात उगीचच आपण मुद्दाम अजून हळू चालावं असा एक खोडसाळ विचार डोकावला. बोलताना मधेच रिकामा पॉज काय आला दोघेही विचारात गुंतलो आणि गेला की हा तंद्रीत पुढे निघून.
आपण बरोबर आहोत ह्याचे भान विसरुन. नेहमीप्रमाणेच.

रस्त्यावरच्या इतर अनोळखी चेहरे आणि पाठींची गर्दी दोघांच्या मधे आता वाढायला लागली आणि तिने चक्क कंटाळा केला त्याला भरभर पावलं उचलत गाठायचा किंवा हाका मारून थांबवायचा.

ती होती तिथेच रेंगाळली. रस्ता संध्याकाळच्या सोनेरी उन्हाने न्हाऊन निघाला होता. आत्तापर्यंत त्याच्याशीच बोलण्यात गुंतून गेल्यामुळे आजूबाजूला लक्ष गेलं नव्हतं.
छान रंगिबेरंगी होतं की आजूबाजूला!

शॉप डिस्प्ले मधल्या त्या अप्रतिम निळ्या लेदरच्या शू पेअरकडे नजर गेली आणि तिचा श्वासच रोखला गेला. अगदी हाच रंग हवा होता किती दिवस. अभावितपणे त्याचा हात धरुन दाखवायला ती मागे वळली आणि तो नाही हे तिच्या लक्षात आलं.
ती काही क्षण थबकली.
पण आता तो खूपच दूर गेलाय. हाक सुद्धा ऐकू जाणार नाही असा विचार करत ती खांदे उडवत दुकानात शिरली. त्याच्या जेव्हा लक्षात येईल आपण बरोबर नाही किंवा मागेही नाही तेव्हा वळेल आणि येईल परत. किंवा थांबेल वाट पहात. अस्वस्थपणे तिची वाट पहात रस्त्याच्या कडेला उभा राहीलेला तो डोळ्यांपुढे दिसल्यावर ती जरा खुशच झाली.

पंधरा मिनिटांनी दुकानातून बाहेर पडल्यावर तो परत आला नाही अजून हे तिला जाणवलं.
कुठपर्यंत पोचला असेल हा? आपण मागोमाग येत नाही हे त्याच्या अजून लक्षातच आलं नसेल कां? शक्यता आहे.
त्याच्या त्या एकाग्र विचारातल्या मन:स्थितीत आपण प्रत्येक पावलागणिक तिच्यापासून जास्तच लांब जात चाललो आहोत हे त्याच्या लक्षातही न येणं अगदी शक्य आहे.
किंवा कदाचित तो रस्त्याच्या कडेच्या एखाद्या कॅफेमधे तिची वाट पहात बसला असेल. तसंच असेल. मगाशी ते जात होते त्याच दिशेला बाजूला नजर टाकत ती जायला लागली.
तिच्यासारखाच एखाद्या दुकानात तर शिरला नसेल काही घ्यायला? तिने ती शक्यता अगदीच झटकून टाकली. त्याला शॉपिंग हा प्रकार अजिबातच आवडत नव्हता. तिच्यावाचून तर नाहीच.
कुठे गेला असेल हा? चालायला बाहेर पडले तेव्हा कुठे खास ठिकाणी जायचं असं काही ठरवून ते निघाले नव्हते.

ह्या शहरात वीकेन्ड घालवायला म्हणून ते आले होते. किती दिवस ऐकून होते दोघेही या सुंदर शहराबद्दल. आज सकाळी लवकरच्या ट्रेनने ते इथे पोचले तेव्हा रस्त्यांवरचं निळसर पांढरं धुकं अजून पुरतं निवळलही नव्हतं. गप्पा मारत शहरात चिक्कार भटकून झालं. शहराच्या दोघेही प्रेमातच पडले. गेल्या अनेक महिन्यांत निवांतपणा असा नव्हताच. सततची धावपळ, व्यवसायांचा ताण, रुटिनची पुटं हे सगळे थर अलगद धुक्यात विरघळायला लागले.
दुपारी एका उतरतं लाल छप्पर असलेल्या रेस्टॉरन्टमधे ते जेवले आणि परत फिरायला बाहेर पडले. त्यांच्या बॅकपॅकमधे फक्त रात्रीपुरते कपडे होते बाकी काही फापटपसारा अगदी सेलफोनही त्यांनी मुद्दामच घेतला नव्हता. मित्राने रेकमेन्ड केलेल्या कोणत्यातरी हॉटेलात ते संध्याकाळी जाणार होते आणि ते चांगलं वाटलं असतं तर तिथे रहाणार होते.
तो चिडला असेल बहुतेक. तिच्या ह्या अशा मधेच आवडलेल्या दुकानात शिरण्याच्या सवयीवर तो नेहमीच वैतागायचा. रागवून रस्त्याच्या रेलिंगला टेकून उभा राहीलेला तो कुठे दिसतोय का म्हणून तिने दोन्ही बाजूला निट पाहीले.रस्त्याच्या मधोमध थांबून.
नव्हता.
आता मात्र ती चिडली. संताप पोटातून उन्मळून ओठांपर्यंत आला. एक दोन झणझणीत शब्दांवाटे तो बाहेर पडल्यावरही तिला समाधान वाटेना.
आपल्याला रस्त्याच्या मधोमध टाकून गेला हा? ते सुद्धा अशा अनोळखी शहरात? वेल, टु हेल विथ हीम देन. काही गरज नाही त्याला शोधत बसायची. मागच्या खिशात त्याच्या नकळत खुपसून ठेवलेले सिगरेटचे पाकिट उपसून काढत रस्त्याच्या कडेच्या रेलिंगला टेकून उभं रहात तिने भसाभस दोन चार झुरके मारले आणि आता थोडा सुसंगत विचार करता येईल अशा खात्रीने ती रीलॅक्स झाली.
छान गार वारा सुटला होता, ओलसर धुक्याचे पुंजके इथे तिथे लहरत होते आणि पहिल्यांदाच तो आजूबाजूला नाहीये ह्याचं हायसं वाटून तिने हातातली सिगरेट संपवल्यावर शांतपणे दुसरी पेटवली. तो नक्की चिडला असता आत्ता आणि अशा सोनेरी धुकाळ संध्याकाळचा शेवट त्यांच्या भांडणाने झाला असता.

अजून पुष्कळ उजेड होता. शहर अजून खूप पहायचं शिल्लक होतं. चालल्याखेरीज तिचं डोकं शांतही झालं नसतं.
म्युझियम. तिच्या डोक्यात अचानक विचार आला की आता हा नाहीये तर निदान ते बघता तरी येईल निट. तिला सकाळीच ते पहायचं होतं पण त्याने साफ नकार दिला होता. ही हेटेड म्युझियम्स.
पटकन फुटपाथवरुन उतरुन तिने टॅक्सीला हात केला.

पायाचे तुकडे पडेपर्यंत तिने म्युझियम पाहीलं आणि ते बंद व्हायची वेळ आली तेव्हा बाहेर पडली.
पायर्‍या उतरताना तिच्या दोन गोष्टी लक्षात आल्या. चांगलाच अंधार झालाय आणि मित्राने सुचवलेल्या ज्या हॉटेलात ते रहाणार होते त्याच नाव ती साफ विसरलीय. काहीतरी हील की पॅराडाईज होतं शेवटी?
तिने आठवायचा प्रयत्न सोडून दिला. असल्या गोष्टी तिच्या कधीच लक्षात नसायच्या. ते त्याचं काम.

दोन तिन रस्ते पार करत, दुकानदारांना, स्टॉलवाल्यांना विचारत दुपारी ते जेवले त्या चौकापर्यंत ती पोचली. मग तो नाहीसा व्हायच्या आधी ज्या रस्त्यावरुन ते फिरत निघाले होते त्यावरुन ती परत एकदा फिरुन आली.
खूप थकली. भूक लागली आणि डोळे मिटल्यासारखे व्हायला लागले तेव्हा चौकातल्या पोलिसाला विचारुन एका जवळच्याच हॉटेलात शिरली. हॉटेलचं रेस्टॉरन्ट फुल होतं तेव्हा अजून वाट पहायचं नाकारुन क्रेडीट कार्डावर रात्रीसाठी रुम बुक करुन वर गेली. गरम सूप आणि पिझ्झा मागवला. जेवली आणि इतकी दमलेली होती की सरळ झोपून गेली.

सकाळी जाग येताना पहिला विचार मनात आला की आता ह्याला कसे आणि कुठे शोधायचे? रिसेप्शनला कॉल करुन तिने शहरातल्या हॉटेल्सची नावं असलेली डिरेक्टरी मागवून घेतली. पण त्यातल्या कोणत्याच नावाने काही क्लिक होईना. मित्राला फोन करुन नाव विचारावे कां असा विचार मनात आला आणि तिने तो झटकून टाकला. तो कुठे आहे असं त्याने नक्की विचारलं असतं आणि रस्त्यात हरवला सांगणं फारच खुळचटासारखं वाटलं असतं.

शिवाय तो हरवलाय की ती हेही निटसं क्लिअर नव्हतं अजून तिच्या मनात.

------ क्रमश:----

Thursday, February 26, 2009

माझ्या आतली धारावी शोधून पहाताना.

ज्यु.कॉलेजमधे असताना पहिल्यांदा धारावी मधे गेले होते.लेदरच्या वस्तू तिथे खूप छान आणि स्वस्त मिळतात हे ज्ञान नुकतंच झालं होतं.इरॉसच्या बाजूच्या क्रॉसमैदानाबाहेर एकजण लेदरच्या ऍक्सेसरीज घेऊन बसायचा.त्याच्या कडच्या देखण्या हॅन्डबॅग्जमधली एक चामड्याच्या बारिक पट्ट्या चटईसारख्या विणून केलेली मोठी गोल झोला स्टाईल बॅग खूपच आवडली होती पण किंमत तेव्हाच्या दोन महिन्यांच्या पॉकेटमनीइतकी होती.

म्हणून मग धारावी.

अर्थातच तोपर्यंत घरुन कोणकोणत्या गोष्टी करायला परवानगी मिळते हे ठाऊक झालेलं असल्याने मी धारावीला जाणार आहे हे घरच्यांच्या कोणाच्या कानावर मी घालायची शक्यताच नव्हती.

शिवाय धारावी तशी अनोळखी नव्हतीच.दादरहून पार्ल्याला येताना तेव्हा माहिमचा बायपास नसल्याने सायनवरुनच यायला लागायचे आणि मग तो तीव्र गंध नाकात शिरला की गाडीच्या काचा वर करायची धांदल उडायची.इतक्या तीव्र घाण वासात माणसं चोविस तास कशी राहू शकतात याचं कुतुहल वाटायचं.मग खूप नंतर तो वास तिथे चालणा-या टॅनिंगचा हे कळलं होतं पण त्यावेळचा तो विशिष्ट वास धाराविचा म्हणजेच झोपडपट्टीचा म्हणून नाकात बसलेला.

बंद काचांमधूनही धारावी दिसायचीच.

माहिमच्या कचरा डेपो आणि डंपिंग ग्राऊंडवर कचरा गोळा करणारी मुलं दिसायची.ती आपापसात सतत मारामा-या करत असायची.ती धारावीची हे माहित होतं.दुसरी कुठली असूच शकत नव्हती.आमच्या इथे अंगण झाडायला येणा-या तेलुगू लक्ष्मीअम्माचा मुलगा धारावीत भंगाराचं काम करतो आणि खूप पैसे मिळवतो असं ती अभिमानानं सांगायची.माझी आजी तिला आमचे जुने टिशर्ट्स वगैरे द्यायची.मग गाडीच्या बंद काचांमधून धाराविची ती मुलं पहात असताना त्यातला कोणता लक्ष्मीअम्माचा ते ओळखण्याचा अजूचा आणि माझा खेळ असायचा. ज्याच्या अंगावर आपला जुना टिशर्ट दिसेल तो तिचा मुलगा असलं काहीतरी.तो अर्थातच कधीच दिसला नाही कारण सगळी मुलं सारखीच दिसायची आणि कुणाच्याच कपड्यांचा रंगही ओळखता यायचा नाही. तो दिसायचाच नाही.

धारावीची मुलं लोकल ट्रेन्समधेही भेटायची.ट्रेनमधे विकायला येणारे चिप्स,सळया वगैरे खायचं नसतं कारण ते धारावीत बनवलेलं असतं, रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांमधले च्युईंगगम्स गोळ्या मागायच्या नाहित कारण ते धारावीत बनतं याची दहशत मनात नक्की कधीपासूनची ते आठवत नाही पण आठवत नव्हतं तेव्हांपासूनच धारावीला असं अंगाबाहेर ठेवायला आम्ही शिकलो होतो.कुणीच मुद्दामहून शिकवलं नव्हतं.पण आम्हा सगळ्याच मध्यमवर्गिय मुंबईकरांच्या ते जणू जन्मत:च रक्तात भिनल्यासारखं.

लेदरच्या वस्तू विकत घेण्यासाठी मग त्यादिवशी अख्खी दुपार धारावीत घालवली.भरपूर खरेदी झाली. चर्चगेटच्या त्या एका पर्सच्या किंमतीत इथे पर्स,सॅन्डल्स,वॉलेट,बेल्ट इतकी खरेदी झाली.अजूसाठी एक लेदर जॅकेट घ्यायचा विचार केलेला पण घासाघिसीची कमाल मर्यादा गाठूनही किंमत जास्त होती आणि तितके पैसे उरले नव्हते.

मग त्या टपरी दुकानातला एक छोटा मुलगा म्हणाला दिदि थोडा और अंदर चलो.उधर आधे दाम मे मिलेगा.खरेदीच्या नादात आजूबाजूला काही पाहिलच नव्हतं.त्याच्या सोबत थोडं आतपर्यन्त चालून गेले आणि सगळी धारावी संपूर्ण बकालपणासह अंगावर चालून आली.असुरक्षिततेच्या एका लाटेसह. मग वाटेतले वेडेवाकडे पत्रे,काचा ओलांडत ज्या वेगाने मी बाहेर पडले होते तो वेग अजून पावलांना जाणवतो.

झोपडपट्ट्या तशा मुंबईत काही कमी नव्हत्या.बांद्र्याचा फ़्लायओव्हर झाला नव्हता तेव्हा कलानगरचा झोपडपट्टयांचा समुद्र टाळून पुढे सरकताच यायचं नाही.बोरिवली नॅशनल पार्क बाहेर किंवा लांब कशाला तेव्हा जवळच्या एअरपोर्टपाशीही काही कमी झोपड्या नव्हत्या. शिवाय कुठे सोलापूर वगैरेजवळच्या दुष्काळामुळे मुंबईत जगायला आलेल्यांची पालं जोगेश्वरी किंवा अंधेरी फ़्लायओव्हरपाशी पडायची. त्याही झोपड्याच होत्या.पण धारावी जशी सतत भेटत गेली तसं इतर कोणीच नाही.

कॉलेजच्या लास्ट इयरला असताना एका प्रोजेक्टच्या निमित्ताने धारावीत पहिल्यांदा आत पाऊल ठेवलं.तिथल्या कुंभारवाड्यातली सुबक देखण्या पणत्यांनी भरुन गेलेली गोल वर्तुळं,रंगिबेरंगी पतंगांच्या माळा,लालभडक सुकवत टाकलेल्या मिर्च्यांच्या आणि पिवळ्याधमक गोल पापडांच्या रांगा यांचे आम्ही घेतलेले फोटोग्राफ्स इतके देखणे होते की आमच्या प्रोजेक्टला पहिलं बक्षिस मिळालं.

त्या प्रोजेक्टच्या वेळी दिल्लीहून शिकायला आलेली एक मैत्रिण हमारे यहां शहर के बिच नही रहति इतनी गंदगी म्हणत नाक मुरडताना पाहिली तेव्हां पहिल्यांदाच प्रचंड राग आला.म्हणजे गंदगी आहे हे माहितेय.पण तु कशाला बोलून दाखवतेस आणि वर नाक मुरडतेस आमच्या शहराला. जा दिल्लीतच जाऊन कर तुझा प्रोजेक्ट असं तेव्हाचं फ़िलिंग लख्ख आठवतय.

अजूचं लग्न झाल्यावर प्राचीला घेऊन मी एकदा परत लेदरच्या वस्तूंसाठी तिथे गेले तेव्हा आता सायन स्टेशनबाहेरच त्या लोकांनी आपली दुकानं आणलेली पाहिली.धाराविच्या आतपर्यन्त जायची गरज नव्हती.दुकानात चिक्कार फ़ॉरेनर्स होते. मधल्या काळात धारावी आणि धारावीत येणारी माणसं बरीच बदललेली दिसली.प्राची इंदोरची होती.धारावी बाहेरुनच बघूनही ती खूपच थक्क झाल्यासारखी दिसली पण तशी ती सेंटॉरच्या लॉबीतल्या शॉप्सना बघूनही झाली होती.मुंबईबाहेरुन आलेल्या कोणाचीही ती टिपिकल प्रतिक्रिया तोपर्यन्त ओळखिची झाली होती.

नंतरच्या काळात कधी माझ्यासोबत सुट्टीत कोणी परदेशी मित्रमैत्रिणी यायचे तेव्हा धारावीत गेले होते काही निमित्तांनी. एथनिक फोटोसाठी हमखास कुंभारवाड्यात नेलं की तिथली सुरेख भांडी भुरळ घालायचीच.

मग अनुपम माझ्यासोबत मुंबईला आला तेव्हा त्याने तिथे जाऊन कातडी कमावताना वापरात येणा-या रसायनांच्या आणि डंपिंग ग्राउन्डवरील घातक मेटल,पा-याच्या प्रदुषणावर एक मोठं शूट केलं तेव्हा त्याची एडिटेड प्रिन्ट पहिल्यावर जबर धक्का बसला. ते तिथे होतच आधीपासून!आपली किती सिलेक्टिव्ह साईटींग असते आणि बघायला आवडत नाही ते बघायचं आपण किती बेमालूम टाळतो हे जाणवून बसलेला तो धक्का होता.कॅमेरा काहिच लपवत नाही.लपवलं नव्हतंच.त्याने ही डॉक्यू तिकडे देऊ नये असं पहिल्यांदा तीव्रतेने वाटलं.तसं त्याला सांगितल्यावर तु धारावीच्या मातीची भांडी बनवणा-यांवर पंचवीस मिनिटांची फ़िल्म खर्च केलीस त्यापेक्षा माझी बारा मिनिटांची फ़िल्म जास्त महत्वाची आहे,त्या लोकांसाठी सुद्धा.या आर्ग्युमेन्टवर बोलण्यासारखं काही नव्हतंच आणि ते पटलही होतं.पण अस्वस्थ वाटायचं राहिलं नाही ज्या दिवशी स्क्रिनिंग होतं तेव्हा पाहिलीय मी आधी असं म्हणत त्या सगळ्या ’बाहेरच्या’ लोकांसोबत बसून बघायचंही टाळलं.

त्यानंतर आत्ता स्लमडॉगमधून परत एकदा धारावी दिसली.
अक्षरश: दिसली.
चित्रपटातून धारावी दिसणं खरंतर आता नविन राहिलं नव्हतं.चक्र पासून सलाम बॉम्बे,सत्या अगदी धारावी नावाच्या सिनेमातून सुद्धा माधुरी दिक्षितच्या पलिकडेही ती दिसली होती.

एसडिएम मधेही धारावी या सा-या फ़िल्म्सप्रमाणे स्क्रिप्टचा एक भाग म्हणून दिसली.
पण दिसली ती धारावीतल्या सगळ्या जीर्ण,खडतर,अभावग्रस्त बकालपणासकट संपूर्ण.

डंपिंग ग्राउन्डवरचं त्यांचं जगणं,लोकल ट्रेन्स मधून काहीबाही विकणं,चोरी करणं,टपावरुन प्रवास,उन्हातानात पावसाळ्यात जगण्यासाठी धडपड,हॉटेल कॉल सेन्टरमधल्या फ़ुटकळ नोक-या,एखाद्याला सेवा पुरवण्याची गरज,लहान मुलांना पळवून भिक मागायला तयार करणे,दंगल,जाळपोळ यासकट दाहकपणे धारावी समोर दिसली.

जशी मला आत्तापर्यन्त दिसली होती काचेआडून किंवा कडेकडेने बाहेरून ती आणि जी दिसली नव्हती कारण मी पहायचं टाळलं होतं ती सुद्धा.
फक्त मलाच नाही माझ्याबरोबर सा-या जगालाही दिसली.

तिने मनोरंजन केलं आणि (म्हणूनच) खिन्नही केलं.

मातीचे दिवे आणि रंगित पतंगां पलिकडची धारावी सगळ्या जगाने बघितली म्हणून मला काय वाटलं?आणि काय वाटायला हवं होतं?

सिनेमा पाहून झाल्यावर मी खूप दिवस विचार करायचंच टाळलं.

सिनेमा चांगला आहे.पण अगदी ’पहायलाच हवा’ असं तीव्रतेने दुस-याला सुचवावसं वाटेल इतका काही नाहीये,पाच स्टार जास्तच झाले तीन ठिक आहेत इतपतच सावध प्रतिक्रिया देत गप्प बसले.

पण तरीही कुठेतरी मनातल्या मनात घरातलं दारिद्र्य,कमीपणा घरातच रहायला हवं होतं,ते बाहेरच्यांना मुद्दाम का उघडं करुन दाखवावं ही इन्स्टन्ट मधयमवर्गिय प्रतिक्रिया माझीही होतीच.

पण मग बाहेरच्यांना आत्तापर्यन्त मी सुद्धा धारावी काय कमी दाखवलि होती? जशी आणि जितपत मला दिसली होती,झेपली होती ती धारावी मी माझ्या कुवतीनुसार बाहेरच्यांना नव्हती दाखवली?
धारावी मुंबईच इतकं एक अविभाज्य अंग की मुंबई दाखवताना ती दिसणं अपरिहार्यच हेही माहित होतं.

मला धारावी चित्रपटातून दिसल्याची लाज वाटली होती कां? नाही.
धारावीतली जगण्याची धडपड लाचार किंवा लाज वाटणारी कधीच नव्हती.गेटवेला परदेशी लोकांसमोर हात पसरुन भिक मागणा-या मुलांना एका रांगेत उभं करुन त्यांचे फोटो काढताना एका परदेशीला पाहून झालेला जिवाचा संताप,वाटलेली शरम आणि घृणा एसेमडि मधल्या धारावीला पाहून नक्कीच वाटली नाही.

झोपडपट्टी,गरिबीच्या दर्शनाने बदनामी झाली असं वाटलं कां?
पण मग गरिबीचे प्रदर्शन काय आत्त्ताच झालेय?संयुक्त राष्ट्रसंघाचे कित्येक अहवाल,भारतातील कुपोषण,बालमृत्यू,रोगराई, दारिद्यरेषेखालची कुटुंबे,भ्रष्टाचार यातून आपली गरिबी जगाला कधीच कळलेली होती.लाज वाटायचीच होती तर तिकडचे मिशनरीज,सेवाभावी संस्था इथे येऊन काम करतात,औषधे अन्न कपडे वाटतात ते घेताना,पहाताना लाज वाटायला हवी होती.
आपले हिंसाचार, पोलिसी अत्याचार,भ्रष्टाचाराने भरलेले देशी सिनेमे परदेशातही दाखवले जातात,ते गाजतात तेव्हाही बदनामी झाली असं वाटायला हवं होतं.

पण मग आत्ताच कां?काय वाटतय मला?आपल्याच शहरातल्या धारावीला आता जगासमोर उघडे केलेले पाहून?

मला माझ्या खूप आत डोकावत त्या धारावीला पाहून मला नक्की काय वाटतय ते शोधायलाच हवं होतं.

आणि ते समजलं.माझ्यापरिने मी ते समजून घेतलं.

माझ्यात काही कॉम्प्लेक्सेस आहेत,काही न्य़ुनगंड आहेत.आणि ते कशामुळे आहेत,माझ्यातल्या कोणत्या उणिवांमुळे आहेत, किंबहुना ते आहेत याचा थांगपत्ताही कोणाला लागू न देता मी आत्तापर्यन्त जगले.तो लागलेला नाही या समजात जगले.तो न्यूनगंड लपवून इतर ब-याच माज करता येण्यासारख्या गोष्टींचा शो ऑफ़ करत सुखाने मस्तीत जगले.
आणि अचानक कोणीतरी त्यावर बोट टेकवलं, माझ्यातला तो आत्तपर्यन्त मी लपवलाय असा वाटलेला कॉम्प्लेक्स अचानक त्याने उघडा पाडला.मी दुखावले.मी संकोचले.

मी हे विसरले की त्या उणिवा होत्याच.माझा एक भाग म्हणूनच होत्या.आहेत.
माज करायचा,शो ऑफ़ करायचा तर त्या उणिवांसकटच करायला हवा नां?

लोकांसमोर इतर गोष्टी मिरवल्या अभिमानाने त्यात ती का लपवायची?माझाच एक भाग असलेली ती उणिव.
माझ्या शहरातली धारावी.
कसली लाज आणि कशाला राग.
तिच्यासकटच मी आहे.
ति आहे आणि तरी इतरही मी आहेच.

Sunday, February 15, 2009

टाईमपास: Part 1.

ऍट्रियाच्या डिव्हिडी सेक्शनचं गिफ़्ट कुपन मला मिळालं तेव्हां आपल्याजवळ अगदी हव्यातच असं सारखं म्हणत असलेल्या पण इतर खरेद्यांच्याच नादातच नेहमी अडकल्याने न घेतल्या गेलेल्या इतक्या सा-या डिव्हिड्या आपण घेणार तेही फुकटात च्या आनंदात "जा.. जी ले अपनी जिंदगी.." असं स्वत:लाच म्हणत तिथे धावत जाऊन मी तिथल्या त्या सगळ्या क्लासिक्स आणि रेअर कलेक्शन्सना उचलून घेतले खरे पण मग कळलं की गिफ़्ट कुपन फक्त शेमारुच्या ’बेस्ट ऑफ..’ सिरिजमधल्या गाण्यांच्या डिव्हिडिजसाठीच व्हॅलिड आहे. म्हणजे माझा खरंतर अमरिश पुरीने "J..JLAJ.. "म्हणत हात सोडून दिल्यावर शाहरुखच्या दिशेने उत्साहात धावत सुटलेल्या काजोलला ट्रेनच पकडता न आल्यासारखा फ्लॉप पडला.पण मी तसं काही दाखवलं नाही. शाहरुख नाही तर परमित सेठी असं म्हणत मुकाट सगळे क्ला.रे.वगैरे खाली ठेवत तिथल्या त्या सॉन्ग्ज कंपायलेशनच्या डिव्हिड्या उचलल्या (अल्मोस्ट न बघताच).

आता ह्या असल्या ’बेस्ट ऑफ..’ नावांच्या ऑडिओ/व्हिडिओ सीडीजच्या भानगडीत मी आधी कधी चुकूनही पडले नव्हते त्याचं दुसरं कारण पिरियड, मूड, मिनिंग कशाचाच कशाला ताळमेळ नसणारी गाणी एकमेकांशेजारी चिकटवलेली असतात आणि मुख्य कारण त्यातल्या दर दहा गाण्यांमागे जेमतेम दोन गाणी ख-या आवडीची निघतात जी पुन्हां पुन्हां किंवा मनात येईल तेव्हां ऐकाविशी वाटतात.

तर त्यादिवशी आणलेल्या डिव्हिडीज लावून बघायला काल रात्रीच्या मुहुर्त लागला.इंटरेस्टींग कलेक्शन होतं.बेस्ट ऑफ आर्डी/आशा/लता/रफ़ी/किशोर/सोनू/पासून बेस्ट ऑफ़ श्रेया-सुनिधी/कव्वाली/सुफ़ी/रेन सॉन्ग्ज/रोमॅन्टिक/होली(म्हणजे होळी)असे असंख्य (म्हणजे वीस)प्रकार होते.बघताना रमूनच गेले चक्क.सॉलिड टाईमपास झाला.जी गाणी आवडतच होती ती परत बघायला आवडलंच पण काही गाणी अशी होती की आधी ऐकताना कधीच आवडलेली नव्हती त्यामुळे कायम एफ़ेफ़ मोडमधेच बघीतली होती (म्हणजे नव्हतीच)ती गाणी बघतानाही काही न काही कारणाने जाम मजा आली.

बेस्ट ऑफ गुलजारही होतं.त्यात तर गाण्यांची विचित्र खिचडीच.यातली गाणी किशोर-लता-आरडीच्या बेस्टमधेही बरीचशी रिपिट होत होती. कितीतरी टिपिकल म्हणून कानाआड टाकलेली, एफ़ेफ़ केलेली गाणी ’त्याची’आहेतचा धक्काच होता.उदा. गुड्डी मधलं ते मोस्ट बोरिंग ’बोल रे पपिहरा...’किंवा आशिर्वाद का काय फ़िल्ममधलं ’इक था बचपन..’ असं कैद्याच्या वेशातल्या अशोक कुमारचं.आता खरं तर ही गाणी काय गुलझारची ’बेस्ट’ आहेत?त्यालाही आठवत नसतील आपण असली बावळट गाणी लिहिलित ते.

मात्र त्याची इतर (मधे मधे नाईलाजाने घुसडल्यासारखी)खरोखरच बेस्ट (म्हणजे माझी आवडती)गाणी बघताना खूप आवडलं. काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या.


१) तुम आ गये हो..नूर आ गया हैं... :

डिव्हिडीमधलं पहिलच हे गाणं. किशोर-लता-आरडी-गुलझार यांच्या असंख्य बेस्ट गाण्यांमधलं हे सर्वात साधसुधं (म्हणजे गुलझारचे ते फ़ेमस आडवळणांचे मेटाफर्स या गाण्यात अल्मोस्ट नाहीतच) पण तरी कधीही ऐकताना कधीही कंटाळा येत नाही. गाण्याचे शब्द साधे पण इफ़ेक्ट एकदम रोमॅन्टिक. जीने की तुमसे वजह मिल गयी है.. बडी बेवजह जिंदगी जा रही थी.. किती सिम्पल! n it gives yu every reason to be in love.

गुलझारचा आंधी मी त्याचा पाहिलेला सर्वात पहिला पिक्चर.टिव्हीवर.पाहिला तेव्हा लक्षात राहिली सुचित्रा सेन आणि संजिव कुमारची कमालीच्या इझमधली बेहतरीन ऍक्टिंग आणि अर्थातच गाणी.सुचित्रा सेनचं एन्ट्रीमधलं ते जिन्यावरुन तरातरा उतरणं.तिचा तो इस बार की अमावस नौ बरस लंबी थी ना?विचारतानाचा हस्की टोन! तिची ग्रेस.आणि त्याचं त्याच्या डोळ्यांतून थेट आपल्या आत पोचणारं प्रसन्न पण यात बरेचदा उदास असलेलं हास्य.

गाणं घेतलय टिपिकल बागेत.सुचित्रा सेन केस मोकळे सोडून,थिक आयलायनर आणि तिच्या अजिबात कोरीव नसलेल्या जिवणीवर कायतरीच शेडची लिपस्टिक लावूनही त्या साध्या निळ्या-पांढ-या ब्लॉक प्रिन्टच्या सिल्क साडीत इतकी सेक्सी दिसते जितकी मुनमुन किंवा रायमा आयुष्यात दिसल्या नाहीत!सुचित्रा सेनची डायलॉग डिलिव्हरी खूपदा सदोष असते.तिची एक्स्प्रेशन्स कधी कधी नाटकी वाटतात.उदा.ह्यातच संजिव कुमार तिच्या केसांत पिवळं गुलाबाचं फ़ुल खोवतो (हिन्दी सिनेमातल्या हिरोचं ते अलगद झाडावरचं फ़ुल तोडून सॉरी उचलून हिरॉइनीच्या कुठेतरी केसात बहुतेकदा कानांवरच चिकटवणं प्रकार इतका hhpv असतो ना!) तेव्हां सुचित्रा त्याच्याकडे मान वेळावत हसताना उगीच ओव्हरऍक्टींग मारते!

संजिव कुमार गाणी म्हणताना अनकंफ़र्टेबल असायचा असं म्हणतात.मला नाही कधीच तसं वाटलं.ज्यांना वाटलं त्यांनी या गाण्यात कहां से चले.. कहां के लिये ये खबर नही थी मगर.. असं म्हणताना उतारावरच्या एका पायवाटेवरून खाली येत (सुटलेलं पोट सावरत :P)हातांची तो जी कमाल हालचाल करतो ती पहावी.फ़िल्ममधे हे गाणं दोघांच्या अगदी तरुणपणातलं म्हणून असलं तरी प्रत्यक्षात दोघं चांगलीच प्रौढ वयाची असणार.ते दिसलं तरी एकदाही खुपत नाही.ही किमया त्यांच्या उत्कॄष्ट अभिनयाचीच.

किशोर-लता, आरडी-गुलझार, संजिव-सुचित्रा .. what fantastic pairs of talented artists!

तरीही ह्या गाण्याऐवजी मला ’तेरे बिना जिंदगी से.. ’ नक्कीच पहिल्या नंबरावर ’बघायला’ आवडलं असतं. त्यातलं दोघांचं ते मध्यरात्री चंद्राच्या प्रकाशात उध्वस्त खंडहरामधून आपल्या हातून कुठेतरी निसटून आणि मग हरवूनच गेलेल्या आयुष्याला शोधत फ़िरत रहाणं.. ते सुद्धा दुस-या दिवशीची सकाळ दोघांना परत दोन विरुद्ध रस्त्यांवर घेऊन जाणार आहे हे माहीत असताना.. दोघे शेवटि ज्या त-हेने एकमेकांच्या डोळ्यांमधेच ते निसटून गेलेलं प्रेम शोधताना पुन्हा विस्कटून जात हरवतात ते गुलझारच्या शब्दांत आणि आरडीच्या सुरांत पुन्हा पुन्हा बघावं असंच.

२) दो दिवाने शहरमें.. (घरोंदा):

गाण बरय पण बेस्टमधे दोन नंबरवर?संजिव-सुचित्रा वरुन एकदम झरिना-अमोल! काश्मिरच्या बागेतून डायरेक्ट सिमेन्ट-कॉन्क्रिटच्या ढिगा-यातल्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या स्लॅबवर.पण भुपेन्द्र-रुना लैलाचा आवाज सहीच!भुपेन्द्रचा काहीसा जड,खर्जातला आणि रुनाचा पातळ आणि जरा उंच पट्टीतला.रुनाची गाणी किती कमी आहेत पण तिचा आवाज नेहमीच अंगावर झिणझिण्या आणतो. भुपेन्द्रही तो”आबोदाना’ शब्द काय छान म्हणतो ..सावकाश लयीत.आपल्या होऊ घातलेल्या घराच्या स्वप्नात रमून गेलेले ते दोघे टिपिकल गुलझारी स्टाईलमधलं ’अंबर पे खुलेगी खिडकीयां.. खिडकीसे खुला अंबर होगा..’किंवा ’जब तारे जमींपर चलते हैं.. आकाश जमी हो जाता हैं.. उस रात नही फ़िर घर जाता वो चांद यही सो जाता हैं.. ’ गातात तेव्हां गोड दिसतात!शिट्टीच्या तालावर अमोल पालेकर झरिनाची पर्स हातात घेऊन ती झुलवत मस्त पावलं टाकतो.
ह्याचं फ़िल्ममधलं रुनाचं ’तुम्हे हो न हो मुझको तो इतना यकीं हैं मुझे प्यार तुमसे नही हैं.. नही.. हैं." गाणं खरंतर जास्त छान आहे आणि तेच इथे हवं होतं.

३) ये जिना है अंगुर का दाना.. :

खट्टामिठा पिक्चर बघायला छान असला कितीही तरी त्यातली गाणी गुलझार्स बेस्ट मधे घेण्यासारखी अजिबात नाहीत. मला गुलझारची ही या प्रकारची गाणी अगदी खूप वगैरे नाहीच आवडत.म्हणजे गोलमाल है भाई सब गोलमाल है किंवा सुन सुन सुन दिदी तेरे लिये एक रिश्ता आया है स्टाईलची (हेही ह्या बेस्ट मधे आहे btw :O).आजच पाह्यलेल्या बिल्लू बार्बर मधेही आहे नां तसच एक ’ये है बिल्लू भयंकर..”हुतूतू मधे ही आहेत तशी.
या गाण्यातलं ’घुमता पहिया गोल रुपैया..’मात्र झकास. गाण्याचं जाऊदेत पण खट्टामिठा मधे पर्ल पदमसी,अशोक कुमार आणि तो फ़ाटका रनजित चौधरी तिघेही बेस्ट.
एरवी कधीच -हितिक रोशनचा बाप न वाटणा-या (म्हणजे दिसण्याबाबत आणि ऍक्टींगबाबत)राकेश रोशनचा या गाण्यात एक डोळ्यांचा क्लोजप आहे तेव्हांचा त्याचा लुक आणि डोळे म्हणजे सेम -हितिक.

४)आनेवाला पल.. जानेवाला हैं (गोलमाल):

येस्स. हे गाणं परफ़ेक्ट. किशोरचा आवाज सही फ़्लो मधे लागलाय! हे गाणं ऐकताना मी तो ’खुशबाश’ शब्द अगदी कान देऊन ऐकते. शेवटचं कडवं मग परत तीन वेळा ऐकते. एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं.. वहां दास्तां मिली लम्हा कही नहीं ’गुलझार,आरडी,किशोर तिघांसाठी तीन वेळा.
बाकी ह्या गाण्यातल्या अमोल पालेकरचा तो मोस्ट क्रिएटिव्हली डिझाइन्ड व्हायब्रन्ट शर्ट(फ़्लुरो.रेड/ब्लॅक आणि वर निळ्या त्रिकोणी पट्ट्या),त्याचं ते बेलबॉटम घालून स्वप्नदृष्यात पळत पळत येऊन बिंदिया गोस्वामीला उचलून घेणं,त्याचा केसांचा बेबी राऊंड कट या गोष्टी परत परत ’ब-घ-त’ रहाण्यासारख्या:))

५) बोल रे पपिहरा... (गुड्डी):

शास्त्रोक्त सुरावटीतलं हे गाणं वाणी जयरामने म्हटलय छान तरी तिचा आवाज एका पट्टीनंतर डोक्यात जातो.त्यामुळे ऐकायला कधीच आवडलं नाही आणि बघतानाही बाकी गुड्डीमधे गोड दिसलेली जया ह्या गाण्यात त्या न झेपणा-या लाल बनारसी साडीत जे खोटं विचित्र जिवणी रुंदावून हसते ते तिच्या नंतरच्या सुद्धा कितीतरी फ़िल्म्समधे परत दिसलं आणि त्या एकाच कारणासाठी ती नंतरही मला कधीच आवडली नाही.ह्या गाण्यात जयाचा पदर जरा घसरला तरी स्वत:च कावराबावरा होणारा कोण तो बंगाली नट आहे तो बावळट पण तरी क्यूट वाटतो.जया नाही.शिवाय गाण्यातल्या प्रत्येक ओळीवर ती चेहरा कसातरीच ताणते.
गाणं (बहुतेक) कान्हेरी केव्हज मधे पिक्चराईझ केलय. आत गुहेतल्या कमी उजेडात दिसणारी भिंतींवरची लेण्यातली चित्रं, गुहेच्या तोंडातून बाहेर लांबवर दिसणारा समुद्र आणि पावसाची त्यावर कोसळणारी झड हे वातावरण मात्र छान वाटतं. तसंच ’पलकोंपर इक बुंद सजाये.. बैठी हूं सावन ले जाये... ’सुद्धा खूप छान!
गुलझारच्या बेस्ट मधे हे गाण कोणत्याच नंबरवर नाहीच खरं तर.

६) इस मोडसे जाते हैं..: !! बेस्ट!

हे गाणं सिनेमात फ़्लॅशबॅकमधे येतं.दोघांमधल्या नात्याचा पुरेसा उलगडा आपल्याला तोपर्यन्त झाला असतो पण त्यांना तेव्हां तो झालेला नसतो.
आपण प्रेमात पडलोय हे पक्कं माहीत असुनही स्वत:ला आणि परस्परांनाही त्याची कबुली द्यायला मन धजावत नाहीये. love/ apprehension च्या गुंत्यात सापडलेले ते दोघे भेटतात...

इस मोड से जाते हैं
कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहें...

कुठल्या कुठल्या रस्त्यांवरुन प्रवास करुन आपण दोघेही आयुष्याच्या ह्या वळणावर आता एकमेकांना भेटलो आहोत. ह्या वळणावरुन बरेच वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या दिशांनी जाताना दिसत आहेत.कुठला रस्ता निवडायचा??प्रश्न दोघांनाही पडला आहे. ह्यातले काही रस्ते 'तेज कदम'आहेत.कुणाच्या साथी वाचून ,सोबती वाचून सुद्धा तो पटकन काटला जाईल.पण काही रस्ते रमतगमतच चालायचे आहेत.एकमेकांच्या सोबतीनेच त्या वरुन चालण्यात मजा आहे.

त्याच्या मनात आलेले विचार ... किती वेगळे पण practical..

पत्थर की हवेली... एक भक्कम घर... एक मजबूत नातं.
शीशे के घरोंदे.. ह्या घराच्या भिंती आकर्षक आहेत खर्‍या पण जास्त ताणतणाव नाही सहन करु शकणार.. कधीही जराही adverse condition मधे नातं दुभंगून जाऊ शकेल.
तिनकोंके नशेमन... this one is doomed to fall apart.. किती कमकुवत,अल्पायुषी नातं!

ह्या तीन नात्यांमधून कोणता पर्याय निवडायचा?मार्ग असा हवा जो त्यांना अचूक,त्यांनी निवडलेल्या पर्यायापर्यंत घेऊन जाईल. विचारांच्या गोंधळातही कुठेतरी मनात एक विश्वास जरुर आहे.. ह्या सार्‍या रस्त्यांमधला एक रस्ता तरी नक्कीच त्यांना कायमचे एकत्र आणणारा आहे आणि तो त्यांना सापडणारही आहेच.

ये सोचके बैठी हूं.. इक राह तो वो होगीतुम तक जो पहूंचती है..

तो मात्र तिला परत सावध करतो. ....

एक दूर से आती है.. पास आके पलटती है

काही रस्ते फसवेही असू शकतात.मृगजळासारखे.मंझिल पर्यंत पोचलोत असं वाटेपर्यंतच परत पलटून दुसर्‍याच दिशेला खेचत नेणारे..

हे गाणं गुलझारशिवाय कोणाच होऊच शकत नाही.त्याच्या गाण्यातल्या त्या वाटा त्यांवरची वळणं आणि त्यावरुन जाताना नेहमी सामोरे येत रहाणारे भूतकाळ.या गाण्याचा अर्थ लावायला गेलं की नेहमी वेगळाच लागतो.कदाचित आपल्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे अर्थही वळत जातो.
आरडीला हिन्दी आधीच खूप कमी कळायचं.ह्या गाण्याच्या वेळी तर त्याने वाटांच्या जंजाळात हरवून गेल्यावर वैतागून गुलझारला विचारलं होतं आहे कुठे नक्की हे ’नशेमन’ शहर? अर्थ न उलगडताही इतकी अचूक सुरावट!

-------------------------------------------------------------------------------

well.. we will take a break here! End of Part 1

Monday, December 15, 2008

फ़िर पुकारो मुझें..फ़िर मेरा नाम लो...

दोन आठवड्यापूर्वी मी पेडररोडवरच्या रशियन कॉन्स्युलेट जवळ असलेल्या कॉलेजलेनमधे गेले होते. काहीशी अचानक.

आणि काल न रहावून पुन्हा गेले.
मुद्दाम.

रशियन कॉन्स्युलेट बाहेरच्या बसस्टॉपला अगदी लागूनच ती लेन आहे. पेडर रोडवरच्या वर्दळीपासून आणि एकदंरीतच झगमगाटापासून ती अख्खी गल्ली इतकी अलिप्त कशी राहू शकलीय याचं आश्चर्य वाटण्याइतकी तिथे भर दिवसाही नि:स्त्बधता असते. गल्ली निरुंद आहे. दोन्ही बाजूंना जुनी विस्तारलेल्या, वेड्यावाकड्या खोडांची, तर काही नंतर सुशोभिकरणासाठी मुद्दाम लावलेली सुबक गुळगुळीत झाडं आहेत. गल्लीत शिरुन पायी चालताना खाली सोफ़िया कॉलेजपर्यंत गेलेल्या कोप-यावरुन वळलेल्या रस्त्यावरची दाट शांतता लोटालोटाने वर सरकत थेट तुमच्यापर्यंत येऊन पोचत रहाते.

तुझ्या लक्षात राहिल अशी फ़ेअरवेल पार्टी देतो तुला असं ऑफ़िसमधल्या जुन्या मित्राने मला त्या दोन आठवड्यांपूर्वी कधीतरी कबुल केलेलं. मी (एकदाची) चालले अशा खुशीत तो जरा जास्तच होता बहुधा. त्यामुळे नुसतं नेतो इतकंच म्हणून तो थांबला नव्हता तर आदल्याच दिवशी इतर सगळ्यांची मिळून JBTB मधे जोरदार पार्टी झाल्यावरही दुस-या दिवशी लक्षात ठेऊन ऑफ़िसमधून स्वत:च्या गाडीत घालून मला घेऊन गेला. कधी नव्हें ते त्याच्याकडून पार्टी मिळतेयच्या खुशीत मी सुद्धा कुठे वगैरेच्या भानगडीत पडले नव्हते.

गाडी पेडर रोडवरुन कॉन्स्युलेटच्या त्या टिपिकल फ़ॉर्मिडेबल पांढ-या रंगाच्या आणि काळ्या भक्कम लोखंडी गेटच्या इमारतीसमोर आली आणि मी बोलत असलेले वाक्य अर्धवट टाकत खिडकीतून बाहेर डोकावत तिकडे पहायला लागले. खूप वर्षांनी मुंबईत येऊन असं सलग रहाताना मला आता उगीचच कोणत्यातरी कोप-यावर, वळणावर नाहीतर इमारतींच्या कुंपणांवर विखरुन पडलेले आधीच्या वर्षांचे तुकडे गोळा करत रहाण्याचा नादच जडल्यासारखं झालय.
त्या काहीशा कुरुप चौकोनी इमारतीमधे नक्की कोणता तुकडा अडकून राहीलाय आता हे तपासायची संधीच न देता झपाट्याने राईट घेत ’माझ्या लक्षात राहील’ अशा त्या जागेवर मित्राने पोचवूनही टाकलं.
पोचल्यावर उतरताना समोर पाहीलं आणि निरवतेच्या लोटामागोमाग एक मोठाच देजाव्हूचा लोट गल्लीच्या दुस-या टोकापासून थेट माझ्यापर्यन्त वर चढत आला.
आणि समोरच ते अजस्त्र, पुरातन, सरळसोट पारंब्यांची तोरणं हवेत झुलवणारं वडाचं झाड होतं. त्याच्या काळसर हिरव्या पानांमधून खाली पाझरणारी ती गडद शांतता!
त्या लेनची ओळख जागवणारा हा एक मोठाच आठवणीचा तुकडा तर मनात जसाच्या तसा होता. होता खरा पण तो नुसताच अधांतरी तरंगत असणारा. समोरच्या लटकत्या पारंब्यांसारखा.
मागचे पुढचे काहीच संदर्भ त्या तुकड्याला चिकटून राहीलेले नव्हते.

"माहीतेय रे मला ही जागा. आलेय मी इथे आधी" न रहावून मित्राला म्हटल.
"शक्यच नाही.”त्याचा इगो दुखावला बहुतेक. मुंबईत जन्मलेल्या माझ्याबद्दल त्याला बहुतेक जरा असूयाच होती आणि ती तो अशी आता मी इथे नसतानाच्या काळात मुंबई त्याने किती अंतर्बाह्य जाणून घेतलीय, माझ्यापेक्षाही जास्त हे दाखवायची एकही संधी न सोडून मधेच व्यक्त करत रहायचा.
"आलीही असशील या गल्लीत आधी कदाचित तु." तो नाईलाजाने म्हणाला." पण इथे नाहीच."
"हल्लीच झालय हे. तु तिकडे असताना."

शक्य आहे. नव्हें तो म्हणत होता ते अगदी खरं होतं. अंडर द बेन्यान ट्री अशी पाटी लिहिलेलं ते ओपन इटालियन स्टाईल रेस्टॉरन्ट मी पहिल्यांदाच पहात होते. सुरेख होतं. तासनतास निवांत घालवत बसून रहावं असं शांत. मुंबईत तर अशी फारच कमी ठिकाणं सापडतात त्यामुळे अप्रुपाचं सुद्धा. थोडाफ़ार अगदी पूर्वीच्या पृथ्वी कॅफ़ेची आठवण यावी तसा ऍम्बियन्स.

कॉलेजातली काही पिझ्झा स्लाईस आणि कोक साठी येऊन गेलेली मुलंमुली सोडली तर त्या दुपारी तिथे अजिबात वर्दळ नव्हती. वडाच्या झाडाखाली टाकलेली दगडी बाकं, स्वच्छ बांधून काढलेली फ़रसबंद जमीन आणि अप्रतिम मेनू.
त्या दुपारचं तिथलं लंच बराच काळ लक्षात रहाण्यासारखंच होतं यात काहीच शंका नाही. जेवण झाल्यावरही हातात वॉटरमेलन मिन्ट कूलिंग घेऊन आम्ही तिथे उगीचच रेंगाळलो. एक टीनएजर मुलगा कसलंतरी कंट्रीम्युझिक गिटारवर वाजवत आजूबाजूला वावरत होता. रेस्टॉरन्टवाल्याचं आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट असावं. मित्र त्याला हिंदी गाणी येतात कां वाजवता विचारत होता. त्याने जरासं चाचपडत एक वाजवायला सुरुवात केली. मित्राने शिट्टीवर ताल धरला.
"कोणतं रे?"
"ओळख की तुच. सोप्प आहे." तो काहीच क्लू न देता म्हणाला. जुनं होतं. अगदी ओळखीचं होतं. पण शब्दच आठवेनात. मला आज सारखंच असं ओळखीच वाटतय पण ओळखू येत नाहीचं फ़ीलिंग कां येतय या विचाराने आता चांगलच अस्वस्थ वाटायला लागलेलं.
"तु बस ऐकत. मी जरा गल्लीच्या टोकापर्यंत चक्कर मारून येते." शेवटी मी न रहावून म्हटलं.
मला माझ्या देजाव्हूचा थांग लावल्याशिवाय चैन पडेना.

पिन्स ऍन्ड कोम्ब्ज ग्रो अलॉन्ग ऑन धिस रोड ऍन्ड सो डू फ़्यू ब्राऊन स्ट्रॉ हॅट्स... ज्योचे उतारावरुन वेगाने धावताना सुटून पडलेले केसांमधले आकडे,पिना गोळा करुन आणताना टेडी गमतीने म्हणाला होता तसं मलाही मिळतील काही तशाच वस्तू जुन्या इथे सांडून गेलेल्या असा काहीतरी मजेदार विचार तो समोरचा उतार बघताना मनात डोकावला आणि हसू आलं.

"अगं काही नाहीये पुढे. कॉलेज आणि मग स्टर्लिंग अपार्टमेन्ट. आणि मग सगळाच ट्रॅफ़िक. जाताना तिथूनच जावूयात हवं तर." मित्र.
पण मी उठलेच.
दुपार उलटून बराच वेळ झाला होता. नोव्हेंबरची अखेर होती. दिवस संपणारच होता अजून काही वेळानी. वडाच्या त्या प्रचंड गर्द विस्तारातून वरचं आकाश काही दिसत नव्हतं.
नसेना का. तसंही माझ्या आठवतय पण आठवत नाही चे कोणतेच तुकडे त्या वर आकाशात लटकत असण्याची शक्यता शून्य असं म्हणत पण तरी वरतीच बघत मी काही पावलं पुढे गेले. वडाची लाल फ़ळं खायला आलेली बरीचशी पाखरं इथे तिथे दिसत होती त्या वरच्या फ़ांद्यांवरुन उडताना त्यांच्यावर नजर ठेवत.
इतर काही नाही तर निदान यांची नावं तरी ओळखता येताहेत का बघू असाही एक विचार मनात. पीजीला ऍडमिशन घ्यायच्या आधीच्या एका वीकेन्डला कर्नाळ्याला शेवटचं बर्डवॉचिंग केलेलं. त्याला किती निदान सहा सात वर्षं लोटली की. आठ बहुतेक. मग आता कशाला नावं आठवताहेत.
असले जरासे खेदाचेच विचार करताना अचानक वरचा वडाच्या एकमेकांत गुंतलेल्या वेड्यावाकड्या काळपट रेघोट्यांचा विस्तारच पुसल्यासारखा दिसेनासा झाला आणि त्या जागी माथ्यावर आला एक कोवळ्या लालसर सोनेरी प्रकाशानी भरुन गेलेला घुमट.
मी चकित होऊन जागच्याजागीच थांबले.
मान वर गोल फ़िरवत तो घुमट न्याहाळला. चकचकीत लख्ख घासलेले तांब्याचे घंगाळ डोक्यावर कोणीतरी उलटे करुन ठेवले आहे आणि त्यातून ठिबकणा-या कोवळ्या हिरव्या प्रकाशाच्या थेंबांखाली आपण न्हाऊन निघतो आहोत असा काहीसा भास करुन देणारा खुलत्या सांजेचा उजेड चहुबाजूंनी त्या तेव्हढ्या गोलाकारात कोंदून राहीलेला. .
आठवणींचे तुकडे वरच्या आकाशातूनच टपटप डोक्यावर गळायला लागले.

गडद हिरव्या कडांची,आतल्या बाजूने चमकत्या तांब्याच्या रंगाच्या पानांची हीच कॅनोपी वर पसरलेली. कोणतं झाडं हे? मी कुणालातरी विचारतेय. इथेच या झाडाखाली उभं राहून. अचानक नजर वर गेल्यावर अशी आत्तासारखीच चकित झालेली मी. याला कॉपरटीचं झाड म्हणतात. बोलण्याच्या ओघात तिने दिलेलं उत्तर ऐकताच माझी अजूनच चकित झालेली नजर पाहून एकदम खजिल होत ’सॉरी कॉपरट्री म्हणायचं होतं मला’ असं जीभ चावत म्हणणारी ती. आणि नंतर अर्धा तास खो खो हसत बसलेले आम्ही. कोणत्याही आचरट गोष्टींवर पुन्हां पुन्हां आठवून हसण्याचेच ते दिवस.

मघासपासून घट्ट दडपून राहिलेल्या काळ्या पडद्यातून काही तुकडे प्रकाशायला लागले.
मी पाय उंचावत त्या कॉपरट्री मागच्या भिंतीकडे डोकावून पाहीलं. कॉलेजचं गर्ल्स हॉस्टेल. इथेच बाहेर रस्त्यावर मारलेल्या गप्पा. बहुतेक एकदोनदाच असणार. ती मग वळून तिथे आत गेली होती आणि आम्ही समोरच्या बसस्टॉपवर बस पकडून घरी. पावसाळा होता तो हेही स्पष्ट आठवलं. अगदी ती तिथली ओली हवा अंगाला लागण्याइतपत.
पण मैत्रिणीचं नाव? काय नावं तिचं. मला नावं आठवेना. बसमधून घरी जाताना ग्रूपमधे कोण कोण होतं? चेहरे,आवाज समोर दिसत होते काहींचे पण बाकी नाव-गाव तपशील शून्य.

वडाच्या झाडाखालच्या त्या दगडी बाकावर बसलेल्या गिटारवाल्याचं अजून तेच न ओळखता आलेलं गाणं वाजवणं चालू होतं. त्याचे सूर खालपर्यन्त येत होते.

मी दोन्हींचा नाद सोडत त्या तांबूस प्रकाशाच्या चौकोनामधून बाहेर पडत पुढे गेले. आणि पुढच्या उतारावर गल्ली एकदम संपल्यासारखीच झालेली. अर्ध्यावरच. पूर्वी बहुतेक ती अजून पुढे जायची आता समोर टॅक्सीज आणि कारपार्किंग. मग नंतर पेडररोडवरच्या आलिशान इमारतींचा पुंजका.
पुढे जायचा विचार नाईलाजाने सोडत मी मागे वळले. आठवणींचा माग अर्ध्यावरच राहील्याची चुटपुट मनात.
वळताना सोफ़िया कॉलेजच्या बाजूच्या चिंचोळ्या गॅलीमधून रशियन कॉन्स्ल्युलेटचा मागचा भाग दिसला. आवारातलं भलमोठं जंगली बदामाचं झाड. कडेचं फ़णसाचं झाड. दोन्हींना काहीच विशिष्ट ओळख नाही. मग कंपाऊंड वॉलपर्यन्त आले. समोर ऑडिटोरियमच्या काचेच्या खिडक्या दिसल्या आणि एकदम एक गंधच आला मनात. काहीसा उग्र, मस्टी. दमट. एसी सुरु करायच्या आधी बंद ऑडिटोरियममधे येतो तो वास. विशेषत: पावसाळ्यात. त्या वासाबरोबर कॉन्स्युलेटच्या आत लावलेली हसरी रशियन कुटुंबांची, गोजिरवाण्या मुलांची, तिथल्या शहरांची, त्यांच्या प्रगतीची खास कम्युनिस्ट स्टाईलमधली चित्र, फोटोग्राफ़्सही आठवले. आवारातला पहिल्या मजल्यावरचा प्रोजेक्शन हॉल.
त्या आठवणीबरोबर देजाव्हू पझलमधला एक तुकडा व्यवस्थितच सांधला गेला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जॉईन केलेला फ़िल्मक्लब आणि या कॉन्स्युलेटमधे झालेला तो ऐन पावसाळ्यातला फ़िल्म-महोत्सव. कॉलेजातून शेवटची लेक्चर्स बुडवून काहीतरी अगदी महत्वाचं बघायला आल्याचा उत्साह. आणि मग त्या एका दिवसात पाहीलेल्या चार एकसे एक बोरिंग फ़िल्म्स. मग दुस-या दिवशी महोत्सवाला येऊन पहील्याच फ़िल्मनंतर मागच्या दारातून बाहेर पडून या गल्लीत वडाच्या झाडाखालच्या दाटगर्द विस्तारात भर पावसातही न भिजता उभं राहून दुपारभर केलेला टीपी आणि तिथल्याच चहाच्या स्टॉलवर अनेकदा प्यायलेला उकाळा.
ओ यस. त्या वडाच्या झाडाजवळ तेव्हां कोणतंतरी प्रोव्हिजन स्टोर होतं आणि त्याच्या बाहेर चहाची टपरी. त्याचंच रुपांतर झालय या सोफ़िस्टिकेटेड UTBTमधे.
मला आता दुसरा मोठा तुकडा सांधल्याचा इतका आनंद झाला की आठवणींचं कोंडाळ उलगडत अगदी त्याच वर्षांत जाऊन पोचल्याच्या आनंदात परत वरच्या दिशेने जायला भरभर पावलंही उचलली.

तसाही खूपच उशिर झाला होता.
गल्लीच्या वरच्या टोकाकडून मित्राच्या हाका आता कानावर यायला लागल्या. ट्रॅफ़िक लागायच्या आत निघणं भाग होतं. गल्लीत आता अंधार दाटेल लवकरच आणि मग त्या अंधारात सापडले होते त्यापेक्षा काही जास्त तुकडे सापडण्याची काहीच शक्यता नव्हती.
तरी ती मुलगी कोण? ग्रूपमधले बाकीचे कडांवरचे अजून धूसर राहीलेले चेहरे कोणाचे? ते छोटे तुकडे संदर्भाशिवाय विस्कळीत विखरुनच रहात होते.
परतताना त्याच विचारांच्या तंद्रीत असतानाही मी गिटारवाल्याच्या त्या गाण्याच्या सूरातला अंतरा एकदम आठवून बरोबर पकडला आणि विजयी मुद्रेने मित्राकडे पाहीलं. आता मुखडा? आमचा जुना खेळ. पण मी आता तो अर्धवटच सोडला. मला खरंतर काहीसं कंटाळायला झालं होतं.सापडलेत तेव्हढे सूर पुरेसे आहेत. अजून नाव-शब्द ओळ्खत बसण्यात काहीच अर्थ नाही असं वाटून.
घरी आल्यावर लक्षात आलं मित्राच्या ’लक्षात राहील अशा फ़ेअरवेलपार्टीच्या’ आनंदापेक्षा या धड लक्षातच नसलेल्या आठवणींच्या तुकड्यांची रुखरुखच मनात जास्त लक्षात राहीलेली आहे. आत्ताच्या माझ्या आयुष्यात त्यांना काहीच महत्व नसूनही. तसं कोणत्याच आठवणींना नसतं म्हणा. आणि माणसांपेक्षा, स्थळं, घटना, प्रसंग, इमारती अशा निर्जीव गोष्टीच मला सहजतेन आठवत असतात हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव काय मला माहीत नव्हता?

खूप वर्षांनी स्वत:च्या शहरात, स्वत:च्या घरात परतून आल्यावर सगळचं मागचं आयुष्य सहजतेनं आपल्याजवळ येऊन भिडतं असं होतंच नसतं कधी. ते असं तुकड्यांमधे विखरुन, हरवून, पसरूनच रहातं चोहोबाजूंना. मग ते दिसले तरी धावून गोळा करण्यात खूप एनर्जी खर्च करण्यात खरंच अर्थ नसतो. त्यांच मिळून होणारं चित्र अजिबातच आपल्या जुन्या घरासारखं, शहरासारखं, आयुष्यासारखं नसतं हे असे कित्येक तुकडे वेचून एकत्र केल्यावर आणि मग पुन्हां टाकून दिल्यावर हताशपणे लक्षात येतं.
कोणीतरी म्हणालेलं कितीही सिनिकल असलं तरी किती खरं आहे!
Yu can never go home again!

म्हणूनच त्या दोन आठवड्यांनंतर वेळ मिळाल्यावर काल परत तिथे जाऊन आले.
उगीचच.
त्यादिवशी न सापडलेलं काहीच शोधलं नाही.
मुद्दाम.
आणि मग हे लिहावसं वाटलं.
तेही उगीचच.

Thursday, November 06, 2008

इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..

किरण नगरकरचं ककल्ड वाचून संपवलं.
पुन्हां एकदा तो दोन स्त्री पुरुषांच्या दरम्यानचा अनाम नात्याचा वेध.

अव्यक्ताच्या मागे कुठल्या अनावर आकर्षणातून जात रहातो आपण!

स्त्री पुरुषांच्यामधे अनपेक्षितपणे कधीतरी जे शब्दांत मांडता येत नाही, नात्यात बांधता येत नाही आणि उलगडत नाहीये म्हणून गुंतणं सोडूनही देता येत नाही असं काहीतरी रुजतं आणि ती अपरिहार्यता पुढे जाऊन जीवघेणी ठरणार आहे हे उमजूनही तिचा वेध घेत राहण्याचा मोह नाही टाळता येत.

भल्याभल्यांना नाही टाळता आला.

खूप वर्षांपूर्वी रविन्द्रला जांभूळ आख्यान पाहीलं होतं.
विठ्ठल उमपांच्या त्या सहा फ़ुटांच्या काळयारोम रांगड्या देहातून साकारत गेलेले द्रौपदीचे ते विभ्रम! पाच पांडवांच प्रेम आणि कृष्णासारख्या सख्याचं मैत्र मिरवणा-या पांचालीचं एका दुपारी घरात कोणी नसताना अचानक पांडवांची खुशाली विचारावी म्हणून आलेल्या कर्णाला एकांतात समोर बसलेला पाहून याच अनाम आकर्षणाच्या भोव-यात खेचलं जाणारं आणि मग त्यातच अडकून हिंदोळे घेत राहिलेलं मन..
तिचं विभोर रुप निटसं समजण्याचं ते वय नव्हतं.
पण "कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं.. " .. ऐकताना ती कोणत्यातरी अशाच अव्यक्तामागे आकर्षित होतेय हे त्यातल्या कृष्णाला जितक्या स्पष्टपणे उलगडत गेलं तितक्या स्पष्टपणे नाही कदाचित तरी अस्पष्ट नाजूकतेने मनाला स्पर्शून गेलं होतं.

प्रेम आणि आकर्षणा दरम्यानच्या याच कुठल्यातरी अज्ञात प्रदेशामधली वाट चालून जाणारे मग पुढे अनेक जण भेटले.

जमिनदाराची छोटी बहू आणि तिच्या त्या सरंजामी वाड्यातला अनाहूत पाहुणा भूतनाथ याच अव्यक्ताचे गुलाम बनताना पाहिले.
जबाच्या प्रेमात आधीपासूनच असलेला भूतनाथ आणि पतीवरच्या आंधळ्या रुढीबद्ध ’प्रेमात’ जखडली गेलेली छोटी बहू.
त्या दोघांमधला तो अनाम, अव्यक्त आणि म्हणूनच अपूर्व वाटलेला कोवळा भावबंध.
निरपेक्ष नव्हता अगदीच पण नितळ होता.
निव्वळ गोडगोड नव्हता. त्यात भांडण होतं पण दुरावा नव्हता.
ते दोघे एकमेकांचे कोणीच नाहीत. त्यांच्यातलं नातं मालक-नोकराच नाही, मित्र-मैत्रिणीचं नाही, भावा-बहिणीचं नाही, देवर-भाबीचं नाही, प्रियकर-प्रेयसीचंही नाही आणि तरी एकमेकांवरच्या अपार विश्वासाने, उत्कट जवळिकिने बांधले गेलेले ते दोघे.. इतके जवळ की तिच्या अंत:पुरात सहजतेने येऊन तो तिच्या एकटेपणात सोबत करु शकत असलेला, तिला तिच्याच पतीला वश करुन घ्यायला उपयोगी पडेल म्हणून मोहिनी सिंदूर ची चिमुट तिच्या भांगात भरु शकणारा.
आणि सा-या जगापासून दडवून, लपवून ठेवलेलं पतीबद्दलचं काळिज फ़ोडणारं दु:खं त्याला मोकळेपणाने सांगणारी ती. नव-याचे बाहेर पडणारे पाय धरुन ठेवण्याच्या अगतिकीतेतून मदिरा प्यायची वेळ येते तेव्हां ती आणुन द्यायलाही तिला हक्काचा वाटतो तो भूतनाथच.

जबा भूतनाथची प्रेयसी असते पण शेवटपर्यंत तो अधिकार मानतो छोट्या बहूचा आणि त्यासाठी जबाच्या वैषम्याची जाणिव होऊनही त्याची पर्वा तो करत नाही..
आपल्या हृदयातली छोट्या बहूची जागा प्रेयसीलाही अप्राप्य करणारा तो.
निर्माण झालेलं ते अनाम नातं समूळ तोडणं दोघांनाही शक्य नसतं. ते तसा प्रयत्नही करत नाहीत.

या निसरड्या वाटेवरुन चालताना त्यांचा तोल तर जाणार नाही नां चं टेन्शन बघणा-यांनाच.

पण मग एकदा तिलाच सावरताना या अस्पर्श नात्याला स्पर्शाची पहिली ओळख होते तेव्हां छोटी बहू इतकी क्रुद्ध कां होते?
खूप कठिण जातं हे कळून घेणं.
अव्यक्ताला सामोरं जायला न धजावणारं मन अचानक उघडं पडलं म्हणून? की तिचा पातिव्रत्यावर शिंतोडा पडल्याचा तथाकथित कांगावाच खरा होता?

त्याच्या आणि तिच्या मधल्या नात्याच्या प्रवासातलं अव्यक्त टिकवत रहाण्याचा हट्ट कधीतरी आपलाच बनून जातो.


स्त्री पुरुषांमधल्या या अनाम आकर्षणाची ही गुढ आणि रहस्यमय लिपी शारिर भाषेतूनच उलगडण्याचा प्रयत्नही पुढे पाहीला.
पण जणू काही या अनाम नात्याला स्पर्श झाला की त्यातली जादूच संपून जाते.
आभासी जगात मनानं कायम वावरणा-या त्या मायाचं कायम शारिरिक प्रेमातूनच व्यक्त होतं रहाणं आणि तरी एका हताश क्षणी ’ क्या सपनोंको छूनेसे इनके रंग उडने लगते है?’ हा प्रश्न पाडत नात्यांचा साराच प्रवास संपवून टाकणं!
एक अयशस्वीच प्रवास तो.


स्पर्शाचा शाप मिरवणा-या निष्फ़ळ नात्याचं हवय कशाला हे आकर्षण?




ककल्ड मधला नात्यांचा प्रवास तर थक्क करुन टाकणारा.

त्याच्या पत्नीचं दुस-यावर प्रेम असतं.
आणि म्हणून तो ककल्ड. व्यभिचारी स्त्रीचा पती.

जगाने त्याची हेटाळणी केली नाही पण सहानुभुतीचा धनी म्हणूनही इतिहासात नोंद केली गेल्याची दखल नाही.

स्त्री पुरुषांमधे असणा-या नात्याच्या कोणत्याच रुढ व्याख्येत न बसवता येणारं महाराज कुमार आणि त्याच्या पत्नीमधलं नातं.
परपुरुषाच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या आपल्या पत्नीबद्दलं त्याला वाटत राहिलेलं गुढ आणि रहस्यमय असं अनामिक आकर्षणाचं ते नातं.
वाचताना आपल्याला विलक्षण आकर्षून घेणारं. ही जादू किरण नगरकरच्या नेहमीच मोहात पाडत आलेल्या शब्दांच्या खेळाची की त्या नात्यातल्या अगम्यतेची हे मात्र नाही कळत.

महाराज कुमारने या त्याच्या रुढार्थाने पत्नी असलेल्या स्त्रीचा, कृष्णाच्या प्रेमरसात न्हाऊन निघालेल्या, सारं जग जिला मीरा म्हणून ओळखतं तिचा तिरस्कार करायलाच हवाय पण तरी तिच्याबद्दलच्या नेमक्या कसल्या अनिवार आकर्षणाच्या जाळ्यात तो अडकून पडलेला आहे?
आणि तिनेही दुस-यावर प्रेम करताना, शारिर प्रेमापासून म्हणून पतीला वंचित करत असतानाही त्याच्यावर याच अनाम नात्यातून गाजवलेला हक्क. त्याच्या इतर मैत्रिणींबद्दल तिच्या मनातला तो मत्सर!
तिच्या प्रियकराचा मुकाबलाही तो करत नाही.
ते अशक्य आहे त्याला माहीत आहे. कारण त्याचं अस्तित्व केवळ तिच्यापुरतंच.

आपली पत्नी असूनही अप्राप्य असणा-या तिच्याशी जर रत झालो तर उलगडेल आणि संपेल एकदाचं आकर्षणाचं गुढ कदाचित असं म्हणून महाराज कुमार एकदा त्या तिच्या भास-आभासाच्या सीमारेषेवर असणा-या मन:स्थितीचा फायदा उठवत तिच्या निळ्या प्रियकराचं रुप घेतो. तेव्हा कां कुणास ठाऊक पण आपल्यालाही त्याची कीव किंवा तिरस्कार नाहीच वाटू शकत.

अव्यक्ताच्या मागे अपरिहार्यपणे खेचला गेलेला महाराज कुमार.
काय आहे ते नक्की जे त्याला तिच्याबद्दल वाटतय हे त्याच्यासोबत आपणही शोधत रहातो. ते कोडं उलगडणारण नाही कधीच हे माहीत असूनही.



प्रेम आणि आकर्षणाच्या दरम्यानच्या या अशा कितीतरी जागा!सोडताही येत नाहीत आणि भरुनही टाकता येत नाहीत धडपणे अशा...


अव्यक्ताच्या मागे धावत जाऊनही त्याला स्पर्श करायला न धजावणारं एक मन स्त्री पुरुष दोघांकडेही असतं हेच खरं.
ते असतं म्हणूनच आकर्षण टिकून आहे हे कोण नाकारणार?

Wednesday, October 22, 2008

रेषेवरची अक्षरे..०८

----------------------------------------------------------------


पहिला दिवाळी अंक मनोरंजन वाचकांनी वाचला त्यानंतर आता एक शतक उलटलं. रेषेवरची अक्षरे हा कोणत्याही रुढार्थाने दिवाळी अंक नसलेला पण तरीही दिवाळीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी केलेला एक ब्लॉग्जसंकलनाचा प्रयत्न. लिथोप्रेस ते इंटरनेट अशा या शंभर वर्षांच्या प्रवासातलंच हे एक पुढचं पाऊल समजा हवं तर.

प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

Sunday, October 12, 2008

तेरे शहर में...

दिवस: मधलाच कोणताही
वेळ: दुपारची कंटाळवाणी



" हे घे."

रघूने स्वत:वरच खुश होतं जवळ येऊन माझ्या टेबलावर एनवलप टाकलं.
"मर रही थी पब्लिक. मैने तेरे लिये उठाये दो पास."


काचेबाहेरच्या लांबवर पसरलेल्या समुद्राच्या इतक्या उंचावरुन पहाताना अधिकच मलूल दिसणा-या फेसाळत्या पट्टीवरची नजर आत घेत मी कंटाळूनच ते उचललं.

तेरे शहर में.. गुलाम अलीची कॉन्सर्ट. उद्या संध्याकाळची.

"चल सोड. स्पॉन्सर करणारा क्लायन्ट माझाच. आयमिन पूर्वीचा माझा. आता असेल तुमचा कोणाचा. पण तेच स्पॉन्सर करताहेत आणि मी आलेली माहितेय दारुवालाना तेव्हां ते पाठवणारच मला."

"कुछ भी. दारुवाला नाहीचे आता पीआरला."

"ठिक आहे. मग माझ्या नावाचे नाहीत तर मी नाही जात. देऊन टाक रागा कलेक्शनचं कॅम्पेन जे कोणी बघतय त्यांना. तसंही बोरच होणार इथून ट्रॅफ़िकमधून ऑलदवे एनसिपिए पर्यंत जायला. "


आता मात्र रघू धक्का लागल्यासारखा खुर्चीवरुन उठला.
"गुलाम अली का कॉन्सर्ट ट्रॅफ़िक बोर होगा इसलीये छोडेगी तु?
मजा करत होतो यार मी. तुझे हुआ क्या है आज कल?"

" नको. मी पण मजाच करत होते. मला जाताच येणार नाहीये उद्या."

"..? "

"त्या तुमच्या नव्या मॅडमची वाट बघतेय अजून. प्रेझ चारलाच संपल्याचा कॉल केला मारे. पण अजून उगवली नाहीये. उद्या तर लागोपाठ दोन आहेत. म्हणजे अजून उशिर होणार हे उघड आहे."

"अरे तिचं काय तुला? ती येईलच ना. प्रोसेसलाही तिच देईल. प्रेझ चांगल देते ती. अकाउंटही छोटेसेच तर आहेत. ओकेच असणार. हुशार आहे ती."

"आहे हुशार तर स्वतंत्रच देत जा ना कॅम्पेन्स. माझ्या डोक्यावर कशाला तिचं रिपोर्टींग?"

"तुझ्या डोक्यावर काय? तुला असिस्ट करायला दिलय तिला. आत्ता कुठे इंटर्न संपलय तिचं. नुकतीच आली आहेस परत. आल्या आल्या तुला सगळेच आधीचे क्लायन्ट्स.. "

"जमणार नाहीत बघायला आता हो ना? म्हणून ते काल कॉलेजातून कॅम्पस इन्टर्व्यू देऊन घेतलेल्या मुलीला बघायला दिले."

"ओ कमॉन. तुझे तिकडचे सगळे ब्लूचीप तुझ्याजवळच तर आहेत. तुला हवेत कशाला हे चिल्लर?"


चिल्लर? .. खरं आहे. आत्ताच्या फ़क्त वर्ल्डवाईड रिलिजेस देणार्या क्लायन्ट्सच्या तुलनेत चिल्लरच.
पण हे मी इथे होते तेव्हाचे मुळचे माझे. माझे एकटीचे होते. काय काय केलेलं ते टिकवायला एकदा मिळाल्यावर.
आता बघू शकणार नाही असं का वाटावं कुणाला?

मी काहीच बोलत नाही बघून रघूही गप्प झाला. बहुधा माझा चेहरा चांगलाच पडलेला होता ते त्याने पाह्यलं असावं. .

बाजूच्या काचेतून दिसणा-य ढगाळ हवेत अजूनच मलूल वाटणा-या फेसाळत्या पट्टीकडे मलाही कुठे पहावत होतं?




ति धाडकन दार ढकलत आत यायची. काचेवर दोन्ही पंजे टेकवत. गडबड करत काहीतरी सांगायची परत बाहेर जायची. बाहेरचं डिपार्टमेन्ट आवाजात नुसतं बुडून गेलेलं. तिने ढकललेल्या काचेसोबत आवाजांचे काही तुकडे तेवढ्यापुरते आत शिरायचे मग तिच्याबरोबरच बाहेर जायचे. बहुतेकवेळा आत येतानाही तिचं फोनवर बोलणं चालूच असायचं आणि टेबलवर समोर येऊन बसली तरी संपायचं नाही. लोकल क्लायन्ट्स डोकं खायचे तिचं. हे हवय, ते का दिलं? शेकडो प्रश्न. तिचा लन्चही मग घाईघाईत कसल्यातरी फ़ॉलोअपमधे अडकून धावतपळतच व्हायचा किंवा राहून जायचा. आधी ऑफ़िसात असायची तरी कितीसा वेळ? असेल तितक्या वेळात फ़ुलपाखरासारखी भिरभिरत रहायची नुसती क्लायन्ट्सच्या तालावर.

ह्या आतल्या ओव्हरसीज सेलवर शांततेचा गडद तवंग पसरलेला. काही मोजकेच महत्वाचे क्लायन्ट्स. त्यांचे सैनिकी शिस्तीतल्या सारखे मिडिया प्लॅन्स वर्ष दोन वर्ष आधीच ठरलेले. जग इकडचं तिकडे हललं तरी त्यात तसूभरही जास्त कमी बदल नाही. त्यांची स्वत:ची क्रिएटिव,मिडिया डिपार्ट्मनेन्ट्स अद्ययावत. उगीचच या त्या कारणांसाठी सतावण्याचा प्रश्नच नाही. काही मेजर चेन्ज झालाच तर डायरेक्ट मिडिया चिफ़शी कॉन्टॅक्ट तेव्हा तोही त्रास नाही.

बाजूच्या काचेतून दूरवर दिसणार्या समुद्राच्या मलूल लाटांचे आवाज नसलेले हेलकावे मोजत नाहीतर कम्पूटर स्क्रीनवर उमटणार्या बिन आवाजी शब्दांचे खेळ खेळत बसायला वेळच वेळ असल्यासारखा.

त्या लांबवरच्या समुद्रापेक्षाही लांब गेल्यासारखे वाटणारे पूर्वीचे इथले दिवस..
ते सगळेच दिवस.. त्यावेळच्या माझे..

पीजी संपायच्या आतच जॉइन झालेले आम्ही दोघं तिघं इंटर्न्स. जोसफ एकटाच तेव्हा आख्ख मिडिया पहायचा. त्याची असिस्टंट किरण. आणि मग आम्ही. उगीच दहा दहा वेळा क्लायन्ट्सना फोन करत रहाणं. तिकडे जायचा चान्स शोधणं. जाणं. ब्रीफ़ आणणं. मिडिया प्लॅन्स बनवणं. टिआरपी डेटा अपडेट करत रहाणं. लास्ट इयर कॅम्पेन्सचे डिटेल्स काढणं. बजेटचे अंदाज घेणं. त्यावर पैजा लावणं. आणि संबंध नसतानाही आख्खी कॅम्पेन तयार होईपर्यंत प्रत्येक स्टेजमधे लुडबुड करणं. ऑडिशन्सना हातात कॉलशिट्स घेत हजर रहाणं आणि तिथे नुस्ती धमाल करणं. बाहेरच्या लाउन्जमधे बसलेल्या, बाहेरची जन्ता ज्यांना पाहून उह नाहीतर आह करते त्या एस्टॅब्लिश्ड मॉडेल्सना उगीच ऍटीट्युड दाखवत समोरुन निघून जाणं आणि मग आत आल्यावर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर खिदळत गॉसिप करणं. शूटला हजर राहण्यासाठी हज्जार कारणं शोधणं आणि बहुतेकवेळा जायला मिळायचंच नाही तेव्हां निषेध म्हणून ग्रूपने इरॉसला पिक्चर बघायला निघून जाणं आणि नेक्स्ट डे शिव्या खाणं. बॉसच्या मागे लागून लागून चॅनेल्स नाहीतर पॉश मासिकांच्या मिडिया पर्सन्सच्या अपॉइन्टमेन्ट्सना हजर रहाणं. तिथेही उगीच स्वत:च अर्धवट नॉलेज पाजळत मधे मधे करणं. एखादं किरकोळ अकाउन्टचं प्रेझेन्टेशन स्वतंत्रपणे करायला मिळालं की अगदी आकाशाला हात थाटात रंगिबेरंगी फ़ोल्डर्स, बॅग्ज आणि त्यात हजारो नोट्स कोंबून, सीडीजचा गठ्ठा घेऊन कसल्यातरी अफ़ाट आत्मविश्वासाने क्लायन्टच्या कॉन्फ़रन्सरुममधे पाय ठेवणं. ते ओके झालं की तेव्हां आम्हाला पॉइन्ट्स द्यायचे. मिडिया प्लॅन आख्खा पहिल्या फटक्यात पास करुन आणला तर बोनस पॉइन्ट्स. तसं कधीच व्हायचं नाही अर्थात. क्लायन्ट्सना कायमच आहे त्यापेक्षा वेगळं आणि बेस्ट हवंच असायचं. तरी उत्साह कधीच कमी व्हायचा नाही.. जोसफ सांगायचा. ज्या त्या डिपार्टमेन्टमधे डोकवत बसू नका. जॉब प्रोफ़ाईल कधीच निट बनणार नाही अशाने या फ़िल्डमधे. सगळं एकातएक गुंतलेलं रहातं. कोण कशाला ऐकायला बसलय.

आता किती आणि काय काय वेगळं?
एजन्सी पहिल्या दहात होतीच आता पाचात आली. ब्लूचीप क्लायन्टेल वाढलेलं. प्रोफ़ॅशनॅलिजम तर भरपूरच. या सेल मधून त्या सेलमधे कामाशिवाय आता सहजासहजी फ़िरताही येत नव्हतं. डिपार्टमेन्ट्ससुद्धा एकमेकांत सिक्रिसी बाळगायला शिकल्यासारखी. आपलं काम सोडून दुसरीकडे डोकवायचं नाही ही तिथली शिस्त आता खरंतर माझ्याच अंगात जास्त भिनलेली.
त्यात आता सिनियरपणाचा बसलेला शिक्का..



गुलाम अली चे स्वर कॉन्सर्ट ऐकायच्या आधीच मनात गुंजायला लागलेले..


हम तेरे शहर में हैं अन्जाने..

उनसे कोई भी कुछ नही कहता..
लोग आते हैं मुझको समझाने..

बिन तेरे कौन हमको पहचाने..
हम तेरे शहरमें..


कंटाळ्याची पुटं जास्तजास्त चढत चाललेली.

------------------------------------------------------------------
कंटाळा कंटिन्यूज.. (2)


दिवस: पुढचा
वेळ: दुपारची कंटाळवाणी



"ट्वेन्टीसेवन. कौन है अब? कम फ़ास्ट.
साईड प्रोफ़ाईल"

सत्तावीस नंबरवर आलेल्या मुलीने सराईतपणे साईनबोर्ड पोटाशी धरला. त्यावर स्वत:च्या मॉडेल कॉर्डिनेटरचे नाव तिनेच उठता उठता स्केचपेनने लिहून आणलेले. आपलं नाव आणि नंबर कॅमे-यात बघत सांगत तिने साईडप्रोफ़ाईल दिली.

"अर्रे यार.. कितने बडे झुमके है कान में. और सिल्क का चुडीदार बोला था. शाहना तु ठिकसे ब्रीफ़ देती नही हैं."
समोरच्या मुलीचा टरकोइज ब्लू अनारकली कट लेन्समधे पहात, फ़ोकस ऍडज्स्ट करत रघू कुरकुरला.
आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सव्वीस मुलींच्या वेळीही तो असाच काही ना काही कारणावरुन कुरकुरलेला होता त्यामुळे शाहना ने आपल्या अखंड धूम्रपानात व्यत्यय न आणता डाव्या हातातल्या पेनाने कॉलशिटवरच्या सत्ताविस नंबरवर नुसतीच काट मारली. आणि समोरच्या मुलीला हाताचं कोपरं वाकवून मनगट कॅमे-याकडे करायची ऍक्शन समजावून सांगितली.

" नंबर तिन का डायलॉग बोलने को दो उसे" रघू.

शाहनाने ओबिडियन्टली तिला वाचून दाखवलं. "पापा.. हाउ क्यूट! कितनी अच्छी घडी हैं. "

टरकोइज ब्लू अनारकलीने मनगट तिरकं करताना मानही पुढे करत तिरकी केली.

"अरे यार.." रघूची मान कॅमे-यामधून खटकन वर झाली.
"कट मार रे इसे. ट्वेन्टीएट को बुला." रघूने वैतागून बेन्जीकडे पहात खूण केली.

पण ट.ब्लू अनारकली आता डायलॉगमधे घुसली होती.
"थॅन्क्यू पापा.. मुझे बहुत पसंद आयी घडी. आप कितने अच्छे हो." त्यातल्यात्यात इम्प्रोवाईजसुद्धा.
बट रघू वॉज जस्ट नॉट इम्प्रेस्ड.

"घडी गर्दन में पेहनेवाली हैं क्या ये? नेक्स्ट."

बेन्जी आता मात्र पटकन उठला. "थॅन्क्स मॅम. फोटो छोड जाना. वी वील इन्फ़ॉर्म पलाश."



"ट्वेन्टीएट"

सिल्वर सिक्वेन्ड पतियाळा.
साईनबोर्ड.
साईडप्रोफ़ाईल.

मी कंटाळून घड्याळ पाहिलं आणि दचकलेच. सव्वातिन.
साडेदहा ते सव्वातिन. आणि फक्त अठ्ठाविसावा आकडा चालू. कॉलशिटवर शेवटचा आकडा बहात्तर होता. काय लांबवतायत हे लोक.


"रघू मला बोर झालय. मी निघते."

"अरे ठैर ना. आजही फायनल होगा तो कल शाम के प्रेझ तक पक्का बजेट भी दे सकेंगे. "
"सोड ना. इतकं करुन ते परत एस्टॅब्लोश्ड पाहिजेत म्हणून हट्ट करणारच उद्या." मला ते सगळच जुनं आठवून अजून कंटाळवाणं झालं.
"नाही करणार. फ़्रेश थीम आहे. सेवन्टीन टू नाईन्टीन मधे कुठले आलेत एस्टॅब्लिश्ड कोणी त्यांना मिळायला."

"नको पण मला कंटाळाच आलाय. तुम्ही कंटिन्यू करा. मी निघते."

"ओके. चल टी ब्रेक करते हैं. शाहना क~न कंटिन्यू."



वर्सोव्याचा स्टुडिओ २१.
बाहेरच्या लॉनवर मुलीच मुली. कॉर्डिनेटरअने बजावल्याप्रमाणे लेटेस्ट फ़ॅशन्सचे चुडिदार्स. फ़ेस्टीवल कॅम्पेनला साजेसे. बहुतेकींच्या कानात इयरप्लग्ज खुपसलेले आणि हातात सेलफोन किंवा सिग्रेट किंवा दोन्ही. एखादी पुस्तक वाचत बसलेली. कोणीच कुणाशी बोलत नसलेल्या. साहजिक आहे. फ़ियर्स कॉम्पिटिशन.
किती टिपिकल जुनंच दृष्य. काहीच न बदललेलं. एकेकाळी इतक्या एन्जॉय केलेल्या या ऑडिशन्स. आता त्यात काय होतं इतकं मजा वाटण्यासारखं हेच आठवेना. तिकडे हे सगळं परस्पर एजन्सी थ्रू व्हायचं एखाद्या तर किती काय मिस करतेय असं वाटायचं.

कां मजा वाटत नाहीये परत या गोष्टींमधे अजिबात? की हा आता माझा क्लायन्ट नाहीच आता तर त्याच्या ऑडिशन्समधे तरी काय इन्टरेस्ट असलं तर नाही मनात? दिवस बदललेत म्हणता म्हणता आपणच जास्त बदललोय कां?

"चहा नको. मी जाते. मला... "
"कंटाळा आला.. " माझ्या चेह-यावरचे भाव पाहूनच रघूने कंटिन्यू केलं. "मालूम हैं. तेरेसे येही एक सुनता हूं आजकल."

"..."

"क्या हुआ तुझे? दिवसभर ऑफ़िसात बसून बसून बोर होतं, सवय नाही चा जप सकाळपासून करतेस. आज इथे आलीस तरी तेच."
मला काय बोलावं खरंच सुचेना. असल्या जवळिकीच्या वाक्यांवर डोळ्यांतून पाणीबिणी यायचे दिवसही मागेच पडले होते बहुतेक. .. रघूही काही बोलला नाही. जाऊन चहाचा कप घेऊन आला.

"लिसन. हे ऑडिशन्स वगैरे मलाही बोरच होतं आजकाल. शाहनाच घेते सगळ्या. मला वाटलं तुला जरा मजा वाटेल म्हणून चल म्हणालो. एकतर तुझाच जुना क्लायन्ट. आणि तिकडे असताना म्हणायचीस सारखी हे मिस करतेय म्हणून.."

हं.

कितना एन्जॉय करते थे ना हम?

हो.

" तु घरी जाते आहेस कां?"
"आत्ता? चार वाजता? काय करायच आणि आत्तापासून घरी जाऊन? काम तु करणारेस का रात्री बसून?"
काम? कुठलं इतकं काम खोळंबून होतं ऑफ़िसात आता ते मलाही माहीत आणि त्यालाही.
उगीच आपलं सवयीचं म्हणून वाक्य बोललं गेलं होतं.

"चिडू नकोस. इथून जवळ आहे तुझं घर आणि गाडी जाताना मला लागेल म्हणून घरी जात असशील तर ऑटो कुठून पकडायची सांगितलं असतं. "
मी अजूनच इरिटेट झाले. पाच वर्षांपूर्वी हा कोईमतुरहून आला होता तेव्हां वेस्टर्न आणि हार्बर लाईनमधला फ़रक कळायचा नाही. त्याच्या ’कफ़परेड स्टेशन कौन्से लाईनपे है" वर तर आम्ही खो खो हसलो होतो क्रूरपणे. आणि वर परत " बॉम्बेसेन्ट्रल के बाद" असं सांगून अजून खिदळलो होतो. आणि हा मला आता वर्सोव्याहून माझ्या घरापर्यत जायला ऑटो कुठून पकडायची ते सांगणार.
माझ्या शहरात मी हरवून जाणारे जशीकाही.

"मी जाईन." आता हा पोचल्यावर फोनबिन कर म्हणूनही सांगेल म्हणून घाईघाईनेच बाहेर पडले आणि खरच हरवून गेले.

पूर्वी समोर मैदान होतं मोठं आणि मग बसस्टॉप होता. त्यापुढे कोळ्यांची वस्ती सुरु झाल्याचा वास लगेच यायचा. आता तिथे तसं काहीच दिसेना. बस्स्टॉप नजरेसही येईना. एक भली मोठी रो हाउसेसची आणि मागे बिल्डिंग्जची रांग. बाजुला अजून एक कमर्शियल कॉम्प्लेक्स. मी थोडं मागे मग पुढे चालून गेले.
कसल्याच ओळखीच्या खुणा नाहीत. एकही ऑटोरिक्षा जाईना समोरुन. एक दोन गेल्या त्यांनी बघून न बघितल्यासारखं दुर्लक्ष केलं. समोरच्या सोसायटीच्या वॉचमनला विचारलं बसस्टॉप किधर है तर मालुम नही इतके शब्दही तोंडातून न काढता खांदे उडवत मख्ख. जराशा रागातच त्याच्या समोरुन पुढे चालत गेले ती अजूनच कुठे गेल्यासारखं वाटलं आणि मग शेवटी रस्ता जातोय कुठे हे न कळून गप्प उभी राहिले भर रस्त्यात.
रिकामा रस्ता. अनोळखी.
आता बस, टॅक्सी नाहीतर ऑटो मिळणार कधी आणि कशी? मी ऑफ़िसात पोचणार कधी आणि तिथे जाऊन करणारे तरी काय?
भर रस्त्यात आता आपल्या रडू फ़ुटतय की काय लहान मुलासारखं याचा धास्तावाच अजून मनाला. अचानक तो सगळाच स्वत:चा इतका मोठा अपमान वाटायला लागला.
तितक्यात फोनची रिंग आली तर लक्षात आलं अर्रेच्चा विचारता आलंच असतं की खरंतर कुणालाही फोनवर. उगीच टेन्शन.
रघूच होता. गुलाम अलीच्या तेरे शहर में ची आठवण करुन द्यायला त्याने फोन केला होता.
सातपर्यंत पोचशील कितीही ट्रॅफ़िक लागला तरी आरामात. तेव्हा जा च. असं सांगायला.

मग त्यालाच विचारुन टाकलं की बाबा रे नाही समजतय मला हे शहर आता. सांग कशी आणि कुठून जाऊ की पोचेन लवकर आणि वेळेवर?


... continued 3


इतकं करुन कॉन्सर्टला पोचून तिथली सुरुवात चांगलीच कंटाळवाणी.
डोक्यातला जुना आवाज.. फ़िरत आणि गोडवा..
आणि आत्त्ताचं हे थांबत थांबत पुढे जाणं. निट न पोचताच अर्धवट सूर सोडणं. .
उगीच आलो असंही वाटण्यासारखं.
मुक्कामांवर पोचल्यावर सारेच किती बदलून गेलेले असतात, जुनी ओळखही पुसट होते याची जाणिव करुन देणारा एक हताशपणा कंटाळ्यावर मात होणारा.




हम तेरे शहर में आये हैं मुसाफ़िर की तरहा
सिर्फ़ एक बार मुलाकात का मौका दे दे..


इंटर्वलनंतर तेरे शहर में... अलगद पिसासारखं लहरत येऊन सुरु झालं.
सुरु झालं मात्र तो जुन्या मुरलेल्या मधासारखा गोडवा बेहोश करणारी भुरळ मनाला कधी घालायला लागला समजेचना.


मेरी मंझिल हैं कहां मेरा ठिकाना हैं कहां
सुबह तक तुझसे बिछडकर मुझे जाना हैं कहां
सोचने के लिये इक रात का मौका दे दे.. ..

मौका दे दे...

तेरे शहर में...



----------

खूप दिवसांनी, आल्यापासून पहिल्यांदाच कॉपिरायटर्स डेस्कजवळ थांबले.
अजून ट्रान्स्लेशनच चालतं का रिजनलला? उत्तर माहित असलेला खोचक प्रश्न विचारतानाही मजा वाटली. मराठी काही असलं तर सांगा रे मला.. पूर्वीसारखं सांगत त्याच डिपार्टमेन्टच्या आतल्या जिन्यावरुन वर जायलाही मजाच वाटली.


"कसा झाला तेरे शहर में.. बोर ? "

"बिल्कूल नाही. पण आता होणार. हे बघ.. "
रघूसमोर कागद फ़ेकला. होर्डिंग्ज डिटेल्स त्या नव्या बाईसाहेबांनी ओके करुन ठरवूनही टाकलेले.
रघूने मुंबईच्या त्या रोडमॅपवरचे ठिपके पाहिले आणि त्याच्याही सराईत नजरेतून फ़ोर्टमधल्या रस्त्यावरचा निळा ठिपका सुटला नाही.
पण तो हसायलाच लागला.

"छोड ना. तिला नसणारच माहित याचा अर्थ. जोसफ ने तुला तिन तास बसवून गिरवायला सांगितलेला मॅप तेव्हा तुला कुठे जाता जाता कळला. ती हेरिटेज बिल्डिंग आहे. होर्डिंग्ज नॉट अलाऊड हे समजावून सांग तिला." रघूने काचेतूनच हात करत तिला आत बोलावून घेतले.

-----



ती उत्सुक चेहरा घेऊन समोर उभी राहिलेली.
चमकदार डोळे.. सगळं शिकायला .. टिपायला उत्सुक. कालच्या आणि परवाच्याही तिच्या प्रेझेन्टेशनबद्दल मी एक अक्षरही अजून न बोललेले.. मला त्या बद्दल काय वाटतय.. माझ्या जुन्या क्लायन्ट्सना नवा मिडिया प्लॅन स्वत: बनवून दिल्यावर आणि तो पहिल्या फटक्यात पास झाल्यावर माझी काय रिऍक्शन याचा अंदाज तिच्या मनात बांधला जातोय हे जणू मला आपसुकच आतून कळलेलं..
तिचे माझ्यावर खिळलेले नुसतेच उत्सुक डोळे..

ती उभी होती समोर की मी उभी होते जोसफ समोर?


मला एकदम काचेच्या बाहेरच्या लाटांचा फ़ेस काचेवर धडका मारतोय की काय इतका जवळून ऐकू येतोय असं कां वाटायला लागलेलं.



अपनी आंखोंमे छुपा रख्खे हैं जुगनू मैने
मेरी आंखोंको भी बरसनेका मौका दे दे..


तेरे शहर में...


मी सहजासहजी हार मानणा-यातली नव्हतेच. प्रेझेन्टेशन चांगलं झालय, पहिल्या फटक्यात ओके झालय तर मिळतील माझ्याकडून पॉइन्ट्स. त्याचं काय इतकं?
"जा हे कळव आधी आत्ताच की साईट हेरिटेज आहे. वाट्टेल ते ऍग्री नाही करायचं. क्लायन्ट डोक्यावर चढला की चढलाच. मग ह्या अशा फ़ालतू होर्डिंग्जमधे असा फ़ुकट वेळ वाया जातो."

पण मला निट जोसफ सारखा स्टर्न आवाज काढून ओरडताच येईना. हसूच यायला लागलं.

रघूची चांगल्याच मोठ्ठ्या फ़्रिक्वेन्सीची शिट्टी मला ऐकू न जाणं शक्यच नव्हतं.


"मला वाटतय तु प्लेन जेलस आहेस तिच्याबद्दल." मला उचकवण्याचाही मौका तो सोडणं शक्यच नव्हतं.

"हो. अर्थातच" माझं इतकं तडकाफ़डकी उत्तर गेलं की त्याला बिचा-याला ती मजाच वाटली.

जेलसीच ती प्लेन.. तिची ती उत्सुकता, तो अधिरेपणा आणि तो उगीचच आत्मविश्वास. त्या पूर्वीच्या दिवसांतलं माझं सगळच आपल्या आत घेऊन वावरत असलेली ती. अकाउन्ट्स खरोखरच तर चिल्लर होते त्यापुढे.

शहर खरंच तिचं होतं.

ते जुनं माझं सुटलच.
आता लागणारे सगळे मुक्काम नवे. अनोळखी.

पण आता नव्याने ओळखी करुन घ्यायच्या तर कंटाळा तर खरवडूनच काढायला लागणारे इतपत उमगलच. तिच्याकडूनच हे शिकावं लागणार आणि आता बहुतेक.


काचेबाहेरचा समुद्र तापलेल्या उन्हात हलक वर येऊन तरंगत होता.



हवाएं तेज थी.. बारिश भी थी.. तुफ़ां भी था लेकिन..
तेरा ऐसें मे भी वादा निभाना याद आता हैं

तेरे शहर में...



"त्यांचा आवाज फ़िरत नाही रे आता पूर्वीसारखा, चढतही नाही. पण गोडवा काय आहे अजून!.. "

रघूचं लक्षही नव्हतं. तो कालच्या ऑडिशन्सच्या रिपोर्ट मधे पुरता गढून गेलेला.

------------------------------------------------------------------------------------

Tuesday, September 02, 2008

।। गणपती बाप्पा मोरया ।।

!! श्री !!

ओमकाररुपाय गजाननाय
सत्यस्वरुपाय ऋतंभराय
वाचाचतुष्काय परात्पराय!
सर्वादिबीजाय नमोऽक्षराय


॥ गणपती बाप्पा मोरया ॥
। मंगलमुर्ती मोरया

Tuesday, July 22, 2008

(स्टुडिओ)

सिस्टाईन चॅपेलाच्या छतावर द लास्ट जजमेन्ट मायकेल ऍन्जेलो सलग तिन वर्ष रंगवत होता.पण त्यानंतर उरलेलं फ़्रेस्को करताना मात्र तो कंटाळून गेला.
त्याच्यातली उर्मीच कुठे तरी गळून पडल्यासारखी झाली.
तरी तो काम करतच होता.
आकृत्या मनाप्रमाणे उमटत नव्हत्या.त्या चुकलेल्या फ़िगर्सवर सतत प्लास्टर एकावर एक भरुन तो त्या दुरुस्त करत राहिला. आणि अर्थातच हे करत असताना तो सुखी नव्हता.
काय करावं ह्या फ़्रेस्कोच्या कामाचं हा विचार मनात घेऊन तो आपल्या प्रेयसीबरोबर अशाच एका कंटाळवाण्या संध्याकाळी वाईनबार मधे गेला.तिथे झिंगलेल्या काही दारुड्यांचं वेटर्सबरोबर जोरदार भांडण सुरु होतं.दुर्लक्ष करत मायकेल बराच वेळ वाईन पित राहिला.असह्य झाल्यावर उठला.
तितक्यात जिन्यावरुन गुत्त्याचा मालक खाली आला.
काय तक्रार आहे तुमची? त्या मालकाने दारुड्यांना विचारलं.
वाईन खराब आहे.नेहमीची मजा नाही येतय.दारुडे बरळत म्हणाले.
वेटर मधे पडले आणि मालकाला सांगायला लागले की लक्ष नका देऊ तुम्ही.दारु फ़ुकटात रिचवण्यासाठी केलेली नाटकं आहेत.
मालकाने एकदा दरवाजाच्या दाराशी पोचलेल्या मायकेल ऍन्जेलो कडे पाहिले आणि तो त्या वेटर्सना म्हणाला,"दारु खराब असेल किंवा नसेल.चर्चा नको.बॅरेल रस्त्यावर ओतुन द्या.नविन वाईन उघडा आणि पाजा त्यांना."(मायकेलसारखं एक कलावंत गिर्हाईक वाईनबार मधून उठून जाण्यापेक्षा बॅरेलभरुन वाईन फ़ुकट गेलेली चालेल मला.मालक म्हणाला असेल कां नंतर वेटर्सना?

इकडे मायकल मात्र त्या घटनेतून एक वेगळच इन्स्पिरेशन घेऊन चर्चमधे परतला.वाईन खराब आहे?चर्चा नको.सरळ ओतुन द्या.
मायकेलने छतावरचं सगळं प्लॅस्टर खरवडून,तोडून काढून छत स्वच्छ केलं. नव्याने फ़िगर्स रचायला लागला फ़्रेस्कोसाठी. त्याचा गोंधळ संपला.

पूर्ण अंगभूत व्हावं लागलं तरच नवनिर्मिती सोपी होते.
पदार्थ बिघडत चालला तर तो फ़ेकून द्या.त्यात पुन्हा पुन्हा काही मसाले घालून सुधारणा करत बसू नका.
एखादा कॅन्व्हास जर चुकला तर तो जाळावा,कापावा आणि नविन घेऊन नविन खेळ मांडावा.. (सुभाष अवचट)


सिस्टाईन चॅपेलमधे काम करणार्या ऍन्जेलोची अननोन इन्स्पिरेशनची गोष्ट हवेत तरंगत रहाते.


-------------------------

नवनिर्मिती आधीच्या निर्मितीपेक्षा जास्त चांगली अथवा जास्त वाईटही होऊ शकते.पण निदान निर्मितीच्या प्रक्रियेमधला कंटाळा गेल्याचं समाधान तर मिळतं. शिवाय निर्मितीचा आनंद क्रिएटिव्ह असेलही पण उध्वस्त करायचा आनंदही समाधान (कदाचित जास्तच) देणारा असतो हेही कळतं.

खंडहर उध्वस्त केल्याशिवाय नवी नगरे वसवू नका.
रस्ते बांधायचे असतील तर डोंगर कडे उध्वस्त करायलाच लागतात वाटेतले.
आणि हो.. हे कसं विसरणार मी? For making an omelette eggs has to be broken..

------------------------------

नव्या घरी रहायला जाताना जुन्या अलमारीची साफ़सफ़ाई,आवराआवरी करायलाच हवी.शक्यतो त्यातलं काहीच बरोबर न्यायचं नसतं.अगदी ती जुनी अलमारीही नाही.भंगार मधे विकून टाकायची किंवा जुन्याच जागी कोपर्यात ठेऊन जायची.
कायमचं देशात परतायचा निर्णय घ्यायचा असेल तर नाही्च जमलं तर परत येऊ च्या कुबड्या आधी फ़ेकाव्या लागतात.

परतीचे दोर कापल्याशिवाय ती अशक्य वाटणारी उडी घेता येणं शक्यच होत नाही.

निर्णय छोटासाच असतो पण वेळेवर घेतला नाही तर मगजमारी किती होते!
अर्थात ह्या प्रक्रियेमधे केव्हढं शहाणपणही पदरात पडतं जातं हा ऍडेड बोनसच की.

Sunday, July 20, 2008

माझ्या पावलापाशी असंख्य उन्हं.

प्रवास,सिनेमे,मित्र,गाणी,पुस्तके,ऋतू आणि प्रेम हे सारे ह्या वीकेन्डला मला त्रासून कुठे निघून गेले तेव्हां मला आश्चर्य नाही वाटलं.होणार असतंच हे. ह्यावेळी थोड्या उशिराने झालं इतकंच. भल्या पहाटे त्यांना शोधायला जायचा विचार डोकावून गेलाही मनात. पण मग स्वत:तच परतायचा एक पर्याय निवडला. खूप दिवसांनी. सहजतेने.

-------------------------------------------------------------------------------------

पहाटे उठून जेव्हां खिडकीच्या काचेसमोर उभी राहतें तेव्हां रात्रीच्या शिल्लक सावल्यांचे काही तुकडे बाहेरच्या बदामाच्या झाडाच्या पावलांपाशी अजून रेंगाळतच असतात.
नेहमीप्रमाणे त्यांच्या फ़ांद्यांवर माझी झोप टांगून ठेवायला मी काच बाजूला केली तेव्हां त्या जुन्या बदामाच्या सशक्त दमदार फ़ांद्यांवर नेटकेपणाने विसावलेली निळी,मऊ पाने नाराज आळशीपणानेच हलली जराशी. आज रविवार आहे म्हणत.
काल मध्यरात्रीनंतर झोपायला गेले तेव्हां त्यांच्यावर हिरवा चंद्र नुकताच कवडसे शिंपडायला आला होता. अस्वस्थ विस्कटलेल्या विचारांच्या नादात मी ते नीट पाहिलेही नसतात.

मी काच तरीही अजून थोडी उघडते.
एक ताज्या,गार हवेची झुळुक फ़ांद्यांवरुन उड्या मारत घाई गडबडीनेच आत शिरते.सोनेरी कोवळ्य़ा सूर्याचे काही कण सोबत घेऊन.बाहेरच्या बाहेर ते टिपायला काही पाखरेही अचानक पानांवर दिसायला लागतात.आता सळसळण्यावाचून त्यांना गत्यंतरच नसते.

रोज ह्यावेळी मी प्रामाणीकपणे शूज चढवून बाहेर पडत असते.
पण आज नाही.

पावलांपाशी सकाळ साचायला सुरुवात होईपर्यंत मी आज तिथेच उभी रहाते.
मनात रात्रीचा अस्वस्थपणा अजूनही दाट काळ्या सावलीसारखा तरंगत आहे असं वाटतं.

मी काच संपूर्ण उघडते.सूर्याचे किरण आता घरभर पसरतात.
आता तरी प्रसन्न वाटायलाच हवं चा एक अट्टहास मनात उगवायला लागलेला.

मला उगीचच शुभा मुद्गलची प्रार्थनेची माझ्याजवळ असलेली सीडी लावाविशी वाटते.
पण मी लावत नाही.मनातल्या मनात ती आठवते कां पहाते.

फक्त सुरुवात थोडी आठवते. मी ती पूर्ण आठवायचा प्रयत्न करत नाही.
प्रार्थना मला मनापासून आवडतेही आणि नावडतेही. प्रार्थनेसारखं अपूर्ण काही नसतं आणि संपूर्ण काही नसतं असं वाटतं. माझ्यात आईचा नास्तीकपणा आणि आजीचा देवावरचा विश्वास अर्धा अर्धा विभागून आहे.
आजीची प्रार्थना आपणच आपल्या केलेल्या विनवणीसारखी वाटायची.आर्त.शब्दांची शांत,निरामय तेवणारी निरांजन लागल्यासारखं वाटायचं.
मी मग तिचीच एक प्रार्थना आठवते.ती सुद्धा थोडीशीच आठवते.पण तरी म्हणत रहाते.
आत कुठेतरी शांत वाटायला लागतं.
आपणच आपल्याला भेटल्यासारखं.
हरवलेल्या वाटेवरुन.

बाहेर काहीही शोधायला जायचा प्रश्नच उरलेला नसतो.

Thursday, June 26, 2008

ना छुटे लगान..

परत आल्यापासून आयुष्य काहीतरी वेगळंच झाल्यासारखं कां वाटायला लागलय कळत नाही. सतत कसलं तरी ओझं मनावर असल्यासारखं फ़िलिंग येतय. मनासारखं काम आहे, सुट्टी वगैरेही झालीय, फ़िरुन झालय, सगळ्यांच्या भेटी झाल्यात अगदी हवा ही मनासारखीच पडतेय पण स्वस्थच नाहीय.
खूपच दिवस फ़िरत होतीस आणि तिकडची हवा, कामाची पद्धत वेगळी म्हणून तुला वेगळं वाटतय गं असलं काहीतरी कुणाकुणाकडून ऐकूनही पटत नाहीय.
काहीतरी राहूनच गेलय, काहीतरी सुटलय हातातून जे पकडायला हवं होतं, असलं काहीतरी मधेच कधीतरी वाटायला लागतं. भर मिटींगमधे, नाहीतर जेवताना, अगदी कामासंबंधी चर्चा चालू असतानाही मधेच. काय आहे हे नक्की ते शोधायचा गेले बरेच दिवस प्रयत्न करतेय.
तिकडे केलेल्या कामाबद्दल, तिथल्या अनुभवांबद्दल, एव्हढ्या मोठ्या स्टे बद्दल लिहीण्यासारखं खूपकाही असूनही हातून लिहीलं गेलं नाही, बरेचदा न्यू पोस्ट साठीचं पान उघडूनही तिथे काहीच लिहीलं न जाता ते बंद केलं गेलं तेव्हां त्याबद्दल जेव्हां माझंच मला आश्चर्य वाटून मी विचार केला तेव्हां एक मात्र लक्षात आलं की त्याबद्दल लिहीताना एक नकारात्मक भावनाच मनात येऊन जातेय. आणि मला ती उतरवायला नको वाटतय.
काम व्यवस्थित पूर्ण झालं, असाईन्मेन्ट पार पडली हे खरं पण कुठेतरी काहीतरी चुकलं असं जे वाटतय ते एका वेगळ्या संदर्भात कामाशीच निगडीत आहे. वर्क एथिक्स, कामातली निष्ठा, प्रामाणिकपणा ह्यां गोष्टींना जगात कुठेही काम केलत तरी सारखंच महत्व असतं, मग ते मुंबई असो, युरोप असो नाहीतर दिल्ली, उत्तरांचल असा माझा एक उगीचच समज होता त्याला काहीतरी तडा गेला गेल्या काही दिवसांत इतकं मात्र खरं.
छोटे छोटे तपशिल, वेळेत काम पुरं करायची तळमळ, प्लॅनिंग ह्यांच महत्व इथे राहून माझ्यात जितकं भिनून गेलं होतं त्याचा निचरा दिल्लीतल्या काहीच महीन्यांच्या वास्तव्यात व्हावा, ग्रीन प्रोजेक्ट्स नां कागदावर महत्व आणि प्रत्यक्षात उतरताना त्याच व्यावसायिक माकड, इथे असंच चालतं, आपलं काम झालं की आपण फार न गुंतता बाहेर पडायचं, त्यात उगीच माझ्या देशात मलाच आलेले अनुभव, त्यांचा बसलेला धक्का वगैरे इश्यू आणायचे नाहीत असा पहिल्याच आठवड्यात सल्ला देणारा आणि तेव्हां सिनिक वाटलेला सहकारी शेवट्च्या दिवशी शहाणा आणि अनुभवी वाटण्यामागचे दु:ख आज इतके दिवस झालेत इथे येऊन तरी कमी झालेलं नाहीय. ग्रीन प्रोजेक्ट साठी ज्याचे एकोफ़्रेन्डली असणे ही बेसिक गरज असते त्यासाठी बेकायदेशीररीत्या तोडलेल्या जंगलाचा एक मोठा भाग त्यातल्या तोडलेल्या झाडांच्या आकडेवारीसकट समोर रिपोर्टमधे बघीतल्यावरही निर्विकारपणे एनओसी देऊन टाकणारे गुप्ता आणि ज्या रिसोर्टची असाईन्मेन्ट आपण घेतलीय त्याजागी काहीच दिवसांपूर्वी एक जुनं जंगल होतं हे जाणवल्यावर झालेली मनाची तळमळ अगदी असहायताही .. आणि उलट हेच सगळं लपवून प्रोजेक्टच्या पर्यावरणसहकाराची करायची असलेली जाहीरात म्हणजेच ग्रीन ऎडवर्टायजिंग हे माहीत असूनही फायनल रिपोर्ट लिहायला न धजावणारा हात हे सगळं आत्ता इथे आल्यावर डोळ्यांपुढून उगीचच परत परत जातय. परत परत आठवतय. आणि हेच सगळं करायला परत भारतात जायलाच नको वाटतय. आपलं काम मुळात जे होतं तेच आपण केलय आणि नॉर्म्स निट पाळले जात नाहीत, ’चुका’ व्यवस्थित मॅनेज केल्या जातात हा ’त्यांचा’ दोष आपला खरोखरच काहीही संबंध नाहीये आणि इथे आल्यावर युरोपियन क्लायन्ट्स किती काटेकोरपणे ग्रीन ऍडव्हरटायजिंगचे नॉर्म्स पाळुन निदान इथले तरी पर्यावरण जपताहेत ह्यात आनंद मानायला हवय हे समजूनही जपलं जातय ते ’ह्यांच’ आणि नुकसान होतय ते ’आपलं’ चा मूर्खासारखा विचार मनात येतोय. वसुंधरा एकच इतकं साधं लॉजिकही डोक्यात घुसत नाहीये. इतकी वर्ष इथे काढूनही हे आपलं आणि त्यांचं मनातून जात नाहीये ची वेगळीच चिडचिड मनात. आणि मग असं असताना मी इथे काय करतेय चा प्रश्नही कायम डोक्यात.
अनुपमशी बोलण्यातच अर्थ नाही कारण मग त्याचे ’हे सगळ तुला आधीपासून सांगत होतो तेव्हां ऐकलं नाहीस निदान आता तरी शहाणी होऊन ह्यातून बाहेर पड’ इतकं मोठं वाक्य असणारा एकच लूक मला आणखी फ़्रस्ट्रेट करायला पुरेसा आहे. झक मारली आणि हा कोर्स केला काम काय वाईट होतं साधंसरळ काम होतं ही नसती मनाची झंझट मागे नव्हति हे मनात येऊन अजूनच चीड वेगळीच.
एकंदरीतच आधीचं जे काय आयुष्य होतं ते सोपं आणि चांगल आणि आत्तच कठिण असं मला दर एक दोन वर्षांनी कां वाटत रहातं हे एक आणखी न उलगडणारं कोडं.
त्यात येताना सत्यजित भटकळचं मेकिंग ऑफ़ लगान आणलय. ते येताना प्रवासातच वाचून झालं आणि त्याचा तर अतोनात त्रास झाला. त्यामागे खरंतर एक वेगळीच स्टोरी. लगान जेव्हां लोकार्नो फ़ेस्टीवल मधे दाखवला तेव्हां लोकार्नोचं काम आमच्या एजन्सीकडे होतं आणि ट्रायएक्स रिव्ह्यू साठी मी तिकडे होते. लगानच्या स्क्रीनिंगला जवळपास साडेनऊहजार युरोपियन्स एका संख्येने समोर होते ज्यांना क्रिकेट मधे अजिबातच गम्य नव्हतं. पण जो रिस्पॊन्स मिळालेला त्यादिवशी तो ऐतिहासिक होता. अंगावर उमटलेला काटा अजूनही तसाच्या तसा आठवतोय जेव्हां रसेल ने भुवनला अट मान्य आहे कां विचारल्यावर ऑडिटोरियममधे माझ्या जर्मन सहकार्यांकडून ja!ja! चा जल्लोश झाला होता. त्यादिवशी तिथे पहिल्यांदा वाटलं होतं की जावं असंच्या असं उठून भारतात. हे स्पिरिट तिथे राहून अनुभवायला हवय. इथे ह्या परक्या देशात काय करतोय आपण? हे सगळं घडतं, घडवून आणलं जातं तो देश आपला. ते तसं कां वाटलं तेव्हांच कां वाटलं नक्की ते नाही सांगता येणार पण ठरवलं होतं जेव्हां कधी भारतातल्या असाईन्मेन्ट्स हॅन्डल करायची संधी मिळेल तेव्हां त्या स्विकारुन लगेच तिकडेच रहायला जायचं. तेव्हां खूपच ज्युनियर होते मी. तशी काहीच शक्यता नव्हती. आता तशी संधी सहज मिळतेय. माझ्या एका होकाराची गरज आहे आणि मी नसती काहीतरी खुस्पटं काढून जायचं टाळतेय. कां? टाळतेय किंवा लांबणीवर टाकतेय. पण संधी घेत नाहीय हे तर खरंच.
मन नको इतकं अस्वस्थ आहे तिकडून आल्यापासून काहीही नक्की कारण नसताना असं सारखं मनाशी म्हणायचं आपणच आणि कामाला लागायचं. बस. अजून काहीही करत नाहीये.
हे सगळं तरी कां लिहिलय? वाटत आहे ते नाहीच मांडता आलेलं तरी निदान हलकं वाटतय काहीतरी मनातून बाहेर पडल्यावर. एक लगान राहीलाय लोकार्नोला स्वत:शीच कबूल केलेला द्यायचा अजून तो कधी चुकता केला जाणार माहीत नाही.

Thursday, May 22, 2008

जा ने दो ना..

जोलियन ने रविवारी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. ती माझी इतकी जवळची मैत्रीण पण अनुपमची आणि तिची ओळखच नव्हती अजून. आमची भेटच नव्हती कित्येक महिन्यांत. अगदीच तासाभराचं अंतर आमच्या रहाण्याच्या ठिकाणांमधे असूनही.

अनुपमला म्हटलं मी आधीच जाते म्हणजे गप्पाही होतील आणि जेवणानंतर लगेच निघताही येईल. निरोप लांबवत बसायला त्याला आवडत नाही आणि मलाही तरी कुठे आवडतं म्हणा. फ़क्त मी त्यावरुन नंतर कटकट करत बसत नाही.

जोलीचं सगळं तयारच होतं. छानपैकी सातला जेवणं झाली मग डेलने समरसाठी खपून तयार केलेल्या त्यांच्या नव्या सुंदर बागेत गप्पा मारत बसलो.

आमच्या खूप गप्पा झाल्याच होत्या दुपारी. आता उगीचच इकडचं तिकडचं इन जनरल म्हणतात ते बोलत होतो दोघी. डेलने म्हणजे जोलियनच्या नवर्‍याने कॉफी चांगली बनवली होती.


(7-40 pm) मी अनुपमकडे वळून म्हणालेही की निघूच रे थोड्या वेळात. तो कुणाशी तरी सेलवर बोलत होता. जोलियन ऑफीसातल्या मारी ऍनबद्दल काही इंटरेस्टींग सांगायला लागली तेव्हाच.

(8-25 pm ) मारी ऍनने तिचा फेव्ह. अकाउंट किती चतुराईने उडवला ते ऐकताना सहज डेल कडे लक्ष गेलं तर तो सोफ्यावर बसल्या बसल्या चक्क झोपला होता. बिचारा. दुपारीच लॉन्ग टूर वरुन आलेला. दमला बहुतेक. किंवा सिल्वानेर जास्त झाली.

मग ऐकायचं अर्धच टाकून अनुपमकडे पाहीलं तर त्याचं अजून सेलवर बोलणच चाललं होतं. त्याने बोलता बोलताच घड्याळ दाखवलं.

जोलियनला म्हटलं अगं जाते आता. त्यावर तिने डेल ला हाक मारुन पुडिंग आणायला सांगितलं आणि म्हणाली थांब ग जरा. मगाशी चेरी सॉस पुरेसा गार नव्हता आता खाऊन बघ. आता नाही म्हटलं असतं तर तिला वाटणार पुडिंग आवडलच नव्हतं.

डेल ने आणलेले बाऊल्स संपेपर्यंत जोलीने परत कॉफी आणली.


(8-55 pm) जोलियनला म्हटलं आता निघायला हवय आम्हांला. मला सोडून ह्याला अजून पुढे जायचय. उशिर होणार.

डेल अगदी ताजातवाना झाला बहुतेक कॉफी प्यायल्यावर. त्याला त्याच्या नव्या कॅमेराच्या लेन्सबद्दल काहीतरी प्रॉब्लेम आला ते एक्सप्लेन करत होता अनुपमला. तेव्हांच जोलीला आठवलं तिने तिथे आणून ठेवलेले त्यांच्या ब्राझिल की स्पेन मधल्या सुट्टीचे आल्बम्स आणि सीडी दाखवायलाच विसरलीय. मग आम्ही आतच गेलो. माझी बॅगही आतच होती.


(9-20 pm) जोलीला म्हटलं आता अगदी खरंच निघतो आम्ही.

आल्बम बंद करतानाच डेलला टिव्हीवर जयपूरच्या स्फोटांबद्दल काही दिसलं. त्यावरुन त्याने मी दिल्लीला होते ते तिथून किती दूर विचारुन घेतलं. त्यांचा प्लॅन होता डिसेंबरला राजस्थानला जायचा.


(9-30 pm) अनुपम त्याला एक्सप्लेन करत होता किती अंतर आहे मुंबई आणि जयपूरमधे म्हणून आणि अगदीच कंटाळलेल्या सुरात. मग तोपर्यंत जोलीयनला मी खास तिने मला आणायला सांगितलेल्या बांगड्या घालून दाखवायला सांगीतलं. बॉक्स उघडला आणि इतकी हरखून गेली. त्या सगळ्या रंगिबेरंगी बांगड्या तिच्या सोनेरी हातावर सुरेखच दिसत होत्या. डेल लगेच कॅम घेऊन धावला. जोलियनला जिथून बांगड्या घेतल्या त्या देल्हीहाट बद्दल ऐकताना जामच उत्सुकता वाटत होती. बांगड्या घालूनच जोलीने कॉफ़ी केली थोडी थोडी.


(9-50 pm) चला आता बाय म्हणत मी उठले तर जोलियन म्हणाली काय सारखी निघते ग म्हणतेस. जाताना क्रिसेन्ट कुकीज देतेय पॅक करुन तुला आवडल्यात म्हणालीस नां? ती कंटेनर हातातच घेऊन आली.

अनुपम दरवाजातच उभा होता पण डेल काहीतरी सांगत होता आणि जोलियन हाताला धरुनच आत घेऊन गेली. म्हटलं अगदी थोड्या भर ग. तर ऐकायलाच तयार नाही. शिवाय चीजकेकही भरला. काउंटरवर तिने लिहून ठेवलेली स्ट्यूची रेसिपी दिसली. तिला म्हटलं माझी आई वेगळी करते ही बहुतेक. त्यावर तु काही शिकलीस की नाही वर गाडी घसरली तिची. जोलियन दहा वर्षांनी मोठी आहे माझ्या पेक्षा हे ती असं काही बोलायला लागली की लक्षात येतं. बट शी इज रिअली स्वीट ऍन्ड केअरींग. गेल्या वर्षी झाराच्या सेलमधून तिने घेतलेले स्टोल्स चांगले निघाले नाहीत त्याबद्दल ती सांगत असतानाच नेमक्या अनुपमच्या हाका ऐकू आल्या. जोलीला म्हटलं आता अगदी लगेच निघायला हवय. काय सुंदर जेवण केलंस तु. आता मला टेन्शनच येणार तुला जेवायला बोलवायचं म्हणजे. त्यावर ती आठवण काढायला लागली मागे मी ऑफिसात मॅन्गो पल्प घालून केलेला शिरा नेला होता त्याची. आणि एक पदार्थ तिला चव आठवत होती पण नाव नाही तो आम्ही आठवायला लागलो.


(10-10 pm) अनुपम इतक्या जोरात हाका मारत होता तर मला वाटलं हा अगदी बाहेरही पडला असेल तर तो डेलच्या बागेतल्या ऍपल्सची घरी बनवलेली वाईनबॉटल हातात धरुन त्याबद्दल डेल सांगत होता ते ऐकत बसलेला. जोलियन म्हणाली थांब हे दोघे बोलताहेत अजून मी पटकन ऑफिसच्या ह्यावेळी इंतरलाकेनला गेलेल्या पिकनिकचे फोटो दाखवते. आम्ही इतकं मिस केलं ना तुला असं इतक्या गोड आवाजात तिने म्हटल्यावर मलाही पहावेसे वाटायला लागले.

दोन मिनिट थांब नां म्हटल्यावर अनुपम हिन्दीत म्हणाला. तु रहा. नाहीतर डेल सोडेल घरी तुला. मी जातो. मी काही म्हणणार तितक्यात जोली आलीच फोटो घेऊन धावत वरुन खाली.


(10-20 pm) जोली आणि डेल ला शेवटी म्हटलं आता अजिबात थांबायला सांगू नका. डेलने तेव्हढात इन्स्टन्ट बनवलेलं वाईन कॉफी चं कोल्ड कॉकटेल काही फारसं ठिक नव्हतं चवीला. कदाचित जायच्या घाईत प्यायलं म्हणून असेल. बाय म्हणत पर्स घेतलेली पाहील्यावर अनुपम हातातला अर्धाच संपलेला ग्लास दाणकन खाली ठेवत उठलाच. ते जरा रुडच दिसलं. पण मग छान झाला कार्यक्रम असं अगदी मनापासून म्हणाला मात्र दोघांना. डेलने त्याला पोर्चमधे पोचल्यावर तु सारखा सेलवर बोलतोस. कारमधे बंद करुन ठेव. असं इतक्या काळजीने सांगीतलं. त्याच्या बहिणीच्या नवर्‍याला नुकताच झालेला ऍक्सीडेन्ट त्याच्या चांगलाच लक्षात होता. त्याबद्दल तो सांगत होता तर ते अर्धच तोडत अनुपम कार आणायला गेला. सेलवर सारखं बोलण्याची सवय डेलला खरंच डेंजरस वाटत होती. मला त्याने थांबवून आवर्जून सांगितलं लक्ष ठेवायला कारमधे.


(10-35 pm) जातो आता. खूप दिवसांनी भेटलो नाही आपण? फ्रिक्वेन्टली फोन तरी करायला हवेत एकमेकींना असं आम्ही निरोप घेताना एकमेकींच्या गळ्यात पडून जेमतेम म्हणतोय तर अनुपम कारचा दरवाजा उघडूनच हाक मारायला लागला. मग आटोपताच घेतला निरोप. एजन्सीमधल्यांच मिळून एक गेटटुगेदर कधी ठरवायचय ह्याची डेट मात्र पक्की केली निघताना.


(10-50 pm) पावसाचं चिन्ह आहे बहुतेक असं डेल सांगत होता अनुपमच्या बाजूच्या विन्डोमधे येऊन आणि जोलियन विसरलिच होती माझ्या नव्या ऑफिसमधला एक्स्टेन्शन नंबर घ्यायला म्हणून मी टोट मधून पर्स काढली आणि तिला कार्डच दिलं. त्यावर सगळेच डिटेल्स होते. तिला लोगो आवडला आमच्या एजन्सीचा. आर्टिस्ट आहे ती त्यामुळे तिने लगेच ऍप्रेशिएट केलं. डेलने पोर्चचा लाईट जरा ब्राईट केला दिसावं तिला निट म्हणून. जोली आणि डेल दोघांना एकदमच बाय सांगितलं. अनुपमने हातही केला नाही म्हणुन मग त्याच्या वतीने पण. दोघं अगदी निरोप द्यायला विन्डोच्या काचेबाहेर उभेच होते.


(11-05 pm) समोरचा रस्ता घेऊ नका मोठं वळण येईल मधे आयलंड केलय नव्यानेच असं सांगत डेल आणि जोली बिचारे धावत आले कारच्या मागून कार रस्त्यापर्यंत गेली तरी. मी काच खाली करुन मागे बघतेय आणि सांगतेय त्यांना की येतानाच पाहीलय आम्ही असं तर अनुपमने धाडकन पुढेच नेली इतक्या स्पीडने की बहुतेक ऐकूच नसणार गेलं त्यांना. स्वीट जोलियन आणि डेल.


(11-15 pm) बोलतच नव्हता काही म्हणून त्याला म्हटलं जोलियनने दिलेली मुनलिट समर नाईट्सची सीडी तरी लाव. बॅगेतून काढायला गेले तर लक्षात आलं घाईत निरोपानिरोपी झाली इतकी तर तिच्याकडेच राहिलीय निघताना नेमकी. अनुपमला नुस्तं म्हटलं तसं तर वळवायचय कां मागे ? परत एकदा कॉफ़ीही होईल असं इतक्या चिडक्या आवाजात म्हणाला. कमाल आहे. कोलकात्याला त्याच्याच कोणा ओकारान्ती लांबलचक नाव असलेल्या एका मावस बहिणी ने हे राहीलंच, ते सांग ना करत तीन वेळा दारातून मागे बोलावलं होतं. आणि त्याची आजी निघता निघता इतक्या सूचना देत रहायची की दारात उभं राहूनच तास जायचा. त्याला आठवण दिली करुन तसा म्हणाला तुझी मैत्रीण ह्यासर्वात भयंकर आहे.


(11-20 pm) वैतागून अनुपमला म्हटलं अरे गाणी तरी लाव तुझ्या खडूस गप्प बसण्याने माझा काहीही टाईमपास होत नाहीये. तर म्हणाला मीच गातो. हवं तर रात्रभर. नाहीतरी इतकी कॉफी झालीय निरोपाची की इन्सोम्निया गॅरंटेड.


निरोपाच्या जास्त झालेल्या कॉफी बद्दल ह्याने बोलावं? केवळ कमाल. पण आता ह्याची मात्र मी त्याला अजिबात आठवण करुन दिली नाही. कशी विसरतात मुलं!


माझं मोजून दोन मिनिटांचं काम असायचं. शुक्रवारी संध्याकाळी मला अनुपमच्या घरून आठवड्याच्या माझ्या चुकलेल्या लेक्चर्सच्या नोट्स घ्यायच्या असायच्या. सा'बर्गच्या उन्हाळ्यातल्या संध्याकाळी मी पोचायचे त्याच्या घरी तेव्हां लख्ख उन्ह पडलेलं असायचं. कॉफी अजिबातच निट नव्हती बनवता येत त्याला तरी चार कप कॉफी (त्याने केलेली) आणि तीन कप चहा (मी केलेला) झाल्यावर तो मला पोचवायला यायचा आणि माझ्या घरुन निघताना परत किती कप कॉफी पोटात गेली हे त्याच्या लक्षात नसायचं आणि माझ्याही पण मग मधल्या रस्त्यावरच्या कॉफीपार्लरमधली तिसरी कॉफी संपवून आम्ही जायला निघायचो तेव्हां चांगलाच अंधार असायचा झालेला. तेव्हां नाही कधी ह्याला निरोपाच्या कॉफ़्या पिऊन काळजी वाटली इन्सोम्नियाची.

(11-40 pm) माझं घर आल्यावर मग बायबिय़ काही म्हणायच्या आत ह्याची कार सुरुच.

( 12-25) अनुपमचा फोन. मुनलिट समर नाईट त्याच्याकडे मिळाली म्हणून सांगायला. म्हटलं तुच ऐकत बस आता. कॉफ़ीने येणारच नाहीये ना झोप नाहीतरी? त्यावर हसायला लागला आणि म्हणाला नको त्यापेक्षा गप्पा मारुयात. बायदवे.. जोली आणि डेलची कॉफ़ी माझ्या कॉफ़ीइतकीच पांचट असते असं माझ्या लक्षात आलय. तुला काय वाटतं? म्हटलं तुझ्या हातची कॉफ़ी प्यायलेलीच नाही आठवतय मला कधी. चव काय लक्षात रहाणार?

( 12-35) पलीकडे सन्नाटा.

( 12-40) अजून सन्नाटा. मग फोन डिसकनेक्ट.

मी अगदी समाधानाने हसले. आणि मला गाढ झोप लागली इतक्यांदा कॉफ़ी पिऊनही.

किती ती उगीच कटकट जरा मैत्रिणींचा निरोप लांबला तर!

Monday, March 17, 2008

ठिपक्यांची न बनलेली रेषा.....

पांढर्‍याशुभ्र कोर्‍या कागदांपेक्षा त्या हॅन्डमेड पिवळसर रंगाच्या कागदांबद्दलचं माझं फॅसिनेशन खूप आधीपासूनचं.
त्यांचं ते फिक्कटसर खडबडीत अंग पाहिल्यावर त्यावरुन बोटं फ़िरवण्याचा मोह आवरता येत नाही.
त्यावर आपल्या स्पर्शाचा ठिपका उमटवणं अगदी गरजेच होऊन बसतं.
हे खूप पूर्वीपासून.

मग कधीतरी एका सुट्टीतल्या उन्हाळी वर्कशॉपमधे त्या कागदावर काळ्या शाईत निबचं टोकं बुडवून अक्षराचा देखणा फराटा मारायला पालवकाकांनी शिकवलं होतं.
त्यांच्याकडे खूप रंगाच्या शाया होत्या.
मला दाट काळीच फक्त आवडली.
मावशी लिहायची काळ्या शाईनी. टपोर्‍या अक्षरात. मग ते पेपरमधे छापून यायचं. त्या छापून आलेल्या काळ्या अक्षरांवर सुद्धा मी बोटं फ़िरवायचे.

चायनिज काळी शाई दाटसर. प्रवाहीपणा कमी असलेली. त्याचा ठिपका छान उमटायचा पण त्या ठिपक्याची रेघ व्हायची नाही.
निबवर पाण्याचा ठिपका घे. किंवा ब्रश वापर पाण्यात बुडवून. आणि मग अक्षर रेखाटलं जाईल.
अनेकदा अनेकांनी सांगूनही मी शाईत पाणी मिसळायला नाकारायचे आणि ठिपक्याची रेघ होत नाही म्हणून नाराज व्हायचे.

ठिपका चालायला लागला की त्याची रेषा बनते. पुढे एकदा कोलटकरांनी त्यांच्या भिजक्या वहीतून वाचून दाखवलं.

माझा प्रवास ठिपक्यापासून सुरु झाला खरा पण तो पुरा नाही झाला.
अपूर्ण प्रवासाची सुरुवात मीच केली. तो पुरा न झाल्याची जबाबदारीही माझीच आता.
जितके ठिपके कागदावर उमटले तितकाच प्रवास.
डोक्यावरच्या अपुर्‍या अवकाशाचा आणि तुटक वेळांचा तो एक हिस्सा.

मग कुठलीही एक वेळ. कोणत्याही अवकाशातली. काहीच फरक नाही.
समोरच्या आवडत्या फ़िक्कट पिवळसर काहीशा खडबडीत कागदावर मन एकाग्र.

कागदच अवकाश.
त्या अवकाशावर दाट काळ्या शाईचा एक ठिपका.
रेष व्हायचं नाकारणारा.
शाईत पाणी मिसळायचं नाकारणारा माझा हात.
ठिपका चालणार कसा?
रेष अपूर्णच.
तरी नीबमधून दुसरा ठिपका, मग तिसरा, चौथा....

ब्रश कधीच सुटलाय. उन्हाळी वर्कशॉप सुद्धा संपलय.
शाईचीही गरज नाही.

मी स्वत्:च ब्रश आणि नीब. आणि काळी शाई.

एकटं. एकाग्र मन.
आजूबाजूला काय चाललय? माहीत नाही.

मग कधीतरी समोरच्या घड्याळाची थांबलेली टिकटिक. म्युझीक सिस्टीम पॉजवर.
बाहेरच्या झाडावरचा कावळा आणि खिडकीच्या दारावर बसलेली चिमणी शांत.
सोफ्यावरचं मांजर निष्प्राण झोपल्यासारखं.
कुंडीतल्या झाडाची पानं आणि सिलिंग फॅनची पाती सुद्धा संथ.
ह्या कुठल्यातरी वेगळ्याच शहरातल्या सातशे स्क्वेअरफ़ीट फ़्लॅटमधे काळ गोठून राहिलाय.
मग तुम्हाला जाग येते.

कागदावरची नजर हलते तेव्हां तिथे अजून एक ठिपका उमटलेला.
तो पाहून तुम्ही आनंदून जाता.

आनंद, दु:ख, एकटेपणा, सोबत, परदेश, देश, उत्साह दमणूक कशावरही मात करुन तुम्हाला ठिपका उमटवता येतो ह्याचा आनंद सर्वात जास्त.
त्याची रेष बनणार नसते तरी.
ठिपक्याचा प्रवास अपूर्णच रहाणार तरी .

म्युझीक सिस्टीमवर गाणं सुरु होतं मगाशी जिथे थांबलं होतं तिथूनच. अंगना फ़ुल खिलेंगे...
तुम्हीही रशिदखान सोबत गाता आओगे जब तुम साजना... अंगना फ़ुल खिलेंगे..

कोणी ऐकणारं नसतं.
तरी.
स्वत्:चा आवाज ऐकून झालेला विलक्षण आनंद..
आरशात स्वत्:ला पहाताना स्वत्:च्याच रुपाचा वाटलेला अभिमान..
आणि कागदावरच्या ठिपक्याकडे पाहून दाटलेला आनंद...
नार्सिसिस्ट तुम्ही.
आनंद त्याच एकाच प्रकारचा. स्वत्:ला खुश करणारा.

ते खुश होणं गरजेच असणारा.
तुमचा स्वत्:चा असा खास आनंद.
आवडत्या कागदावर बोटं फिरवताना मनावर उमटलेले ते रोमांच तुम्हाला परत परत आठवत रहातात.

अपूर्ण रेषेच्या प्रवासाला लिहिणं म्हणायचं असतं? कदाचित...

तुम्ही म्हणता.

राज.. खो घे :D

Saturday, February 23, 2008

नया घर..

आठवड्याची सुरुवात नवे घर लावण्यात झाली.
खरंतर घर तात्पुरते त्यातून ऑफ़िसने दिलेले शिवाय ऑलरेडी फर्नीश्ड तेव्हा लावायचे ते काय असणार? असं म्हणता म्हणता गेला पूर्ण वीकेन्ड ते थेट मंगळवार पर्यंत मी तेच करत राहीले.
त्यामधे सुरुवातीला काही काम नसताना नुसतीच उनाडत होते तेव्हा केलेलं भरमसाठ शॉपिंग ज्यात असंख्य नव्या पॅटर्नच्या चुडीदार्स (जब वी मेट मे करीना ने पहना हैंना वो है नया पॅटर्न. -इती माझी देल्ही हाट शॉपिंग कंसल्टंट्: ऑफ़ीसातली दिलजित कौर. LOL काय टिपिकल पंजा नाव) पासून सिल्क बांधणीच्या अतीसुंदर राजस्थानी पडद्यांपर्यंत सगळं होतं त्याची रवानगी योग्य जागांवर करायचंच काम महत्वाचं.
त्यात भर इथल्या सगळ्या ओव्हर आतिथ्यशिल चोप्रा जोहर कुटुंबियांपैकी असावेतसे वाटणारे शोई, उगीच बेटी बिटिया करणारे ( ही आपली माझी टिपिकल खडूस मुंबई प्लस ए.को.गिरी. अंगात भिनलीय कुणी जवळ यायला लागलं की हात झटकून अंतरावर पळायची, म्हणून असं मत. ते एरवी खरे प्रेमळही असू शकतात). त्यांच सारखं मी कुठेही जिन्याबिन्यात किंवा रस्त्याच्या कोपर्‍यावर दिसले रे दिसले की अकेली रहोगी? खाने पे आ जाना शामको सुरुच.(मी लगेच जोशी जोशीणीचे पंजाबी नातेवाईक इथे माझ्या शेजारी की काय म्हणून अतीसावध).
पण एकंदरीतच इथे आल्यापासून माझं सोशल लाईफ कायच्याकाय बहरलय. अगदी मला न झेपणारं. म्हणजे एजन्सीच्या कामासंदर्भातले सोडले तर इतर वेळी गेल्या पाचेक वर्षांत मिळून मी जितक्या लोकांना एंटर्टेन केलं असेल त्याच्या आसपासचा आकडा गेल्या महिन्या दोन महिन्यात सहज गाठला.
तर घर लावण्यातून जरा हुश्श म्हणतेय ना म्हणतेय तोच मासाहेबांचा फोन. अजू त्याबाजूलाच आहे तर त्याला म्हटलय तु चक्कर टाक कसंही जमवून.
आता हा तिचा जरासा अतीआईपणाच असतो दर वेळी मी कोणत्याही नव्या शहरात गेले की. उगीच टेन्शन घ्यायचं. बापरे नवं शहर. कसकाय जमतय, कशाला गेली उगीच वगैरे वगैरे. मग बिचार्‍या अजूला त्याच्या 'आसपास'च्या कामातून (आता हे 'आसपास' म्हणजे साधारण मेघालय ते सिमला किंवा जपान ते जर्मनी किंवा श्रीलंका ते दिल्ली असं कुठल्याही अंतरावरच असू शकत.)वेळ काढून २-३ दिवसांकरता कां होईना यावं लागतं. अर्थात माझी अगदीच हरकत नसते. एकतर आमच्या भेटी गेल्या काही वर्षांत तशाही इतक्या दुर्मिळ झाल्यात की मी अगदी त्याने यावं म्हणूनही दर तीन महिन्यानी नव्या शहरात जायला तयार आहे.
तरी यावेळी तिने असं म्हणणं मला जास्तंच उगीच वाटलं. कोण खातय मला राजधानीच्या शहरात.
तर त्यावर तिचं लांबलचक लेक्चर. उलट तिथे आहेस म्हणून टेन्शन. अजीबात सेफ नाहीये. सात नंतर कोणी बाहेर पडत नाहीत तिकडे मुली. आणि तुझं काम म्हणजे वेळेच काही भान नाहीच. एकदा तुझं... ........" ह्यावर मात्र मोठ्ठा पॉज. 'लग्न करुन दिलं की सुटले'. .. हे तिचं पुढचं पालूपद ती हल्ली मनातल्या मनात गिळून टाकते.
त्यामागे एक स्टोरी आहे.
माझ्या एंगेजमेन्टच्या काही दिवस आधी ती तिकडे रहायला आली होती तेव्हा काही ना काही कारणाने आमची सारखी D.O.O. व्हायची. मग तिचं प्रत्येक वेळी हे आवडत कोट मला उद्देशून. आणि नेमका अनुपम त्यावेळी असायचाच. त्याच्या समोर त्यावेळी एकंदरीतच तिने हे वाक्य इतक्यांदा उच्चारलं की शेवटी मीच तिला म्हणाले की थांब आता ह्यालाच ह्या वाक्याचा अर्थ काय आहे ते सांगते मग बघते तुझा भावी जावई कसा रिऍक्ट होतोय ते :P. मात्र तेव्हापासून ती हे 'एकदा... ... सुटले' चं वाक्य मनातल्या मनात उच्चारते जे मला व्यवस्थित ऐकायला येतं. आता इतर कोणत्याच बाबतीत ती टिपिकल आईगिरी करत नाही आणि मी लग्न केलं काय किंवा नाही काय तिला माझ्या त्या तथाकथीत टेन्शन्समधून सुटका नाहीच हे तिलाही माहीतेय तरी आपलं हे एक तिचं वाक्य म्हणजे अगदी अठराव्या शतकातल्या आयांच्या तोंडचे जसेच्यातसे उचललेले. मग नवर्याच्या घरी काय तो घाला गोंधळ हे मात्र तिने कधीच आजतागायत उच्चारलेले नाही कदाचित तो तसा मी खरंच घालीन ह्याचीही धास्ती वाटत असणार तिला.
तशी मला थोडीफ़ार खात्री होतीच की अनुपमला बहुतेक शब्दार्थ नाही तरी भावार्थ कळलाच असणार. कारण एकदोनदा आईच हे वाक्य ऐकून तो दचकल्यासारखा झालेला :P . आईला इतक्या चिंतेत टाकण्यासारखं काय करत तरी काय असते ही नेमकं असं वाटलंही असेल मेबी त्याला.
पण त्यानंतर एंगेजमेन्टनंतर आई परत गेल्यावर एकदा वीकेन्डला तिचा रात्री साडेअकराला फोन आला. नेमका त्यावेळी तिथे असलेल्या अनुपमने तो उचलला. त्याच्या कडून माझ्या हातात रिसिव्हर आल्या आल्या आईच सुरु झालं. ह्यावेळी हा इथे? कधी जाणार परत इतक्या उशिरा? रहाणार बिणार नाहीये नां? एकदा तुझं.... ...... सुटले." आता मात्र स्पीकर फोनमधून सासूच हे परिचित वाक्य ऐकल्यावर तो दचकला नाही. कदाचित त्याला पटलं की आईच्या त्या 'गुढ' वाक्याचा सोर्स कितीही ' निरुपद्रवी’ गोष्टीमधे असू शकतो ते :)))
तर आज सकाळी अजू आला. ह्यावेळी त्याला इतक्या महिन्यांनंतर पाहून पहिल्यांदा मनात विचार आला, तो किती बाबांसारखा दिसतोय हा! आता हे आणि नवलच. कारण खरंतर दिसण्यात म्हणजे रंग आणि डोळे ह्याबाबतीत मी अगदी सेम बाबा. लहानपणापासून तसंच ऐकायची इतकी सवय झालेली (आणि त्याचा उगीचच अभिमानही) की आता अचानक माझं मीच स्वत्:शी म्हटलेलं हे वाक्य मलाच वेगळं वाटलं.
पण वाटलं खरं तसंच ह्यावेळी. त्याचं एका हाताने जवळ घेऊन केस विस्कटणं तर त्याचं नव्हतच. ते बाबांचच.
तर ते जाऊंदेत. आत्ता काहीही उद्योग नाहीये म्हणून उगीच पाल्हाळ लावत लिहित बसलेय ते संपणारच नाही अशाने. इतक्या वर्षांची तिकडेच सवय झाल्यावर पहिल्यांदाच हे असं सलग इथे रहातेय त्यामुळे नव्या घरातलं नव्या शहरातलं सगळच मला जरा जास्तच नवलाईच वाटतय. नव्या हफ़िसात तर अजूनच लई धमाल. पण ती आता नंतर.
सध्या गुडनाईट! and enjoy yr weekend!!

Saturday, February 16, 2008

जोधा अकबर: रॉयल - ए - रोमान्स

नुकती कुठे त्याची ओळख पटतेय असं वाटायला लागलेलं असतं.

ओळख तरी काय नजरेचीच फक्त.

त्याच्या रुबाबाची, अप्रतिम शौर्याची, कठोर न्यायबुद्धीची, दाईला बडीमांचा दर्जा देऊन तिच्या वात्सल्याचा मान जपणार्‍या त्याच्यातल्या कोवळीकीची, त्याच्या पिळदार, कोरीव देखणेपणाची आणि तिच्याविषयीच्या आर्जवाची..ही सारी ओळख पडद्या आडूनच तर झालेली. ओझरती.. चुटपुटती.
त्याची तिच्यावर सतत खिळलेली नजर कधी हट्टाने, कधी लाजेने, बरेचदा रागाने ती कायम चुकवतंच नव्हती कां आली?

आणि आता ओळख पटतेय, त्याच्यावर विश्वासाने विसंबायला मन सरावतय तर त्याच्याच मनात अविश्वासाचा डोंब उसळलेला. गैरसमजाच धुकं त्याच्या मनात पसरवणारी खुद्द त्याची दाईमां हे समजल्यावर तर ती अवाक होऊन काही बोलूही न शकलेली.
स्वत:चा अभिमानाच्या कशाबशा शिल्लक राहीलेल्या दशा गोळा करत त्यानेच फ़र्मावलेली आमेरला, तिच्या माहेरी तिने परतावे ही शिक्षा दुखावलेल्या मनानी ऐकून घेत ती पाठमोरी वळलेली.
मनात नुकत्या मुळ धरू पाहणार्‍या कोवळ्या प्रितीचा अंकुर त्याच्या संतापाच्या धगीत कोमेजून जाणार आता कधीच.

..आपलं लग्न हा फक्त एक व्यवहार आहे. मनं जुळल्याशिवाय तु स्पर्श केलेला मला चालणार नाही असं तिने त्याला खुद्द हिंदुस्तानच्या शहेनशहा जलालुद्दीन मोहम्मदाला लग्नाच्या पहिल्या रात्रीच घुंगटही न उठवू देता बजावलेलं असतं.

आपल्याला राजकीय पटावरचा फक्त एक मोहोरा म्हणून वापरुन घेत असल्याची जाणीव झाल्याने कमालीचा जखमी झालेला तिचा आत्मसन्मान त्याला दुखावण्याची एकही संधी सोडायला तयार नसतो.

तिच्या बेरुखीने आधी चकीत झाल्यावर मग तिच्याइतक्याच अभिमानाने तुझ्या मनाविरुद्ध हा निकाह झाला असेल तर इस्लाम मधील खुला चा मार्ग स्विकारायला तु मोकळी आहेस. ह्यापुढे तु स्वत्:हून जवळ येशील तेव्हाच अन्यथा माझा स्पर्श तुला होणार नाही असं तिला बजावत ताडकन उठून जाणार्‍या त्याच्या तिच्याकडे वळलेल्या पाठीला राजपूत हिंदू स्त्री कोणत्याही परिस्थितीत विवाहाचं एकदा स्विकारलेलं बंधन नाही तोडत असं तिने तितक्याच तडकाफ़डकी उत्तर दिलं असतं खरं पण आपण हे बंधन कसं काय निभावू शकणार आहोत हे तिलाच कळत नसतं. ह्याच्या धर्माला तर सिंदूरही मान्य नाही आणि ह्याला आपला पती कसं मन मानणार आहे?

शिवाय मनातला राग. त्याचं काय करायचं?

हिंदुस्तानवर राज्य करणार्‍या ह्या तरुण गरम रक्ताच्या शहेनशहाला भडकवण्याचा तिचा हा अजून एक प्रयत्न फ़सलेला असतो. रागावण्यपेक्षा दुखावला जास्तं जातो तो आणि तिच्यासारखं उघडपणे ते दाखवतही नाही.

लग्न ठरवताना ह्या आधी तर तो धुडकावूनच लावेल अशा खात्रीने तिने घातलेल्या हिंदू धर्म आणि रितीरिवाज तुझ्या महालात आल्यावरही सोडणार नाही आणि माझ्या कृष्णासाठी माझ्या शयनगृहात तु मंदिर उभारु देशील अशा अटीही उलट त्याने आज मला राजपुत तेजस्वीतेचा त्यांच्या आन आणि बानचा प्रत्यय आला असं म्हणत सर्वांसमोर विनातक्रार, शब्दश्: मान्य केल्या असतात.
आणि त्या पाळलेल्याही असतात.
कोणत्याही तक्रारीला जागा न ठेवता. तरीही तिच्या मनात ही अढी कां?

तो खरं तर कधीचाच तिच्या आरस्पानी सौंदर्याने, तिच्यातल्या लखलखत्या स्वाभीमानाने पुरता घायाळ झालेला.

तिचा स्वाभिमान.
तिच्या अटी.
तिचं दुखावलं गेलेलं मन.
तिचा संताप.

सारं सारं तिचंच.

त्याचं फक्त तिच्याविषयीचं मनात उसळी मारणारं अनाकलनीय प्रेम.

तिच्या प्रत्येक गोष्टीला मानावं अशी असोशी त्याच्या मनात जन्मली तेव्हा त्याने निटसा तिचा चेहराही न्याहाळलेला नसतो खरं तर.
आपल्या अटी त्याला सांगताना पडद्या आडून तिच्यातून उसळत त्याच्या पर्यंत येऊन पोचलेल्या त्या आकर्षणाच्या तीव्र शलाकेत सामिल असते फक्त तिच्या धारदार, लखलखत्या आत्मसन्मानाच्या जाणीवेची ठिणगी.

निकाह झाल्यावरही दोघांमधले अंतर मिटत नाहीच.
पास है फ़िर भी पास नही हमको ये गम रास नही.. असं मनात येत तिच्या मोहक हालचालींचा वेध घेत असताना तो हिंदुस्तानचा बादशाह नसतो तर असतो फक्त एक नुकता तारुण्यात प्रवेश केलेला, प्रेमाच्या हुरहुरत्या भावनेचा मागोवा घेणारा कोवळा आशिक.
आपला शब्द राखत त्याने कायमच शारिरीक अंतर राखलेलं पण तरी त्याच्या नजरेचे स्पर्श ती कशी टाळू शकणार?
शिवाय आता तर त्या नजरेचाच मोह पडत चाललेला.

त्या नजरेतून दिसणारं त्याच्या निवळशंख पारदर्शी, प्रामाणिक हृदयाचं प्रतिबिंब तिला त्याच्या अधिकाधिक जवळ खेचून घेत असणारं.
ती कृष्णाची पुजा करत असताना तो भर दरबारात धर्मकट्टर मौलवींना तिचीच बाजू ठामपणे समजावून देत असतो आणि त्या महत्वाच्या सभेत अचानक तिच्या गोड आवाजात कृष्णाच्या भक्तीरसात वेढलेले सूर कानी पडताच कुणाची पर्वा न करता, सगळ्यांच्या कुत्सित, छुप्या हेटाळणीच्याही नजरा बिनदिक्कत धुडकावत तो तिच्या अंत:पुरात येतो आणि हातात निरांजनाची थाळी घेऊन उभी असणार्‍या तिचं ते निरांजनातल्या दिपकळीसारखं लख्ख तेजस्वी सौंदर्य पहिल्यांदाच नजरेस पडतं त्याच्या.

आणि तो निव्वळ भारावून जातो.
तिच्या नजरेत अडकून पडतो.

मुर्तीची पुजा? निरांजनावरुन हात ओवाळणं? त्याला कुठे काय माहिती असतं?
तिच्याकडे मंत्रमुग्ध नजरेनं पहात त्याचे हात आपोआप ति जे शिकवेल सांगेल ते करत रहातात.
आणि तिचं ते पाया पडणं? तो संकोचतो.
हिंदुस्तानची नव्हे त्याच्या हृदयाचीही मलिका अशी त्याच्या पायाशी?
रिवाज असला तरी तो असा कसला?
तो गडबडीने तिच्या खांद्यांना धरुन वर उचलायचा प्रयत्न करतो आणि आपण तिला स्पर्श केलाय हे त्याच्या लगेचच लक्षात येतं ते अंगात धावत गेलेल्या विजेच्या लहरीमुळे.
हात झटक्यात मागे घेतो तो पण मग तिच सुचवते तेव्हां निरांजनाच्या थाळीतलं कुंकुम अलगद तिच्या माथ्यावर टेकवतो.

जष्न-ए-बहार महालाभोवती दरवळतेय खरी पण दरम्यानचे फ़ासले तर मिटतच नाहीयेत.
पास हैं फ़िरभी पास नही.. काचेची एक भिंत मधोमध उभी असल्यासारखी सतत.
हा गम त्याला रास येत नाहीये आणि ती तरी खुश कुठेय?
तिने मानलं नाही तरी अस्वस्थ ती ही आहेच.

कैसा ये इश्क है.. कैसा ये ख्वाब है.. कैसे जजबातोंका उमडा सैलाब हैं.. सज्जात अस्वस्थपणे फ़ेर्या मारणार्‍या त्याच्याकडे तिची नजर पुन्हा पुन्हा कां वळतेय?
दिवाने आम मधे तिच्यासाठी धर्मगुरूंनाही खडसावणारा तो, अपने फ़ैसले हम खुद लिया करेंगे म्हणत त्याला घडवणार्‍या बैराम खानलाही निष्ठूरपणे मक्केला पाठवून देणारा तो, उन्मत्त हत्तीला आपल्या नुसत्या हातांनी थोपवून त्याच्या गंडस्थळावर आरोहण करणारा तो हा नाजूक गुंता मात्र काही केल्या उलगडू शकत नसतो.

आणि आता दोघांच्या हृदयातले जजबात आत्ता कुठे नजरेतून का होईना एकमेकांसमोर चिलमनमधून बाहेर डोकवण्याच्या प्रयत्नात असतात पण मधे येतो तो दुरावा..
निव्वळ गैरसमजाचा पण तिला स्पष्टीकरणाचा मौकाही हासिल न होणारा आरोप करुन आणि सजाही एकतर्फ़ी फ़र्मावून तो मोकळा..
स्वत्:ची काहीच चूक नसूनही त्याचा विश्वासच हरवून बसलो आहोत हा फ़ाळ काळजात रुतवून निघून जाताना तिच्या मनात अपमानापेक्षाही आपण त्याला समजावू शकलो नाहीची घायाळ वेदनाचं.

माहेरी मन कसं लागणार?
नजर तर सतत गच्चीवरुन आग्र्याच्या किल्ल्याच्या दिशेने खिळून राहीलेली.

तो येईल?

तो येतोही.

राजेशाही स्वागत झेलताना इतरांसाठी तो हिंदुस्तानची शान महंमद जलालुद्दीन अकबर असला तरी त्याची नजर फ़क्त ती कुठे दिसतेय का शोधत रहाते. मनात अपराधी भावना घेऊन.

माफ़ करेल ती? येईल परत आपल्या सोबत?

स्वागतचंदन सोहळ्यात तिला शोधणारी त्याची नजर अलगद पकडत तिची आई मिस्किलपणे त्याला राजपुत रिवाज सांगते. ह्या सगळ्या घुंगटधारी स्त्रियांमधून स्वत्:ची स्त्री शोधून काढ. तरंच तिच्यासोबत रात्र घालवायला मिळेल शाही महालात. आणि नाही ओळखता आली तर? सारी रात्र आकाशातल्या चांदण्या मोजत उघड्या छताखाली झोपावं लागणार. .

तिला शोधून काढायच? इतकच नां?
त्याच्या साठी तर ते अगदीच सोपं.
तिचे अलगद श्वास, अधीर स्पंदनं तर तो कुठूनही टिपू शकेल इतक्या ओळखीची झालेली.
तिच्या नाजूक बोटांवर नेहमी दिसणार्‍या रत्नजडीत अंगठ्या इतर कोणीही घातल्या तरी तो कसा फ़सेल?
त्या बोटांवरची ती नाजूक गुलाबी नखं तर त्याच्या कितीतरी ओळखीची. त्याची नजर चुकवताना प्रत्येकवेळी घुंगट अधीकच पुढे ओढून घेताना, पहील्या रात्री त्याच्या हाताच्या स्पर्शाने मागे सरकताना अशी कितीएक वेळा नजरेत ठसा उमटवून राहीलेली.

काय नाही करत तो तिला मनवायला? जाईच्या कळ्यांसारखं टिपूर चांदणं तिच्याभोवती उधळून देतो. तिच्या नाजूक हातातल्या तलवारीची वार अंगावर झेलून दाखवतो पण नाहीच येत ती.
जिद्दीने येत नाही.
मनात असूनही येत नाही.

पण ह्यावेळी परतताना तोच तिला खात्री देतो की तु येशील. तुझं हृदय मी जिंकलेलं आहे हे मान्य करत येशील.

ती येते.

प्रजा त्याचा जल्लोषात सत्कार करत असताना थाटात अंबारीवर बसून, मलिका ए हिंदोस्तांच्या रुबाबात येते.

जनतेच्या मनात त्याने मिळवलेलं मानाचं, प्रेमाचं स्थान ओळखून त्याच्या विषयीच्या अभिमानाने भरुन जात ती येते.

दोघांची निरभ्र मनं उगवत्या सूर्याच्या साक्षीने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देतं.

परस्परांशी अनुरक्त होताना.. झळाळत्या किरणांनी ती नाहून निघत असताना त्याचं हृदय हळुवारपणे गात रहातं..

इन लम्होंके दामन में.. पाकिझा से रिश्ते है..

दोघे एक होतात आणि मुहोब्बतका कलमा फ़रिश्ते दोहरवतच रहातात.
पुढील कितीतरी सालोंसाल.




जोधा अकबर ची ही दोन तरुण जिवांना प्रेमाची पहिली ओळख पटवून देत अत्यंत रेशमी नाजुकपणे उलगडत जाणारी प्रेमकहाणी आशूतोष गोवारीकरने कमालीच्या बेहतरीन अंदाज मधे ग्लोरियसली पडद्यावर मांडली आहे.
It's really a grand magnum opus by Ashutosh Govarikar. The film is just magnificent!!..
and what an enchanting, mesmerising performance by Hritik Roshan!!
He is awesome, brilliant, graceful, romantic and .. and splendidly beautiful. .!!!

माझ्यासाठी तरी ही फ़िल्म बघणे ही सर्वात बेस्ट romantic valentine's gift ठरली आहे.

*** ज्यांनी अजून सिनेमा पाहिलेला नाही त्यांनी कमेन्ट्स सेक्शनकडे चुकूनही फ़िरकू नये. प्रतिक्रीया द्यायचीच असेल तर माझ्या आणि सर्किटच्या कमेन्ट्स न वाचता द्यावी :P

Thursday, January 24, 2008

A Tale of Three Cities...

पुन्हा शहरं, पुन्हा प्रवास...

आमच्या दोघांच्या शहरातून.. आधी माझ्या मग त्याच्या शहरात.


माझं शहर तर मी तिन्ही त्रिकाळ पाठीवरच वागवत असलेली आमच्या किंवा इतर कोणत्याही शहरात असतानाही..

पण त्याने मात्र आमच्या शहरात आम्ही असताना कधीच त्याचंही शहर त्याच्या मनात कुठे असल्याचा थांगपत्ताही लागू न दिलेला..


आता आमच्या शहरात तसे बरेच दिवस मी एका बेटावरच रहातेय.
अगदी सुखात.
कंटाळ्याला उशाशी घेऊन.

तसंही ह्या आमच्या शहरात कुणाला काय पडलीय की तुम्ही बेटावर रहायला गेलाय ते कां किंवा आणखी कुठे गेलाय ह्याची.
मग करते मीही खुशाल मधून मधून आपल्याला हवं तेव्हां बेट गाठून हवं त्यांच्याशीच संपर्क साधायचा ..
इतरवेळी बेटाचे रस्ते बंद चा स्वार्थीपणा..

तो मुळातच असली बेटबिटं न मानणारा आणि न जुमानणारा त्यामुळे आश्चर्याने किंवा काळजीपोटी विचारतो कधी की कंटाळा नाही कां येत असं बेटावर जाऊन बसायला. पण आयुष्य अगदी हॅपनिंग वगैरे चाललेलं असतानाही किंवा काही एक्सायटींग प्रोजेक्ट्स हेक्टीक शेड्यूल वगैरे चालू असतानाही ऐन मध्यावरच मला कंटाळा येऊ शकतो.. मग तो छानपैकी सॅच्युरेट होत जातो आणि मग असं झालं की त्या कंटाळ्यालाच सेलेब्रेट करायला मी बेटावर.. त्याच्या भाषेत सोशल अनकास्ट माझ्या मते इंटेलेक्चुअल लिथार्जी.


तर नुकतेच आमच्या शहरातून त्याच्या शहरात जाताना व्हाया माझं शहर असं गेलो ते ह्या माझ्या बेटासकटच.
पण आता माझ्याच शहरात जाणार त्यामुळे मी माझ्या बेटा वरुन पाय उतार व्हायला अगदी उत्सुक वगैरे.
आणि मजा म्हणजे ह्यावेळी माझ्या शहरातही बरीचशी माझी माणसं आपली वेगवेगळ्या बेटांवरच रहात असलेली..
त्यांना कशाचा कंटाळा काय माहीत?
खरंतर तो यायलाच स्कोप नाही. हातात इंटरनेट, कानात आयपॉड, एफ़ेमचा नळ सारखा गळतच असलेला आणि चोवीस तास टिव्ही-सिनेमा-सेल्फोनची करमणूक. ह्या सगळ्यासकट सगळे आपले आपापल्या बेटांवर.
माझं शहर माणसांवाचूनचं.. अगदी रिकामं.
काही कुणाचे कुणावाचून शब्द अडत नाहीयेत की कुणाला काही कुणाबद्दल प्रश्नही पडत नाहीयेत.
मी पण मग आपली मुकाट माझ्या बेटावरच बसून राहीले.
त्याला दाखवायचं असलेलं माझ्या मनातलं माझं शहर मला दाखवता आलंच नाही,
अशा रिकाम्या शहरात त्याला काय दाखवणार काय दिसणार?


माझ्या शहरात फक्त मीच एकटी. त्याच्या शहरात तो त्याच्या माणसात, नातेवाईक, मित्रमैत्रीणींमधे..
शहरातले रस्ते, चौक, कोपरे हिंडून पहाताना माझ्यासोबत कधी माझ्यासोबत असूनही तो हे एकटेपणानेच पहात असलेला.
स्वत:च्या शहराला असं खूप दिवसांनी पहाताना असं एकटं मनच जास्तं सोबत पुरवत असतं.
मी त्याच्या शहराकडे पहाण्यापेक्षा त्याचं हे शहर निरखत रहाणचं जास्त मन लावून पहात होते.

आता आधी मुळात इतके दिवस त्याच्या शहरात जाईपर्यंतही ते शहर तो त्याच्या अगदी मनात वागवून असेल .. आपल्यासारखंच हेच मला माहीत नाही.
त्याने ते तसं आहे हे कधी जाणवूच दिलेलं नाही त्यामुळे मला माहीत नाही.

मग त्याच्या शहरात आल्यावर आपल्या मनात आपणच कधीपासून जोपासत ठेवलेले कसले कसले भ्रम निरसत जाताना पहाण्याचा अनुभव माझ्या दृष्टीने बराचसा सुखद, डोळे उघडणारा, थोडी खंत वाढवणाराही ठरला.

त्याच्या शहरात गेल्यावर तिथला वेगळाच ऋतू, वेगळ्याच माणसांची गर्दी सामोरी आल्यावर तर मी आधी माझं बेट सोडण्याचा प्रश्नच नव्हता.
कोण उतरुन चटकन माणसांच्या गजबजाटात पाय ठेवणार?
एकतर हे त्याचं शहर, त्याची माणसं काय माहीत कशी कोण तेव्हा आपल्या सवयीच्या बेटावर राहूनच त्यांच्याशी बोललं हसलेलं ठीक.
आणि कदाचित तो कधी बोललेलाही नाही त्याच्या बद्दल ..तर त्याला नसेलच दाखवायच त्याच्या मनातलं त्याचं शहर असाही मनात विचार.

त्याच्या शहरात मग असं दूरुन माझ्या बेटावर अलिप्त उभं राहून मी पहात होते ती त्याच्याकडेच.

आपण एकेकटे असताना किती वेगळे असतो आणि आपल्या माणसांत, आपल्या शहरांत आल्यावर किती वेगळेच बनतो, भासतो हे अगदी नव्यानेच जाणवल्यासारखं झालं तेव्हां..
त्याच्याभोवतीच्या त्याच्या माणसांमधल्या त्याला निरखून पहाताना लक्षात आलं किती वेग़ळा दिसतोय हा!

वेगळा आणि ... वेगळाच.

मी त्याच्या कडे पहातच राहीले.
तो तोच होता तरी वेगळा. जास्तं उबदार, थोडा जास्तं ऍप्रोचेबलही.
म्हणजे एरवी आमच्या शहरात असताना (आणि त्याला अशी माझ्यासारखी कधी मुद्दाम बेटावर जाऊन रहायची सवय वा गरज नसतानाही ) बरेचदा मला तो नक्की कुठे आहे आणि मला तिथे जायचा मार्गच कां मिळत नाहीये असं वाटायचं..

मग मी म्हणायची स्वत:शीच की आमची लहानपणं निराळी, वाढणं निराळं,
तेव्हां आम्ही बेसीकली निराळेच एकमेकांपासून, दोन परस्पर विरोधी रंगांसारखे.
म्हणजे डायरेक्ट प्रेमातच पडलो नसतो तर इतर वेळी, वेगळ्या परिस्थितीत भेटल्यावर मित्र तरी झालो असतो का एकमेकांचे काय माहीत? इतके वेगळे..
त्याला आश्चर्याने म्हणाले आहे मी बरेचदा तसं.
यावर तो नुसताच हसतो. मग म्हणतो कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संदर्भांमधे भेटलो असतो तर मित्र झालो असतो कां नाही माहीत... पण प्रेमात तर पडलोच असतो. कदाचित म्हणूनच पडलो असतो.
तो असं काही हसून म्हणाला की मी ते मान्य करुन टाकते मुकाट.
त्याच्या अंत:प्रेरणेवर त्याचा स्वत:चा नसेल इतका माझा विश्वास आहे.

आमच्या शहरात असताना हे नी असेच काही ना काही भ्रम मनात साठवून ठेवलेले. की आम्ही वेगळे, भिन्न स्वभावांचे वगैरे.

मग त्याला असं पहाणं आवडल्याने आणि त्याचं ते हसू जे एक्सक्लुजिव माझ्यासाठीच आहे असं मला आमच्या शहरात आम्ही असताना वाटायचं ते तो इथे त्याच्या अनेक माणसांना- मित्रमैत्रीणींना खुशाल हसून दाखवताना पाहील्यावर जरा चकीतच होऊन, थोड्या हेव्याने, कुतुहलानेही अजूनच जवळून पहावं म्हणून त्याच्या शहरात असताना माझ्या बेटावरुन उतरलेच शेवटी.

आणि मग पाय ठेवल्या ठेवल्या ते शहर छान अंगावरच आलं.
त्याचाच हात धरुन.
त्याच्या लहानपणातली मैदानं, त्याच्या शाळेकडे नेणार्‍या गल्ल्या, त्याच्या तरुणपणाच्या टप्प्यांवरचे कोपरे, चौक, त्याच्या मित्रमैत्रीणींची घरं, लांबचलांब भटकत फ़िरलेले त्याचे एकेकाळचे पायांखालचे रस्ते आणि त्यांवर आता ओळखीचे ठसे शोधत फ़िरणारा तो माझ्या शहरात गेल्यावर असंच सगळं करत फ़िरत असणार्‍या पूर्वीच्या माझ्यासारखाच वाटला मला अगदी.
ते बघताना त्याच्या नजरेतली चमकही तशीच.

काहीच वेगळेपणा कसा नाहीच ह्याचं आश्चर्य वाटण्याइतकं साम्य वाटलं ह्या बाबतीत आमच्यात.

आणि तो इतका चटकन रमून गेल्यासारखा तिथे, अगदी कायम त्यांच्यातच रहात असल्यासारखा सहज की आम्ही आमच्या शहरात होतो काहीच दिवसांपूर्वी तेव्हा त्याच्या मनात हे शहर, हे रस्ते, ही घरं, कोपरे त्यावरच्या त्याच्या माणसांसकट इतकं जिवंत धडधडत असताना माझ्या पर्यन्त त्या शहराची स्पंदनही कां पोचली नसावीत अजिबात ह्याचा मला मोठाच धक्का.
माणसं (निदान प्रेमात पडल्यावर समोरची व्यक्ती तरी) थोडीफार कां होईना कळतात आपल्याला चा भ्रम तर अगदी साफच निरसून गेला.
आणि मनाच्या तळाशी आनंदापेक्षा खेद आणि असुरक्षितताही थोडी शिल्लक राहीली .

मग ओघानेच हळूहळू आता तो इतक्या जणांचा तर त्याचं माझ्याचसाठी असणारं असं काही खास हरवून जातंय, गेलय की काय ह्या पसार्‍यात ही भितीही आली मनात हे कबूल करायला काय हरकत आहे?

त्याला तसं काही बोलून दाखवायच्या आत मग परत लक्षात आला आमच्यातला फरक.

तो फक्त त्याच्यासारखाच वागत होता.
तो असलेलं दडवत नाही नसलेलं दाखवत नाही. तो बेटावर जाऊन बसत नाही. त्याच्यातलं शहर त्याने माझ्यापासून लपवून ठेवलं होतं असंही काही नाही. फक्त त्याने कधी ते पाठीवरही वागवत ठेवलं नव्हतं माझ्यासारखं.
ज्या शहरात आपण तेच शहर आपलं अशा त्याच्या वरवरच्या साध्या सोप्या वागण्याने मीही कधी आत जाऊन मुद्दाम डोकावून ते पहायच्या फंदात पडले नाही.

त्याच्याही मनात तो आपल्यासारखंच स्वत:च असं एक शहर वागवत आहे हे तर समजलं. म्हणूनच तो जास्त जवळचा, ऍप्रोचेबल वाटायला लागला होता कां? की थोडा दूरचाच? बहुतेक.

शहरं, माणसं, परिस्थिती आहेत तशी किती सहज स्विकारतो तो.. जे मला कधीच जमत नाही!
मी आपली शरीराने एका शहरात आणि मनात कायम दुसरंच शहर वसवून.

मग मनात गर्दी, कोंडलेपणा .. आणि त्यानंतर बेटावर जाऊनही एकांत नाहीच.


त्याच्या शहरात असताना आम्ही किती काही बाबतीत एकमेकांसारखे वाटल्यावरही आता कळलं परत हा किती माझ्या पेक्षा वेगळा.

वेगळा म्हणजे.. वेगळाच.

मनातल्या शहरांपर्यंत पोचायला काही चोरवाटा वगैरे असतात, त्या मुद्दाम शोधाव्या लागतात वगैरेचे भ्रमही त्याच्या शहरात पोचल्यावर निरसूनच गेले एकदाचे हे मात्र बरं झालं.

साधा, सरळ राजमार्गच असतो खरंतर मनापर्यन्त पोचायचा.
फक्त तो लांबचलांब पसरलेला असतो, ह्या टोकापासून ते अंतहीन.. .

एक ना एक दिवस असाही येईल जेव्हां सगळेच भ्रम निरसून जाउन एकमेकांच्या वेगळेपणात स्वत:ची्च प्रतिबिंब पाह्यला लागू आणि आता आलो पूर्णपणे समजून एकमेकांना आपापल्या वेगळेपणासकट असं म्हणू.
फक्त त्याच्याच नाही स्वत:च्याही अंत:प्रेरणेवर विसंबून रहात आपण फक्त असा प्रवास करत रहायचं.
त्या प्रवासातच मग कुठेतरी एकमेकांच्या मनातल्या शहरांचे मुक्काम लागतील.
शहरातून परतताना हा एक नवाच भ्रम मनात जोपासलेला.

Monday, December 31, 2007

Last of the year
the ferry boat leaves
for another shore..

Friday, December 21, 2007

तारे जमीन पर....!!!!!


Superb film........ गेले अर्धा तास ह्या अप्रतिम सिनेमाला काय विशेषण द्यावे ह्याचा विचार केल्यावरही मला काहीच सुचत नाहीय. तेव्हां सध्या फक्त इतकंच म्हणते! पण ह्यापेक्षाही कितीतरी जास्तं लिहायला तर पाहीजेच आहे. आणि लिहिणारही आहे. आत्ता वेळ नाहीये. पण दर्शिल सफ़ारीवर, अमिर खानवर आणि ह्या सिनेमातल्या त्या प्रत्येक नितांत सुंदर प्रसंगावर लिहिल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. . तोपर्यंत तुम्हीही ह्या वीकेन्डला हातातली सगळी कामे सोडा, ख्रिसमस पार्ट्या चुकवा पण हा सिनेमा पहा.

Friday, December 14, 2007

पाच:

एंगेजमेन्टच्यावेळी घेतलेल्या साड्या-दागिन्यांना नंतर उन्ह लागले नव्हते.
आता वेळ आहे तर त्यांना थंडी तरी दाखवावी म्हणून आवराआवरी करताना परत एकदा बाहेर काढले तेव्हां त्यातला अनुपमच्या ममांनी दिलेला मोती आणि पोवळ्य़ांचा सेट दिसला.
त्यातल्या नेकलेसचं पॅटर्न अगदीच वेगळं होतं.

शेफ़ालिका हार असं त्यांनी सांगितलेलं नाव तेव्हा इंटरेस्टींग म्हणून लक्षात राहून बरेच दिवस मनात घोळतही राहिलं होतं पण नावाचा आणि हाराच्या पॅटर्नचा फारसा काही उलगडा झाला नव्हता.
असतात अर्थात जशा हम आपके है कौन साड्या, क्यूं की सास भी कभी बहू थी टिकल्या किंवा श्रीदेवी हार आणि जुही चावला झुमके तसाच असेल हा कोणा लेटेस्ट क्रेझ बंगसुंदरीच्या नावाचा हार असंही वाटलं.

पण आत्ता तो आटवलेल्या दुधाला कसा हलका पिवळसर रंग असतो तशा शेडच्या नाजूक मोत्यांच्या वर्तुळात मधोमध टपोरं पोवळं आणि अशा शुभ्र-केशरी फ़ुलांचा पोटापर्यंतच्या लांबीचा तो हार पाहिला आणि मागच्याच आठवड्यात आलोकाने पाठवलेला रबिन्द्रनाथांच्या पुस्तकांच्या सेटमधल्या एका लोककथांच्या पुस्तकातली शेफ़ालिकेची गोष्ट आठवली आणि हाराच्या पॅटर्नचा आणि नावाचा अचानक आत्ता उलगडा झाला.

रबिन्द्रनाथांनी त्यांच्या साध्या आणि मनोरम शैलीत लिहिलेली ती लोककथा फार क्यूट होती.

शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त.

प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती.

रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं.
पानं काळवंडलेली उदास.

वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले.

देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. "
प्राजक्ताने ती केली.
दिवस-महिने-वर्ष उलटले.

तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात.

आणि एकदिवस पहाटे सुगंधी हिर्या माणकांनी डहाळी न डहाळी ओथंबली.
प्राजक्ताच्या ह्या अवर्णनीय वैभवाकडे सारं वन मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलं.

पण प्राजक्ताला कसली जाणीवच नव्हती.
तपातच दंग शेफ़ालिकेला शेवटी शेजारच्या एका वृक्षाने हलवून जाग आणली.

वैभव? करू काय मी ह्याच?

निरिच्छपणे काया झटकून दिली तिने ती सारी दौलत मातीत उधळून..

धुळीत पडल्यावर लखलखती हिरे माणकं जराशी मंदावली आणि सूर्याच्या पहाटेच्या किरणांत मोती पोवळ्यांच रुप ल्यायली.

शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते.


बंगालमधे प्राजक्त खूप फ़ुलतो.
आणि शगुन म्हणून घरात येणार्‍या सूनेची ओटी प्राजक्ताच्या फ़ुलांनी भरायची पूर्वीची रीत.
काळाच्या ओघात, वैभव दाखवण्याच्या हौसेपायी त्यांची मोती पोवळी झाली.

म्हणून मग अनुपमच्या ममानी दिलेला हा शेफ़ालिकेचा हार.

आत्ताच्या ह्या गोठून गेलेल्या हिवाळ्यात फ़ुलं काय बाहेर हिरवा पानांचा रंगही दिसणं मुश्किल असताना हातात ह्या शेफ़ालिकेच्या मोत्या पोवळ्याच्या हारा ऐवजी खरंच प्राजक्ताच्या फ़ुलांची माळ असती तर? असं अगदी मनापासून वाटून गेलं.


आपल्याकडे किती बरं असतं असा बर्फ़ाळ हिवाळा नाही म्हणून.

मला आमच्या गच्चीवर झुकलेलं ऐन थंडीत सुद्धा मऊ, थोड्या गडद हिरव्या चमकदार पानांनी डवरलेलं आंब्याचं झाड आठवलं.
लाल सोनेरी मोहोर फ़ुलायला नुकती झालेली सुरुवात!
चैत्र येणार आहे ह्याची ग्वाही देणारी.

आणि ऐन थंडीत सुद्धा बहरुन उठणारे मधुमालतीचे घोस.
तेही आठवले.

काचेबाहेरच्या शुभ्र कोरडं जग शेफ़ालिकेनं रंगगंधित करुन टाकलं बघता बघता.

एखादा हिवाळी तुकडा असा अचानक टवटवीत जिवंत हिरवं रुपही घेऊ शकतो की!

Thursday, December 13, 2007

चार.

निष्क्रिय थंडाव्याच्या ऐन मधोमध असताना अनुपमच्या पार्टनरने सुचवूनही पाहिले की काहीच करत नाहीयेस तर आम्ही जातोय चौदा दिवसांच्या शूटवर तेव्हा चल आमच्याबरोबर. त्यावेळी नको मला काहीच उत्साह वाटत नाहीय ह्या एका बर्फ़ातून दुसर्‍या बर्फ़ात जायचा शिवाय तुमची ती उघड्यावरची शूट्स आणि हा मला कॅमेरे उचलायला लावणार असं म्हणून ते लगेच नाकारुन टाकलं. तेव्हां एरवी ब्रॅन्डलॉन्च किंवा चॅनेल्समीट सारख्या गोष्टीही कुठे जवळ अगदी तासाभरात पोचू शकेन अशा अंतरावरची शूट्स असली तर अटेन्ड करण्यासाठी बिनदिक्कत बुडवणारी मी च हे बोलतेय, तेव्हां मामला कुछ सिरियसली गडबड हैं हे जाणवून अनुपमनेही चक्क चल तुला ह्यावेळी स्क्रिप्ट लिहायला देतो असा उदार आग्रहही केला.
पण नकोच काही करायलाचा मनाचा हट्ट किंचीतही जागा सोडायला तयार झाला नाही.
एकसंध हिवाळा अंगभर पांघरुन बघते तरी एकदा ची हौस फ़िटली की कंटाळशील आणि मग वादळात बाहेरही पडता येणार नाही असं सांगताना त्याच्या डोळ्यांसमोर गेल्या वर्षी सा’बर्गच्या हिवाळ्यात माझं साध्या सर्दीने सुरु झालेलं आणि मग बघता बघता हाताबाहेर गेलेलं काहीसं ओढवूनच घेतलेलं आजारपणाचं प्रकरण येतय आणि म्हणून तो जरासा धास्तावलेलाच आहे, हे त्याच्या सारखं आईला फोन कर नाहीतर बोलावूनच कां घेत नाहीस तिलाच इकडे वगैरे मला मधूनच विचारण्या वरुन दिसायला लागलं होतं आणि मला हळूहळू त्याची मजाच वाटायला लागली.
उगीचच काही न करता असं निष्क्रिय बसून रहाणं ही काही गंभीर बाब आहे की काय आणि असली तर कशामुळे असावी हे तपासून पहाण्याची संधीच मला अनायसे मिळत होती.

प्रत्यक्षात मग पुढचे बरेच दिवस काही निरिक्षणं करण्यात अगदी आनंदी निष्क्रियतेने पार पडले.

त्यासाठी मला पॅटिओची काचेची खिडकी सोडून दुसरीकडे कुठे जायचीही गरज लागली नाही.

एलायझा आजी आख्खा उन्हाळा जे निर्जीव दगडासारखे दिसणारे कुरुप तपकिरी लीथॉपचे कंद जोपासत बसली होती त्यांना हिवाळ्यातच पांढर्‍या नाजूक मखमली पाकळ्य़ा फ़ुटतात आणि बर्फ़ पडला की त्यातही उठून दिसण्यासठी त्या पाकळ्यांचा रंग छान गडद पिवळा होतो.
उन्हात कंद नीट तापले नाहीत तर ही बर्फ़फ़ुलं उगवत नाहीत.
स्नो हूड घालून किंचित कापर्‍या हाताने हातात कॅमेरा पकडून लीथॉप्सचे फोटो टिपण्याचा खटाटोप संपवून घरात गुडूप व्हायच्या आधी एलायझा आजीने उगीचच काचेतल्या मला हे ज्ञान पुरवले.

त्यावेळीही वाटायचं राहिलं नाही की हिच्या ह्या लांबलचक आयुष्यात आत्तापर्यंत इतके हिवाळे येऊन गेले असतील आणि निदान एकदातरी हिने असा एकसंध हिवाळा नुसताच अंगावर पांघरुन घ्यायची संधी घेतली असेल कां की आता केलाच आहे उन्हाळाभर खटाटोप लीथॊप्सना उन दाखवण्याचा तर हिवाळ्यात त्यांचे निदान फोटो तरी पदरात पाडून घ्यायचीच धडपड हिवाळेनहिवाळे चालूच आपली?


घरगुती पॅनकेक्स आणि कॉफ़ी केक्स बनवून विकणार्‍या मागच्या रस्त्यावरच्या जाड्या बोरीसच्या दुकानात कितीही गारठा असला तरी बरोबर आठ वाजता सकाळी एक डीप ब्लॉन्ड केसांचा तरुण येतो पार्सल घेतो दुकानाबाहेरच्या लाकडी बाकावर बसून सिगरेट आणि कॉफ़ी पितो आणि जातो.

इतर सर्व वेळ बोरीसचे चोवीस तास उघडे दुकान आणि दुकानाबाहेरचा बाक स्तब्ध गारठत रहातात.

त्या एका तरुणासाठी बोरीस पॅनकेक का बनवत असावा आणि त्या तरुणाला तरी इतर काही ब्रेकफ़ास्ट घरीच बनवणे का शक्य होवू नये?

विचारांमधे माझ्या एकसंध हिवाळ्यातले काही तुकडे ओघळून पडतात पण लगेच वितळून जातात.


हिवाळी दुपार संपताना मग जेव्हां अनुपम फोन वर सांगतो की तो तसला निरर्थक जॉब सोडून द्यायचा शहाणपणा उशीरा का होईना सुचलाय तुला तर असं मोर्न करत बसण्यापेक्षा सेलेब्रेट करायला हवा आहेस हा ब्रेक तु तेव्हां भोवती असलेला न वाचलेल्या पुस्तकांचा, न पाहिलेल्या डिव्हीडींचा आणि न ऐकलेल्या सीडीज चा वाढता पसारा न्याहाळत मी त्याला अगदी आनंदातच सांगते की छान निष्क्रिय उबदार वाटतय अरे मला ह्या हिवाळी पांघरुणात.
आणि सेलेब्रशनच चालू आहे माझं.
फ़ुकट वेळ जातोय तो तुमच्या सार्‍यांचा जे बर्फ़फ़ुलं उगवण्याचा निरर्थक मूर्खपणा करत बसले आहेत असल्या हिवाळ्यात.
एक बधीर ब्रेक कां घेऊन बघत नाही तुम्ही त्यापेक्षा?

Wednesday, December 12, 2007

तीन:

हिवाळ्याच्या सुरुवातीला केलेया प्रवासात दोन चांगलेच मोठे कडे आणि एक काळ्या जंगलातला डोंगर सहज पार करुन आल्यावर एका फारशा जीव नसलेल्या, बहुतेक दगडगोट्यांनीच भरलेल्या मोठ्या ओहोळासारख्या नदीवरच्या एका साध्याश्या दोरीच्या पुलावरुन पलीकडे जाताना पाय चक्क थरथरायला लागावेत?
मित्र मोजून चार ढांगांमधे पलीकडॆ पोचलाय आपल्याला फारतर सहा लागतील हे माहित असूनही पहिलं पाऊलही केवळ पुल हलतोय ह्या सबबीवर आपल्याच्याने ठेववेना?
आपल्याला असा इतका सामान्य पुल ओलांडता येत नाहीय ह्याबद्दलच्या स्वत:वरच्या रागापेक्षा मित्राने तो ओलांडायला मदत करण्यासाठी जरासं परत मागे येऊन हात सुद्धा पुढे करु नये ह्याचा राग आपल्या मनात जास्तं मोठा का असावा?
त्याबद्दल त्याला बोलून दाखवताच त्याने अत्यंत शहाणपणाने सांगीतलेलं: कितीही घाबरत, वेडेवाकडेपणाने चालत आलीस आणि कितीही जोरात पुल हलला तरी पडणार नाहीसच आहे तु. त्यातूनही पडलीसच ठरवून तरी काही मानबिन मोडून घेण्याइतकीही उंची नाहीय पुलाची. तुझी तुच ये. नसेल जमत तर मागे वळून पुन्हा खालच्या रस्त्याने दगडगोट्यांवर पाय ठेवत, ओहोळ ओलांडत ये. रस्ता लांबचा पडेल इतकंच: हे सत्य आपल्याला मनातल्या भितीवर मात करणारं ठरलंही असेल किंवा अगदी तर्कयोग्यही असेल तरीही त्याने आपल्याला हवा तेव्हा हात कां पुढे करु नये ह्या मनातल्या रागाचा निकाल लागलाच नाही ह्या विचाराची एक बर्फ़ाळ टोचणी लावणारा एक न वितळलेला हिवाळी तुकडा.

दोन:

आपण नोकरी सोडतोय ह्याबद्दल सर्वात जास्तं काळजी वाटणारी व्यक्ती म्हणजे फक्त आपला बॉस च असावी आणि त्याची काळजी तोंडावर आलेल्या फ़ेस्टीवल सीझनपोटी हे माहित असल्याने त्याबद्दल खंत तरी किती वाटून घ्यायची?

बाकीच्यांपैकी म्हणजे अगदी जवळच्या वगैरे समजत असणार्‍यांपैकी काहींनी कंटाळ्यापोटी, काहींनी अलिप्तता दाखवायची म्हणून, काहींनी मुर्खपणा समजून, काहींनी नेहमीचच म्हणून, काहींनी समजुतदारपणा दाखवायचा म्हणूनही काही मतप्रदर्शन करायचे टाळलेय ह्याची काय टोटल लावायची मनात? आपण सोन्यासारखी नोकरी का सोडलीय, हा ब्रेक नक्की कशाकरता घेतलाय ह्याची काही संगती आपल्याच मनात अजून नीट लागत नसताना, मुळात ती लागावी अशीच आपली इच्छा नसतानाही इतरांनी ती लावून आपल्यालाच सांगावं तेही गोंजारत अशी अपेक्षा कशी असू शकते मनात?

हिवाळ्यातल्या बर्फ़गार दुपारीचा एक तुकडा हातावर हुळहुळत तसाच.

एकसंध वाटणार्‍या हिवाळ्याचे हाताशी लागलेले काही तुकडे: एक:

असा मोठाच्या मोठा वेळेचा एकसंध सलग तुकडा बर्‍याच वर्षांनंतर पहिल्यांदाच हाताशी सापडला.

म्हणूनच आले गोळा करता काही इथल्या हिवाळ्यातले वेगवेगळ्या वेळांचे बर्फ़गार तुकडे.

काही वितळून गेले.

काही अजून आहेत.

नदीच्या पाण्यावर साचलेल्या धुक्यासारखे अजून गोठून राहिलेले.

नदीच्या पाण्यावरचं धुकं गोठायला सुरुवात झाली तो माझ्या ब्रेकचा पहिला दिवस.

आत्तापर्यंतचे इथले बहुतेक हिवाळे देशात सुट्टीवर जायच्या तयारीत आणि आल्यावर तिथून आणलेल्या सामानांचे आणि आठवणींचे पसारे आवरण्यात पार पडलेले. यावर्षी मात्र सुरुवातीला केलेला थोडा आसपासचा प्रवास सोडला तर कुठ्ठे म्हणून जायच नाही असं ठरवूनच टाकलेलं.


नदीच्या पाण्यावरचं धुकं गोठायला सुरुवात झाली त्याच दिवशी पहाटे तिथे चुकारपणे मागे राहिलेल्या त्या निळ्या तपकिरी पंखांच्या स्टॉर्कनेही स्थलांतरासाठी झेप घेतली.
बाकीचे आधीच उडून गेले होते.
हा एकटा उगीचच आपली रुंद पिवळी चोच विलोंच्या जाळीत खुपसत काहीतरी शोधत असल्यासारखा थंडी सहन करत किनार्‍या किनार्‍याने फिरत राहिला होता बरेच दिवस मागे.

नदीच्या पाण्यावरचं धुकं गोठायला सुरुवात झाली त्यादिवशी त्या रिकाम्या वाटेवरुन परतताना मी ठरवून टाकलं. हा इथला शेवटचा हिवाळा.
सगळे स्टॉर्क उडून गेलेले रिकामे किनारे बघवत नाहीत.

आणि मग शेवटची राउंड संपवून परत जाताना लक्षात आलंच की असं ठरवतच गेले चार हिवाळे पार पडलेत.
नदीच्या पाण्यावरचं गोठलेलं धुकं आणि उडून गेलेला शेवटचा स्टॉर्क बघत.

नदीच्या पाण्यावरचं धुकं वितळायला सुरुवात होईल तेव्हा तो निळ्या तपकिरी पंखांचा, पिवळ्या चोचीचा
स्टॉर्क परतेल.

तो आपण पाहणारच.

अजून एका नविन हिवाळ्याला सुरुवात होईपर्यंत, नदीवरचं धुकं परत गोठेपर्यंत आपण इथेच असू.

पाचव्या हिवाळ्यातला शेवटचा स्टॉर्क उडून गेलेला पहात.

ह्या हिवाळ्यातला हा हाताशी लागलेला पहिला बर्फ़गार तुकडा.

Friday, November 09, 2007

!! शुभ दीपावली !!

निळावतीच्या दीपकळ्यांनो आलां माझ्या घरीं
नाचुनी गाउनि रंगविली ही मम अंगण-ओसरी






मस्तं मूड आहे हवेत! मजेचा, मस्तीचा, आनंदाचा, खाण्यापिण्याचा, पार्टीचा, भेटींचा, जुन्या मैत्र्या उजळवण्याचा, नव्या मैत्र्यांच्या स्वागताचा, प्रेम करण्याचा, खूप दिवस मनात असलेल्या प्रवासाला जाण्याचा, वाचनाचा, गाण्याचा, खरेदीचा एकंदरच सेलेब्रेशनचा. नोकरीबिकरीही सोडून बसलेय तेव्हां आळसाचाही.

ह्या सगळ्याच मौजमजेनंतर भेटूच आपण.

तोपर्यंत मायबोली दिवाळी अंकातली पियानोची गाणी ऐका आणि सांगा आवडली का ते :P